Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
आजार आणि साथ

काही आजार एकेकटे येतात, तर काही साथींच्या स्वरूपात. साथ म्हणजे एकावेळी अनेकांना आजार.

ताप, थंडीताप, सर्दी, खोकला, हगवण, पोलिओ वगैरे आजारांची आपल्याला माहिती आहे. या सर्व आजारांचे कारण रोगजंतू असतात. काही आजारांचे रोगजंतू एकमेकांकडे सहज पसरतात. असे काही आजार साथीच्या स्वरूपात येऊ शकतात. देवी, प्लेग, पटकी वगैरे आजारांच्या साथीबद्दल आपण ऐकलेले असते. आता देवीचा आजार संपला. प्लेगचा आजार कधी कधी येऊ शकतो. पटकीची साथ आता पूर्वीसारखी येत नाही. मात्र काही आजार अजून साथीने येऊ शकतात. डेंग्यू, चिकनगुण्या, मलेरिया, कावीळ, विषमज्वर (टायफॉईड), हगवण-जुलाब, फ्ल्यू ताप, गोवर, गालगुंड, मेंदुज्वर, लेप्टो, डोळे येणे, घसासूज, कांजिण्या हे आजार साथीने येऊ शकतात. या आजारांची थोडक्यात माहिती सोबतच्या तक्त्यात दिली आहे.

काही आजार रोगजंतूंमुळे येतात, पण ते सहसा साथीने येत नाहीत. कुष्ठरोग, टी.बी., हत्तीरोग, एड्स वगैरे आजार दीर्घ मुदतीचे म्हणजे महिनोन्महिने चालणारे असतात. या आजारांची सहसा साथ नसते, पण त्यांचे समाजात प्रमाण जास्त असेल तर आपण त्याला ‘प्रादुर्भाव’ म्हणतो.

काही आजार एकेकटया माणसांना होतात. कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह वगैरे आजारांची साथ येत नाही. ‘साथ’ हा शब्द सांसर्गिक आजारांसाठीच आहे. हे आजार एकमेकाला लागत नाहीत, पण या आजारांचे समाजातले प्रमाण वाढू शकते. या आजारांची ‘लाट’ येऊ शकते, म्हणजे प्रमाण अचानक वाढू शकते. याचा अभ्यास व्हायला पाहिजे.

आजाराची ‘साथ’ कशी ओळखायची?

समाजात ताप, जुलाब, हगवण हे आजार अधूनमधून होतातच. गावात-वस्तीत 500-1000 लोकसंख्या असते. गावात कोणा ना कोणाला ह्यांपैकी आजार रोजच चालू असतीलच. मग साथ कशाला म्हणायचे. याचा विचार दोन गटांत करू या.

(अ) नेहमीचा आजार गट – साथ म्हणजे त्या आजाराचे प्रमाण ‘नेहमीपेक्षा’ जास्त असणे. उदा. हजार वस्तीच्या गावात रोज 1-2 तापाचे रुग्ण असणे साहजिक आहे. मात्र या ‘नेहमीपेक्षा’ आजार तिप्पट असेल तर आपण साथ आहे अशी शंका घेऊ शकतो.

(आ) आगंतुक गट – काही आजार नेहमी आढळत नाहीत. उदा. डेंग्यूचा आजार कधीतरीच येईल. असा आजार जेव्हा केव्हा येईल तेव्हा तो साथ सुरू करणार असे धरावे. डेंग्यू, मेंदुज्वर, चिकनगुण्या, रक्ती हगवण, कावीळ वगैरे आजार या गटात मोडतात.

‘साथ’ आलेली आहे किंवा येणार हे लवकर ओळखणे हे महत्त्वाचे आहे. हे आपल्याला घरी बसून कळणार नाही. यासाठी आपली रुग्णसेवा नियमित पाहिजे. तरच आजार कमी, का नेहमीइतके, का जास्त हे कळू शकेल. यासाठी आपल्याकडे येणा-या रुग्णांच्या नोंदी चांगल्या पाहिजेत.

काही आजार मोसमाप्रमाणे कमी जास्त होतात. उदा. छातीचे आजार थंडी वा-यात जास्त आढळतात. आपल्याला हा वर्षातला चढउतार हळूहळू माहीत होईलच.

उपाय आहेत

गावात कोणतीही साथ आली आहे असे वाटले तर आपण खालीलप्रमाणे कृती करायची आहे.

  • साथ कोणत्या आजाराची/लक्षणाची आहे नमूद करा. उदा. हगवण, रक्ती आंव, थंडीताप, हाडमोडी ताप, इ.
  • आपल्या उपकेंद्राच्या नर्सताई किंवा आरोग्य कर्मचारी बंधूंना फोनवर किंवा चिठ्ठीने कळवा. ग्रामपंचायतीस किंवा नगरपालिकेस पण कळवावे.
  • प्राथमिक आरोग्यकेंद्राला पण असाच संदेश पाठवा.
  • चिठ्ठीवर रुग्णाचे नाव, गाव, दिनांक, लक्षणे, इत्यादी मजकूर लिहावा.
  • रुग्णावर प्राथमिक उपचार करावेत. पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात पाठवावे.
  • रुग्ण जास्त आजारी (सिरीयस) असेल तर वाहनासाठी प्रयत्न करावेत.
  • रुग्णाच्या घरात-कुटुंबात आजाराची माहिती द्यावी.
  • असाच आजार त्या घरात किंवा शेजारीपाजारी असल्या-नसल्याची खात्री करून घ्यावी.
  • योग्य ती प्रतिबंधक काळजी घ्यावी. यामुळे रोगप्रसार होणार नाही (तक्ता पाहा.)
  • अफवा पसरू देऊ नये. तशा प्रकारची जाहीर सूचना लिहिल्यास लोकांना निश्चित माहिती मिळेल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.