Health Service राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य सेवा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

Assam Activist Women भारतात सर्वत्र ग्रामीण आरोग्य सेवा दुबळी असल्यामुळे भारत सरकारने 2005 साली ग्रामीण आरोग्य मिशन सुरु केले. या आरोग्य मिशनमध्ये मागास राज्यांचा आधी समावेश केला होता. नंतर या मिशनमध्ये महाराष्ट्र व इतर प्रगत प्रांतही सामील केलेले आहेत. ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्वीच्या विविध आरोग्य योजना एकत्र करून नवीन दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे. हे मिशन 2012 साली पूर्ण होईल.

उद्दिष्टे व तत्त्वे
उद्दिष्टे
  • भारतातील बालमृत्यूदर सध्याच्या 67 वरुन निम्मा कमी करणे हे मिशनचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • सध्याचा मातामृत्यू दर हजार बाळंतपणास 3-4 मातामृत्यू आहे तो हजारी 1 पर्यंत कमी करणे हे दुसरे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • हिवताप, एड्स, क्षयरोग इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव कमी करणे हेही आरोग्यमिशनचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
  • याशिवाय आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सखोल व विस्तृत करुन त्यातून सर्वसमावेशक आरोग्यसेवा सर्व लोकांपर्यंत पोहचवणे. आज 80% लोक खाजगी सेवांचा वापर करतात. त्याऐवजी प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य सेवांचा वापर करण्यासाठी प्रयत्न करणे हे मिशनचे एक उद्दिष्ट आहे.
तत्त्वे

ayodhya district hospital हा सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी काही पायाभूत तत्त्वे राष्ट्रीय आरोग्य मिशनने अंगिकारली आहेत.

  • पहिली गोष्ट म्हणजे केंद्र सरकारचा आरोग्यावरचा खर्च 2005-06 साली सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या फक्त 1% होता तो वाढवून 2012 पर्यंत 5% पर्यंत नेणे. याचबरोबर राज्यांनीपण आपापली तरतूद वाढवणे अपेक्षित आहे. तरतूद वाढवण्याबरोबरच राज्यांनी नीटपणे हे पैसे खर्च करण्यासाठी आपापली क्षमता वाढवणे अपेक्षित आहे.
  • आरोग्यसेवा अधिकाधिक विकेंद्रीकरण करून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांकडे सोपवणे आणि त्यांनाच यामध्ये सहभागी करून घेणे हे मिशनचे अंगिकृत तत्त्व आहे. यासाठी आरोग्यसेवांचे नियोजन आणि आराखडे ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांकडून व्हावे अशी अपेक्षा आहे.
  • यासाठी जिल्हा परिषदांना व्यवस्थापन यंत्रणा पुरवण्यात आलेली आहे. यामध्ये मुख्यत: काही व्यवस्थापन तज्ज्ञ, हिशेबनीस, इंजिनीयर्स व संगणक प्रणाली हे घटक असतात. या व्यवस्थापन यंत्रणेकडून एकूण आरोग्यसेवांचे माहिती व्यवस्थापन आणि दैनंदिन कारभार नीट चालण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे.
  • आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये ही सर्व आरोग्यसेवा यंत्रणा दर्जेदार बनविण्यासाठी इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डस् ही मानक व्यवस्था केंद्र सरकारने तयार केली आहे. यात या सर्व आरोग्यकेंद्रांचा दर्जा, उपकरणे, मनुष्यबळ, देखभाल आणि सुसज्जता याबद्दल काही मानके तयार केलेली आहेत. हळूहळू ही सर्व केंद्रे ठरावीक दर्जाची व्हायला पाहिजेत. यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रे 24 तास चालू असावीत अशी अपेक्षा आहे.
  • आरोग्यसेवांचे सामाजिकीकरण करण्यासाठी म्हणजे ती समाजाच्या सहभागाने राबवण्यासाठी आरोग्य मिशनने काही योजना केल्या आहेत. यात ग्रामपंचायत पातळीवर आरोग्य समिती असून तिला दरवर्षी दहा हजार रु. निधी दिला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांवर रुग्ण कल्याण समित्या नेमलेल्या आहेत. या समित्यांनी या आरोग्य सेवांचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक प्रयत्न करावे म्हणून त्यांना अधिकार व निधी दिलेले आहेत.
  • गावपातळीवर आरोग्यासाठी स्वयंसेविका (आशा) नेमलेल्या असून त्यांनी विविध 8 प्रकारची कामे करावीत अशी अपेक्षा आहे.
  • गावपातळीवर मिशनने आरोग्यसेवा आणि अंगणवाडी यांचा संगम घडवून आणणे अपेक्षित आहे. यासाठी अंगणवाडीवर एक मासिक आरोग्य दिन पाळावा अशी योजना आहे. यामधून एकूण माता बाल आरोग्य सुधारावे अशी अपेक्षा आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.