Medicine Law Icon आरोग्य कायदा
मृत्यूचिन्हे

मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. वैद्यकीय उपायांनी तो आपण जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्राथमिक आरोग्याचे काम करताना कधीकधी मृत्यूप्रसंगात आपल्याला हजर राहण्याची वेळ येऊ शकते.

मृत्यू होतो म्हणजे वैद्यकीय शास्त्रात नेमके काय होते, काय काय खाणाखुणा दिसतात हे आपण समजावून घेऊ या. प्रसंगी मनुष्य जिवंत आहे की मृत हे तपासून ठरवावे लागते. मृत्यू टाळण्यासाठी शक्य ते वैद्यकीय उपचारही करावे लागतात. या प्रसंगात नेमके काय करायचे हे माहीत पाहिजे.

मृत्यू : जीवशास्त्रीय प्रक्रिया

वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू म्हणजे हृदयक्रिया, श्वसनक्रिया व मेंदूचे कामकाज या तीन क्रिया बंद पडणे. यांपैकी एखादी आधी तर इतर दोन क्रिया लगेच नंतर बंद पडतात. हृदयक्रिया व श्वसनक्रिया या फार परस्परावलंबी असतात. त्यामुळे एक बंद झाली की लगोलग दुसरीही बंद पडते. यानंतर दोन-तीन मिनिटांत मेंदूही निष्क्रिय होतो. इथेच जीवन संपते.

हृदयक्रिया तपासण्याचे सर्वात सोपे तंत्र म्हणजे नाडी तपासणे. अशा वेळी नाडी मनगटाऐवजी गळयामध्ये तपासावी म्हणजे निश्चित कळते. छातीवर हृदयाच्या जागी हात ठेवूनही धडधड कळू शकते. आवाजनळी असल्यास जास्त सोपे जाते.

छातीची हालचाल पाहिल्यावर श्वसन चालू आहे की नाही हे कळते. पूर्वी नाकाशी सूत धरायची पध्दत होती (सुताची हवेच्या आतबाहेर येण्यामुळे हालचाल होते, श्वसन थांबल्यावर सूत हालायचे थांबते). आवाजनळीनेही श्वसनाचे आवाज तपासता येतात.
मेंदू मृत झाल्याची सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे दोन्ही डोळयांच्या बाहुल्या मोठया होणे (विस्फारणे) . टॉर्चचा प्रकाश टाकूनही या बाहुल्या नेहमीप्रमाणे लहान होत नाहीत. मृत्यूची ही अंतिम खूण आहे.

या तीन महत्त्वाच्या घटनांपाठोपाठ नंतर हळूहळू इतर अनेक गोष्टी घडतात. स्नायू शिथिल होणे/ निर्जीव होणे, तपमान थंडावत जाणे, शरीर कडक होणे-ताठरणे इ.पण या सर्व मृत्यूनिदानाच्या दृष्टीने फारच उशिरा घडतात.
सहानुभूतीने वागा

वैद्यकीय दृष्टीने मृत्यू हा केवळ एका शरीराचा शेवट; पण मृत्यूला सामोरी जाणारी व्यक्ती, नातेवाईक, मित्र या सर्वांच्या दृष्टीने तो एका जीवनाचा शेवट असतो. मृत्यूभोवती मानवता, धर्म व संस्कृती यांची गुंफण आहे. सहानुभूतीने वागणे हे सगळयात महत्त्वाचे आहे. केवळ रुग्णाच्या दृष्टीने नाही तर आपले मन मोठे व्हावे म्हणूनही सहानुभूती महत्त्वाची असते.

वैद्यकीय प्रगती झाल्यामुळे मृत्यू लांबवणे शक्य झाल्याने बहुतेक वेळा काही ना काही उपचार केले जातातच. खेडयात तर अशा वेळी फारच धावपळ होते. वाहने नसतात, जवळपास हॉस्पिटल नसते, आणि उपचार अपुरे असतात. त्यामुळे ब-याच वेळा गावातली मंडळी तुम्हांला बोलावतील. मृत्यू झालेला आहे की नाही ते कसे ठरवायचे हे पूर्वीच आपण शिकलो आहोत.

मृत्यू अद्याप झालेला नसला तर रुग्णाचे प्राण वाचवण्याचे प्रथमोपचार करायला पाहिजेत. मात्र रुग्णालयात हलवायचे की काय याचा चटकन निर्णय घ्यायला पाहिजे. डॉक्टरांना बोलवायची पध्दत असली तरी बहुधा घरी त्यांना फारसे उपचार करता येत नाहीत. त्यापेक्षा रुग्णालयात हलवलेले चांगले. याबद्दल जे शक्य आणि लवकर होईल ते करावे. वैद्यकीय दृष्टया मृत्यू अटळ असेल तर त्या माणसाला सुखाने जाऊ देणे हे योग्य आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.