Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
रोगांचे ‘सोपेपणावरून’ वर्गीकरण

सोबतच्या तक्त्यामध्ये आजारांचे पाच गट पाडले आहेत. गट पाडताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या आहेत.

  • रोग ओळखायला किती सोपा आहे.
  • त्यावरचे उपचार किती सोपे आहेत आणि तो आजार ओळखणे, उपाय करणे यांत किती निर्धोकता आहे.
  • अधिक (+) च्या खुणांनी या बाबींचे वजन दाखवले आहे.

एक चौथी बाब म्हणजे त्या आजारांचे समाजात सर्वसाधारण प्रमाण किती आहे हे दाखविले आहे. योगायोगाने साध्या आणि मध्यम (गट 1 व 2) आजारांचे समाजातले प्रमाण इतर गटांच्या मानाने जास्त आहे. गंभीर आजार-अपघातांचे प्रमाण आधीच्या गटांच्या मानाने कमी आहे.

ओळखायला व उपचार करायला अगदी सोपा आणि निर्धोक असलेला पहिला ‘साध्या’ आजारांचा गट तर तुम्ही प्रथम पातळीवर स्वतः हाताळायला काहीच अडचण नाही. त्या मानाने ओळखायला आणि उपचाराला जास्त प्रशिक्षण आणि कौशल्य लागणारा ‘मध्यम’ आजारांचा गटदेखील तेवढी काळजी घेऊन तुम्ही हाताळायला हरकत नाही. पण धोके लक्षात ठेवून हे काम करायला पाहिजे.

तिसरा व चौथा गट आहे ‘आकस्मिक’ गंभीर आणि ‘दीर्घ’ महत्त्वाच्या आजारांचा. हे रोग लवकरात लवकर ओळखणे म्हणजे निम्मी लढाई जिंकण्यासारखे आहे. हे काम आपण सर्वांनी नीट केले तर भारतातल्या वैद्यकीय सेवेची पुनर्रचना होऊ शकेल. असे झाले तर खरोखरच ज्यांना तज्ज्ञसेवेची गरज असेल असेच रोगी डॉक्टरांकडे जातील आणि बहुतांश रोग प्राथमिक पातळीवर बरे होतील.’आरोग्यकार्यकर्ते’ आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे, कुटिर रुग्णालये, सिव्हिल हॉस्पिटल्स यांचे परस्पर संबंध सजीव आणि सुसंगत न्याय्य व्हायचे असतील तर अशीच व्यवस्था व वर्गीकरण आवश्यक आहे.

पाचवा गट आहे अपघातांचा. इथे गरज आहे ताबडतोब योग्य ते प्रथमोपचार देऊन रुग्णास हॉस्पिटलला पाठवण्याची. आता या प्रथमोपचाराचा तपशील ठरवणेही आवश्यक आहे. तज्ज्ञ-सुसज्ज सेवा जेवढी जवळ असेल तेवढी प्रथमोपचारांची गरज कमी. याउलट जेवढे अंतर जास्त तेवढी प्रथमोपचारांची गरज जास्त. उदा. सर्पदंशाची घटना घडल्यावर योग्य सेवा मिळायला 3-4 तासांचा अवधी लागणार असेल तर गावातल्या प्रशिक्षित आरोग्यकार्यकर्त्यांनी प्रथमोपचारात इंजेक्शन देणे गरजेचे आहे. कारण हे इंजेक्शन देण्यामधल्या धोक्यापेक्षा, न देऊन तसेच तासनतास घालवण्यातला धोका कितीतरी पटींनी अधिक आहे. प्रथमोपचाराची गरज, वाव, तपशील या मुद्यांवर विचार करायला पाहिजे.

आजारांचे सोपेपणावरून वर्गीकरण (तक्ता (Table) पहा)

काही सामान्य लक्षणांवरून रोगनिदान

याआधी आपण निरनिराळया लक्षणांची माहिती घेतली. प्रत्यक्ष तपासणी कशी करतात हे आता पाहू या. या प्रकरणात दिलेले रोगनिदान तक्ते आणि मार्गदर्शकांचा योग्य वापर करून बहुतेक आजारांचे निदान करता येईल. ज्या लक्षणासाठी निदान चार-पाच तरी आजार संभवतात त्यांचेच फक्त तक्ते व मार्गदर्शक केलेले आहेत. तसेच जी लक्षणे केवळ गंभीर (उदा. बेशुध्दी) आजारातच येतात त्यांच्यासाठी तक्ते व मार्गदर्शक तयार केलेले नाहीत. कारण अशा वेळी सरळ तज्ज्ञाकडे पाठवणे गरजेचे आहे.

या तक्त्यांना, मार्गदर्शकांना पूरक ठरेल अशी तपासणी आता जरा तपशीलवार पाहू या. या प्रक्ररणात आपण पायावर सूज, डोकेदुखी, चक्कर ही 4 रोगलक्षणे पाहू या. तापासाठी स्वतंत्र प्रकरण आहे. इतर रोगलक्षणे योग्य त्या शरीरसंस्थेबरोबर दिली आहेत.

सामान्य लक्षणे आणि संस्था यांचा संबंध (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.