Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
रोगांचा त्रिकोण

diseases triangle बहुतेक सर्व आजार रोगकारक घटक, नैसर्गिक परिस्थिती आणि माणूस यांतल्या त्रिकोणी संबंधातून निर्माण होतात.

(अ) रोगकारक घटक

रोगकारक घटक म्हणजे रोगास जीवशास्त्रीय कारण ठरणारे जीवजंतू, रासायनिक पदार्थ, अन्नाची कमतरता (किंवा अतिरेक) आणि भेसळ, प्रदूषण, इत्यादी. रोगकारक घटकांची आक्रमकता आणि संख्या (मात्रा) वाढते तशी रोग निर्माण होण्याची शक्यताही वाढते. उदा. फ्लूचे विशिष्ट विषाणू इतर विषाणूंपेक्षा अधिक आक्रमक असतात. तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये रोगजंतू जास्त संख्येने असतील तर रोगाची शक्यता वाढते.

रोगकारक घटक

flesh worm काही रोगकारक घटकांची यादी खालीलप्रमाणे करता येईल.

  • जीवजंतूंमुळे – उदा. पटकी, सर्दी, जंत, हिवताप, इ.
  • रासायनिक पदार्थ व विषारी पदार्थ- उदा. कीटकनाशक औषधाचे विषारी परिणाम, अन्नभेसळीचे दुष्परिणाम, इ.
  • हवामान – उष्माघात, शीतघात, इ.
  • वावडे असलेले पदार्थ – उदा. गाजर गवताचे वावडे.
  • मार बसून होणारे आजार – उदा. अस्थिभंग, मुरगळणे
  • कुपोषण- उदा. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा, अन्नाच्या कमतरतेमुळे ‘रोडपणा’ किंवा ‘सर्वांगसूज’ येणे, अन्नाच्या अतिरेकाने लठ्ठपणा येणे.
  • शरीर गंजवणारे पदार्थ -उदा. साखर, मीठ जास्त खाणे.
  • मानसिक ताणामुळे येणारे आजार – उदा. एक प्रकारचा आतडेदाह, डोकेदुखी.
  • डॉक्टर, वैद्याने दिलेले आजार – चुकीचे औषधोपचार, योग्य उपचारांचे अनपेक्षित वाईट परिणाम, इ. (उदा. इंजेक्शनच्या जागी होणारी गाठ किंवा गळू).

सर्वच रोगांची सर्व जीवशास्त्रीय मूळ कारणे आपल्याला कळलेली नाहीत. जीवशास्त्रीय कारणांचे अपूर्ण आणि एकांगी ज्ञान झाल्यामुळे निरनिराळया पध्दती निघाल्या आहेत. अनेक आजार का होतात हे अजून आपल्याला पुरेसे कळलेले नाही उदा. पांढरे कोड, कर्करोग, फेफरे, सांधेसुजीचे काही प्रकार, अतिरक्तदाब, दृष्टीदोष, वेड लागणे,, इत्यादी. तरीही या प्रकरणात नंतर दिलेल्या रोगांच्या कारणांप्रमाणे वर्गीकरणाचा थोडासा उपयोग होऊ शकेल.

(ब) परिस्थिती

tuberculosis reason ऋतू व परिस्थितीप्रमाणे रोगकारक घटकांचा फैलाव किंवा अटकाव होतो. म्हणून विशिष्ट आजार विशिष्ट काळातच आणि परिस्थितीतच येतात. या ‘परिस्थिती’ चा परिणाम माणूस व रोगकारक घटक या दोघांवरही होतो. उदा. दमट हवेत श्वसनसंस्थेचे आजार वाढतात. अस्वच्छतेमुळे सर्व प्रकारचे सांसर्गिक आजार वाढतात. पावसाळा आला की पाण्यातून येणारे आजार वाढतात. गुरांच्या गोठयाजवळ पिसवा व कीटकजन्य आजारांची शक्यता असते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.

सामाजिक परिस्थितीवरही आजार होणे- न होणे, आजाराची तीव्रता, बरे होण्याचे प्रमाण, बरे होण्यासाठी लागणारा वेळ, इत्यादी अनेक गोष्टी अवलंबून असतात. शहरात साथी आल्या की बहुधा झोपडपट्टीतच त्याचा फैलाव जास्त होतो. याचे मुख्य कारण परिस्थिती. (आणि काही प्रमाणात माणसांची प्रतिकारशक्ती). शहरातल्या सांडपाण्यामुळे जे डास वाढतात त्यामुळे हत्तीरोग, मेंदूसूज, इत्यादी आजार निर्माण होतात. बागायती खेडयांमध्ये स्वच्छ पाण्यावर वाढणारे डास मलेरिया फैलावतात. हवामान दमट असेल तर श्वसनाचे आजार जास्त लवकर आणि जास्त प्रमाणात होतात. जंगलात राहणा-या लोकांना जंगली प्राण्यांत येणा-या साथींचा संसर्ग होऊ शकतो. शेतीतल्या लोकांना पोटातल्या जंतांचा त्रास वारंवार असतो. गिरण्यांत काम करणा-या कामगारांना अनेक ‘औद्योगिक’ आजारांना तोंड द्यावे लागते. (उदा. गोंगाटामुळे बहिरेपणा, इ.) परिस्थितीमध्ये सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक व्यावसायिक अशा अनेक घटकांचा समावेश होतो.

