डोळ्याचे आजार कानाचे आजार
रांजणवाडी

stye पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो. पिकल्यावर रांजणवाडी आपोआप फुटते. पू गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते. पण पापणी दाबून पू काढू नये. कारण त्यामुळे कधीकधी पू उलट रक्तामधून मेंदूत जाण्याची शक्यता असते.

रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास पुढील साधा उपाय करावा. कपडयाचा बोळा गरम पाण्यात भिजवून दिवसातून 5-6 वेळा शेकवावे. याने एक-दोन दिवसांत रांजणवाडी जागच्या जागी जिरण्याची शक्यता असते. अशी न जिरल्यास ती शेकाने फुगून फुटते. ती लवकर मोकळी व्हावी यासाठी असा शेक उपयोगी पडतो. दुसरा एक उपाय म्हणजे सुजेच्या सुरुवातीस लसणाच्या पाकळीचा रस रांजणवाडीवर सकाळ-संध्याकाळ लावावा. याने रांजणवाडी न सुजता जिरून जाते.

रांजणवाडी मोठी होऊन पू भरला असल्यास तो काढणे आवश्यक असते. पापणीचा तेवढाच केस नखात अथवा चिमटयाने धरून उपसून काढल्यास कणभर पू बाहेर पडतो. दोन-तीन दिवसांत जखम भरून येते. याने उपयोग न झाल्यास किंवा सतत रांजणवाडी येत असल्यास कोझालच्या गोळया घ्याव्यात. यानेही आराम न पडल्यास नेत्र तज्ज्ञाकडे पाठवावे.

 

वेल वाढणे

यात डोळयाच्या बुबुळावर नेत्र अस्तराचा पडदा वाढतो. तो हळूहळू बुबुळावर येतो. कधीकधी तो वाढतवाढत इतका मध्यावर येतो, की दृष्टीवर दुष्परिणाम होतो. बुबुळावर वेल वाढायच्या आधीच यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. अशा व्यक्तींनी तज्ज्ञाकडून तपासून घेणे आवश्यक आहे.

 

खुप-या

खुप-या हा रोग एक प्रकारच्या जंतूंमुळे होतो. हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा आजार संसर्गाने पसरतो. हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.

रोगनिदान

सुरुवातीला डोळयांत वाळूचे कण गेल्याप्रमाणे (खुपणे) वाटत राहते. डोळे चोळावे असे वाटते. पण खरे म्हणजे डोळयांत काही गेलेले दिसत नाही. पापण्या उलटून पाहिल्यास पांढरट ठिपके दिसतात. हे ठिपके खुपतात (म्हणून खुप-या हे नाव). हळूहळू बुबुळ व पापण्या यांवर परिणाम होतो. वेळीच उपचार न केल्यास पापण्या आखडतात. पुढेपुढे बुबुळावर फूल पडते व दृष्टी जाते.

उपचार

टेट्राचे मलम दिवसातून तीन वेळा याप्रमाणे सहा आठवडे नियमितपणे डोळयात घातले तर खुप-या ब-या होतात. याबरोबर दोन आठवडे तोंडाने टेट्राच्या गोळयाही घ्याव्यात.

होमिओपथी निवड

एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.