Disease Science Icon खास तपासण्या रोगशास्त्र
पेशीसमूहांची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी

काही वेळा शरीरातून शस्त्रक्रियेने काही भाग बाहेर काढला जातो. या भागाची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी केल्यावर त्या भागातील रोगप्रक्रियेचे ज्ञान होते. शस्त्रक्रिया करताना काढलेला काही रोगट भाग तपासणीसाठी उपलब्ध असतोच. काही वेळा हा भाग मुद्दाम तपासणीसाठीच काढला जातो. उदा. गर्भाशयाचा किंवा इतर कोठलाही कॅन्सरचा गोळा (त्याचा भाग) सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. त्यावरून कॅन्सरच्या प्रकाराचे ज्ञान होते. क्युरेटिंग (अथवा गर्भाशय खरवडणे) केल्यानंतर खरवडून काढलेला भाग तपासून काही निदान करता येते. अस्थिमज्जा तपासायची झाल्यास ती सिरींज-सुई वापरून काढून तपासतात. गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर ओळखण्यासाठी तो भाग खरवडून तपासायला पाठवला जातो. अनेक प्रकारच्या गाठींसाठी या तपासणीचा चांगला उपयोग होतो.

फाईन नीडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी(FNAC) हे तंत्र आता पुष्कळ वापरले जाते. यामध्ये संबंधित अवयवाचा भाग सुईच्या सहाय्याने शोषून घेतात. त्यामुळे जखम टळते.

दुर्बिण तपासणी -एंडोस्कोपी

काही आजारात जठर, उदर, श्वासनळया, इत्यादी पोकळयांची व त्यांच्या ‘भिंतींची’ स्थिती कशी आहे हे जाणून घ्यायची गरज असते. यासाठी एका लवचीक व प्रकाशित नळीवाटे प्रकाश आत सोडून तपासणी करता येते. आतला भाग तपासणा-याला डोळयांनी प्रत्यक्ष पाहता येतो.
उदरपोकळी पाहताना मात्र पोटावर एक छोटे छिद्र पाडावे लागते. मोठे आतडे तपासायचे असल्यास गुदद्वारातून मूत्रनलिकेतून मूत्राशय, घशातून जठर व श्वासनलिका हे अवयव तपासता येतात. जठर, मूत्राशय, आतडे, इत्यादी भागांतले कर्करोग अत्यंत छुपे असतात. या तंत्राने ते चांगले तपासता येतात. तपासणीसाठी त्या अवयवाचा छोटासा भागही काढून घेता येतो.
‘दुर्बिणीच्या’ सहाय्याने केली जाणारी स्त्रीनसबंदी याच तंत्राचा वापर करून केली जाते.

हृदयालेख – इ.सी.जी.

हृदय आकुंचित- प्रसारित होत असताना विशिष्ट विद्युतलाटा वा प्रवाह तयार होतात. ह्या विद्युतलाटांची खास उपकरणांमार्फत नोंद घेऊन आलेख काढून अनेक बिघाडांचे ज्ञान होऊ शकते. हृदयाचा आकार, गति, चुकार किंवा अतिरिक्त ठोके, जवनिका-कर्णिका यांतील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा, इत्यादी अनेक कामांची माहिती यामुळे होऊ शकते.

तपासण्यांचे अर्थशास्त्र

ECG आधुनिक विज्ञानाने अनेक नवीन तपासण्या शक्य झाल्या आहेत. मात्र या सर्वांमुळे उपचारांची अचूकता वाढली आहे तशी खर्चाची बाजूही वाढली आहे. खिशातून वैद्यकीय खर्च करावे लागणा-या लोकांना हा खर्च परवडणारा नाही. गरीब लोकांना तर हा खर्च परवडतच नाही.

वैद्यकीय निदान करताना आता डॉक्टरने हात लावून तपासण्याबरोबरच खास तपासण्या (टेस्टस्) करून घेणे अपरिहार्य झाले आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये गेल्या दोन दशकांत मोठी क्रांती झाली आहे. संगणकाने सर्वच तपासण्यांमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वी क्वचित होणा-या तपासण्या आता सरासरीने अधिक केल्या जातात. यात रुग्णांचा खर्च वाढतो हे खरे आहे मात्र वैद्यकीय निदानाची अचूकता आणि उपचारांची परिणामकारकता वाढण्यासाठी विविध तपासण्या (टेस्टस्) जवळजवळ अपरिहार्य झाले आहे. उदा. पूर्वी बाळंतपणात फक्त हाताने तपासून अंदाज बांधला जात होता. आता मात्र सोनोग्राफीने बाळाची व गर्भाशयाची परस्पर स्थिती व प्रगती अचूकपणे कळू शकते. काही परीक्षणे रुग्णाची सर्वसाधारण परिस्थिती कळण्यासाठी उपयोगी पडतात. म्हणूनच वैद्यकीय परीक्षणे आता ऐच्छिक राहिलेली नाहीत.

तरीही अनावश्यक तपासण्या टाळण्यासाठी डॉक्टर वर्गानेच पुढाकार घ्यायला लागेल. रुग्ण किंवा नातेवाईक ह्याबद्दल निर्णय घेणे शक्य नाही. ब-याच वेळा दोन तज्ञांचे मत वेगवेगळे असते. त्यात खरेखोटे काय हे रुग्ण सांगू शकणार नाही. वैद्यकीय सेवांची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी व खर्चाची काटकसर करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय खास तपासणीत खालील गट व प्रकार येतात.

1. रासायनिक तपासण्या (उदा.रक्तातली साखर, बिलीरुबीन, इ.)

2. सूक्ष्मजंतू विषयक तपासण्या (क्षयरोगाचे जंतू तपासणी, विष्ठा तपासणी, एच.आय.व्ही. तपासणी)

3. पेशी परीक्षण (कर्करोगाच्या पेशी तपासणे, रक्तातल्या पेशी मोजणे, इ.)

4. शरीरातली प्रतिमाचित्रे (इमेजिंग) क्ष किरण, स्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, इको कार्डियोग्राफी, मॅमोग्राफी, इ.

5. विद्युतसंदेश लेखन – हृदयालेख (इसीजी) मेंदू आलेख (इईजी), चेतासंदेश गतिमापन, इ.

6. प्रतिघटक तपासण्या (रोगजंतूंविरुध्द प्रतिकारशक्ती व प्रतिघटक तपासण्या)

7. नलिका परीक्षण – जठर, आतडे, मूत्राशय, उदरपोकळी, इ. भागातील नलिका परीक्षण.

8. कान डोळा यासंबंधी संवेदना मापन( ऑडियोमेट्री, ऑप्टोमेट्री)

9. लैंगिक – वीर्य तपासणी, इंद्रिय उत्थापन तपासणी

10. इतर – हृदयाच्या रक्तवाहिन्यांची तपासणी (कॅथेटारायझेशन) ऍंजिओग्राफी

याशिवाय अनेक प्रकारच्या तपासण्या व त्यांचे उपप्रकार आता उपलब्ध आहेत. त्यांचे विशिष्ट उपयोग असतात. मात्र यातल्या आर्थिक व्यवहारामुळे गैरवापरही वाढत चालला आहे. वैद्यकीय नीतीमत्ता व व्यवस्थापन सुधारल्याशिवाय याचे निराकरण नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.