Old Age Icon म्हातारपण
अंथरूण धरलेल्या माणसाची काळजी

Bed Man Careम्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाला खिळू शकतो. खुब्याचा अस्थिभंग, खूप अशक्तपणा येणारे आजार (उदा. कॅन्सर) हे असे त्रासदायक आजार आहेत. यात केवळ वैद्यकीय उपचारापेक्षा ब-याच प्रकारची सेवा करायला लागते. काही वेळा मरण समोर दिसत असते. तोपर्यंतचा काळ जास्तीत जास्त चांगला कसा होईल या दृष्टीनेच प्रयत्न लागतात. अशा वेळेस काय करायचे याबद्दल काही सूचना –

  • पहिली गोष्ट म्हणजे केवळ वैद्यकीय उपचाराबरोबर इतर गरजांनाही प्राधान्य द्या. उदा. कोणी आप्तेष्ट भेटायला आलेले असतील तर त्या वेळी त्यांना मोकळीक द्या. वैद्यकीय उपचारासाठी हा आनंद हिरावू नका. वैद्यकीय उपचार हे केवळ पूरक आहेत हे लक्षात घ्या. त्या व्यक्तीच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे काय आहे त्याची दखल आधी घेतली पाहिजे.
  • सहानुभूती आणि ममत्व हे ब-याच वेळा गोळया-औषधांपेक्षा जास्त महत्त्वाचे असते. त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पण सहानुभूतीची गरज असते. त्या दृष्टीने आपण वागले पाहिजे.
  • चांगली परिचर्या (नर्सिंग) ही वैद्यकीय उपचारापेक्षा जास्त महत्त्वाची असू शकते. उदा. वेळच्यावेळी स्वच्छता, अन्न भरवणे, लघवी-संडास यांची व्यवस्था वगैरे गोष्टी पाहिल्या पाहिजेत. दुर्गंध टाळण्यासाठी धूप, उदबत्ती वगैरेचा उपयोग होऊ शकतो. पडून राहण्याने पाठीवर, ढुंगणावर जखमा होतात आणि त्या खोल चरत जातात. खाली हवेची किंवा पाण्याची गादी ठेवल्याने (रबरी फुगवायची गादी), किंवा टयूब वापरून हे टाळता येते. दर पंधरा-वीस मिनिटांनी शरीराची अवस्था थोडीफार बदलून (विशेषत: कूस बदलून) त्वचेचा रक्तप्रवाह नीट ठेवला तर जखमा टळतात. यासाठी प्रशिक्षित परिचारिका/रुग्णसेविका नसली तर स्वत:च या गोष्टी शिकून घेता येतात. आणखी एक म्हणजे स्त्रियांनीच या गोष्टी केल्या पाहिजेत असे नाही; पुरुषही हे काम करू शकतात.
  • जर जेवण घेणे शक्य नसेल तर पातळ पदार्थ (पेज, खीर) भरवून पाहा. यासाठी कदाचित घशातून जठरात नळी घालावी लागेल. हेही शक्य नसले तर शिरेतून ग्लुकोज सलाईन देणे भाग पडते.
  • जर मरण नजिक असेल तर ते हॉस्पिटलमध्ये नळया लावून लांबवण्यापेक्षा घरी पोराबाळांत येणे चांगले. आजूबाजूला आयुष्यभराची साथसंगत व प्रेम असणारी मंडळी असताना जाणे हे जास्त समाधान असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.