अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत पचनसंस्थेचा मार्ग नेहमी वाहता असतो. अन्नपचनाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक तेवढा वेळ अन्न या मार्गात राहते व उरलेले पुढे सरकत असते. अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते. या घटनेला आपण ‘आतडीबंद’ म्हणू या.
अशा अनेक कारणांमुळे आतडयांमध्ये अन्न सरकण्याची क्रिया बंद पडते व ‘आतडीबंद’ उद्भवतो. कधीकधी ही घटना 24 तासांत घडून येते. याउलट कर्करोग, क्षयरोगासारखे कारण असेल तर आतडीबंद होण्यास कित्येक दिवस लागतात.
एकदा पूर्ण ‘आतडीबंद’ झाला, की पोट खूप दुखते. पोट फुगते व उलटया होतात.
सुरुवातीला आतडयांचे आवाज वाढतात, पण नंतर ते मंदावतात (हे आवाजनळीने कळते).
आतडीबंद फार गंभीर घटना असते. याची शंका आल्यावर ताबडतोब रुग्णालयात पाठविणे आवश्यक असते. बहुतेक वेळा यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
मोठया आतडयाच्या सुरुवातीस पोटाच्या उजव्या बाजूस अपेंडिक्स (आंत्रपुच्छ) नावाचा करंगळीएवढा अवयव असतो. याची आतली पोकळी आतडयात उघडते. हा एक निरुपयोगी अवयव समजला जातो. तिथे कधीकधी दाह होतो व सूज येते. यालाच ‘अपेंडिक्सदाह’ म्हणतात. जंतुदोष झाल्याने त्यात पू, आजूबाजूच्या आवरणाला सूज, इत्यादी दुष्परिणाम होतात. अपेंडिक्सदाहात पोटात विशिष्ट जागी दुखते, दुखरेपणा येतो, उलटया होतात व नंतर ताप येतो. कधी कधी ऍपेंडिक्सच्या भागात सूज, गोळा येतो. ऍपेंडिक्स फुटून पू पसरला तर पोटसूज होऊ शकते.
ऍपेंडिक्सदाह हा गंभीर आजार आहे. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. काही वेळा जंतुविरोधी औषधे, तोंडाने काही न घेता, शिरेद्वारा सलाईन पुरवून ऍपेंडिक्सदाह आटोक्यात येऊ शकतो. पण असे उपचार रुग्णालयात होणे आवश्यक आहे. ऍपेंडिक्स काढून टाकले तरी बिघडत नाही म्हणून काही वेळा नाहक शस्त्रक्रियेचे प्रकार होत असतात.
सोनोग्राफीने ऍपेंडिक्सचे नक्की निदान होऊ शकत नाही.