Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
दाह (इन्फ्लेमेशन)

दाह म्हणजे आग. पण हा शब्द इथे थोडया वेगळया अर्थाने वापरला आहे. जेव्हा रोगजंतू शरीरातल्या एखाद्या ठिकाणी हल्ला चढवतात, तेव्हा रक्तातल्या पांढ-या पेशी आणि रक्त प्रतिकण तेथे जादा प्रमाणात उतरुन रोगजंतूंशी लढतात. शत्रुसैन्य आणि आपल्या सैन्याच्या लढाईसारखाच हा प्रकार असतो. (अ) जेव्हा शत्रुसैन्य वरचढ होते तेव्हा शत्रूचे आक्रमण वाढते. (ब) आपले सैन्य यशस्वी ठरले तर लढाई आपल्या आटोक्यात येते. (क) पण समसमान बळ असेल तर लढाई धुमसत राहते. असेच रोगजंतू व पांढ-या पेशी यांमधल्या लढाईचे होते. दाहामुळे शरीरात पाच परिणाम होतात- सूज, गरमपणा, वेदना, कार्यनाश आणि पू.

inflammation
inflammation
सूज, लाली, गरमपणा

पांढ-या पेशी व रोगजंतू यांच्या लढाईत शरीराच्या संबंधित भागाचे थोडेफार नुकसान होते. तेथल्या केशवाहिन्यांमधून जास्त रक्त वाहते. आणि तेथे जास्त पाणी बाहेर पडते. जादा रक्तपुरवठा, जादा द्राव, मेलेले रोगजंतू पेशी, इत्यादी त्या भागात साठतात. याचा परिणाम म्हणजे तो भाग सुजून दुखतो. केशवाहिन्या सुजल्यामुळे तेथे जास्त रक्त उतरुन तो भाग लालसर दिसतो. तसेच ती जागा इतर भागांपेक्षा गरम लागते. या लालसरपणामुळे व गरमपणामुळे या सर्व घटनेला दाह असे समर्पक नाव आहे.

पू

ज्यावेळी मरणा-या पेशींची संख्या खूप होते त्यावेळी पू तयार होतो. अनेक जीवाणूंमुळे पू तयार होतो. पण सर्वच रोगजंतूंमुळे पू तयार होत नाही. उदा. कुष्ठरोगात पू तयार होत नाही.

ताप

अनेक प्रकारच्या जंतूंमुळे दाह निर्माण होतो. या दाहातून निर्माण होणा-या काही रसायनांमुळे शरीरात ताप येतो. ताप हा या लढाईचाच भाग असतो. यामुळे सगळीकडे रक्तप्रवाह जास्त वाहतो आणि रासायनिक प्रक्रिया वेगवान होतात.

दाहानंतर व्रण – गाठ तयार होणे

दाह कमी झाला, की सूज ओसरते व पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्या भागाचे नुकसान फार झाले असेल तर तेथील काही पेशी मृत होतात. त्या मृत पेशी काढून टाकून जोडपेशीच्या मदतीने नवीन प्रकारच्या पदार्थाने ती जागा भरुन येते. झाडाच्या खोडाला जखम झाल्यावर जशी गाठ तयार होते तशी गाठ शरीरातही तयार होते. कातडीवर या गाठी दिसून येतात, तर कातडीखालच्या गाठींचा टणकपणा जाणवतो. काही गाठी शरीरात अगदी आत असतात. शस्त्रक्रियेच्या वेळी किंवा क्ष किरण चित्रात या गाठी कधीकधी दिसून येतात.

रोगजंतूंना अटकाव न झाल्यास

शरीराची संरक्षणव्यवस्था रोगजंतूंना अटकाव करू शकली नाही तर दाह पसरू शकतो. हे रोगजंतू रक्तात किंवा अवयवात प्रवेश मिळवतात तिथून पुढे रोगजंतू अनेक ठिकाणी पसरतात.

तात्पुरता किंवा जुनाट दाह

chronic inflammation काही वेळा दाह लवकर आटोक्यात येतो तर काही वेळा येत नाही. यावरुन दोन प्रकार पाडता येतील. तात्कालिक किंवा तात्पुरता दाह – हा थोडया दिवसांपुरता किंवा आकस्मिक असतो. दीर्घदाह हा खूप दिवस किंवा महिने राहणारा असतो. (जीर्ण दाह, जुनाट दाह, चिवट दाह)

गळू होणे, दोन-तीन दिवसांसाठी डोळे येणे, घटसर्प, काळपुळी ही सर्व तात्कालिक (आकस्मिक) दाहाची उदाहरणे आहेत.

कुष्ठरोग, क्षयरोग ही दीर्घदाहाची उदाहरणे आहेत.

प्रतिकारशक्ती

दाहाचा एक चांगला परिणाम म्हणजे प्रतिकारशक्ती तयार होणे. दाहामुळे शरीराची संरक्षण व्यवस्था त्या त्या विशिष्ट रोगजंतूंविरुध्द नंतर परत लढायला ‘सिध्द’ होते. ही सिध्दता म्हणजे प्रतिकारशक्ती. दाहात ‘प्रशिक्षित’ झालेल्या पांढ-या पेशी त्या त्या जंतूंविरुध्द ‘प्रतिकण’ किंवा खास संरक्षक पेशी तयार करायला मदत करतात.म्हणजे आपले शरीर दाहानंतर नवे सैनिक व प्रतिकण-हत्यारे तयार करते.

दाह शामक औषधे

ऍस्पिरिन, स्टेरॉइड, इत्यादी औषधे दाहाची तीव्रता कमी करतात. पण ती जपून वापरायला पाहिजेत. स्टेरॉइड औषधे अनेक डॉक्टरांच्या अज्ञानामुळे, बेपर्वाईमुळे सर्रास वापरली जातात हे चुकीचे आहे. कारण दाह प्रक्रियेमुळे थोडा त्रास जाणवला तरी त्यामुळेच रोगजंतूंना अटकाव होतो. दाह ही रोगजंतूंविरुध्दची लढाई आहे, शरीराविरुध्दची नाही. आपण बरीच वेदनाशामक औषधे घेतो, ती प्रत्यक्षात दाहालाच अटकाव करतात. त्यामुळे आपल्याच संरक्षणव्यवस्थेचे आपण हात बांधून टाकतो. म्हणूनच एखादे गळू किंवा जखम झाली तर केवळ दाहविरोधी (उदा. ऍस्पिरिन) औषध देऊन उपयोगाचे नाही.

आजारांना कारणीभूत ठरणा-या सूक्ष्म जीवजंतूंचे वर्गीकरण (तक्ता (Table) पहा)

जीवजंतुविरोधी औषधे

Antiviral Medicines अनेक सांसर्गिक आजारांमध्ये डॉक्टर्स अनेक प्रकारची औषधे वापरतात. मात्र ती सगळीच काही जंतुविरोधी औषधे नसतात. त्यातली काही औषधे लक्षणे कमी करण्यासाठी दिली जातात. उदा. ताप, वेदना कमी व्हाव्यात म्हणून ऍस्पिरिन, पॅमाल देणे, इत्यादी. जीवजंतूंना विरोध करणा-या मारणा-या औषधांची नावे या प्रकरणातल्या संसर्गाच्या ‘वर्गीकरणात’ एकत्रित पाहायला मिळतील. आधुनिक औषधशास्त्राच्या प्रकरणातही यांची आणखी तपशीलवार माहिती मिळेल. प्राथमिक आरोग्यसेवकाच्या दृष्टीने ही यादी व तपशील महत्त्वाचा आहे

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.