‘परिस्थिती’ सुधारुन रोगांचे नियंत्रण करणे हे फार महत्त्वाचे आहे.

क) व्यक्तिगत घटक

personal components माणसाचे राहणीमान, वय, कामधंदा, आनुवंशिकता, प्रतिकारशक्ती, पोषण, आरोग्य-वैद्यकीय सेवा मिळण्याची शक्यता, इत्यादी अनेक गोष्टींवर रोग होणे न होणे अवलंबून असते. उदा. गोवराच्या साथीत ज्या मुलांना आधीच लस टोचलेली असते त्यांना गोवर होत नाही. तसेच ज्यांना गोवर होतो त्यांतल्या सशक्त मुलांना तो सौम्य होतो तर इतरांना त्रासदायक ठरतो.

माणसाचे राहणीमान, पोषण, रोगप्रतिकारकशक्ती, आनुवंशिक गुण, शिक्षण, वय, लिंग, व्यसने, इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्याशी संबंध असतो. गोवराचे उदाहरण यापूर्वी येऊन गेलेले आहे. जीवनमानाचा मुद्दा तर फार महत्त्वाचा आहे. इंग्लंडमध्ये कामगारांचे जीवनमान सुधारताच क्षयरोगासारख्या अवघड रोगाचे बरेच नियंत्रण झाले . त्यावेळी क्षयरोगावरची औषधे निर्माण झालेली नव्हती. मात्र भारतात आजही – औषधे असूनही क्षयरोगाचे प्रमाण खूप आहे. कारण भारतातले पोषण, जीवनमान यांत पुरेशी सुधारणा झालेली नाही.

लसीकरणामुळे काही रोगापुरती वैयक्तिक रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोग थोपवता येतात. कारखान्यांच्या गोंगाटाने बहिरेपणा येऊ नये म्हणून कामगारांनी कानात ‘आवाज रोखणारे’ बूच-बोळे वापरणे, अपघातात डोक्याला मार लागू नये म्हणून हेल्मेट वापरणे, वेल्डिंग करतांना विशिष्ट चष्मा वापरणे, कमी वेगाने वाहने चालवून अपघाताची शक्यता कमी करणे, इत्यादी गोष्टी ‘माणसावर’ अवलंबून आहेत. नखे कापणे, स्वच्छता ठेवणे उपलब्ध उपचारांचा पुरेसा लाभ घेणे, लस टोचून घेणे, इत्यादी ब-याच गोष्टी बहुतांशी स्वतःवर अवलंबून असतात.

आरोग्य सुधारण्यासाठी या तीन्ही आघाडयांवर प्रयत्न करावे लागतील. योग्य राहणीमान, परिस्थिती, दरडोई पुरवठा सुधारावा लागेल. रोग होणार नाहीत अशी परिस्थिती तयार करण्याचा प्रयत्न करावा लागेल, तसेच रोगघटकांचे प्रमाण कमी किंवा नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तीन्हींचा समतोल साधल्यावरच आरोग्यमान वाढेल. मलेरियाचा आजार हटवायचा तरी तीन्ही आघाडयांवर प्रयत्न करावाच लागेल.

आपल्यासारख्या गरीब देशात सांसर्गिक आजारांचे आणि कुपोषण-आजारांचे प्रमाण जास्त आहे. पण याशिवाय रोगांची अनेक प्रकारची कारणे असतात. या रोगकारणांचे मुख्य प्रकार दोन : आनुवंशिक आणि बाह्य परिस्थितीतून आलेली. दोन्ही कारणांची सरमिसळच जास्त वेळा दिसते. कारण रोगप्रतिकारशक्ती, रोगघटकांना तोंड देण्याची क्षमता, इत्यादी गुण काही प्रमाणात आनुवंशिक असतात. उदा. कुष्ठरुग्णांच्या संबंधात आलेल्या प्रत्येकाला कुष्ठरोग होतोच असे नाही. ज्यांना तो होतो त्यातही वेगवेगळे प्रकार पडतात. अतिरक्तदाब, मधुमेह, हे आजारदेखील आनुवंशिक आणि बाह्य परिस्थितीच्या एकत्रित परिणामाने तयार होतात. आनुवंशिक कारणे आपण बदलू शकत नाही, मात्र परिस्थिती सुधारता येते.

रोगाचे कारण आणि बाधलेली संस्था यानुसार रोगांचे ढोबळ वर्गीकरण (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.