Health Service Icon आरोग्य विज्ञाान
स्वच्छ पाणी
प्रस्तावना

शहरांमध्ये पाणीपुरवठा नद्या व धरणे यांतून होतो, तर खेडयांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी पुरवले जाते.

पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मूलभूत गरज आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा जमाखर्च बिघडणे. एकीकडे शहरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वाढता वापर ही झाली पाण्याच्या वाढत्या खर्चाची बाजू. मात्र जमिनीच्या पोटातल्या साठयात भर पडत नाही. तसेच जमिनीच्या वरच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. यामुळे पाण्याच्या जमेची बाजू लंगडी झालेली आहे. पर्यावरण बिघडल्याने पाणी जिरण्याची क्रिया दुबळी झालेली आहे. आता आपल्याला पाणी ‘अडवा-जिरवा’ साठवा-वाचवा कार्यक्रम आवश्यक आहे.

पाणी टंचाईचे कारण काही असले तरी त्याचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.

  • पाणी टंचाईमुळे स्वच्छता राहत नाही. पुरेसे पाणी असणे हे ते शुध्द असण्याइतकेच महत्त्वाचे आहे. शहरी वस्तीला दरडोई 200 लिटर (किमान 40 लिटर) रोज इतकी गरज गृहीत धरतात. (अनेक मोठया शहरांत आता इतके पाणी मिळू शकत नाही.) खेडयात शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर सोडला तर दरडोई 200 लिटर हीच गरज धरायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी मैलोन्मैल लांब पायपीट करावी लागते आणि प्रसंगी वाटीवाटीने घागरीत भरून पाणी आणावे लागते.
  • पाणीटंचाईमुळे मिळेल ते पाणी वापरावे लागते. अयोग्य वापराने असणारे साठे अशुध्द होतात त्यामुळे शुध्द पाणी मिळण्याची शक्यता कमी होते.
  • अशुध्द पाणी व कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार अशुध्द पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गॅस्ट्रो, पोलिओ, कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग, विषमज्वर, इत्यादी अनेक आजार अशुध्द पाणी व अस्वच्छता यांमुळेच होतात. यातून कुपोषण वाढते.
  • शुध्द पाणीपुरवठा व स्वच्छता या उपायांनी औषधोपचारांची गरज निम्म्याने कमी होईल. आयुर्मान वाढेल व खाल्लेले अन्न चांगले अंगी लागेल. सर्वांना शुध्द आणि भरपूर पाणी मिळणे हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.
लक्षणे

अंतर्कर्णाला सूज असेल तर चक्कर आणि मधूनमधून उलटया ही मुख्य लक्षणे दिसतात. अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब कानाघ तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

अंतर्कर्णाच्या अनेक प्रकारच्या आजारांत चक्कर येणे, उलटया होणे, कानात सूक्ष्म गुणगुण होत राहणे, इत्यादी त्रास होतो. अशा आजारात बहिरेपणा असेलच असे नाही. ही लक्षणे दिसली तर रुग्णास तज्ज्ञाकडे पाठवून द्या.

पाणी तपासणी

पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे. यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागेल. तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत (बाटली 10-15 वेळा त्याच पाण्याने धुवून) पाणी भरून 24 तासांच्या आत ते आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूच असलेली बाटली निवडावी. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत. पण अधिक निश्चित माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर विचारा.

प्रयोगशाळेत निरनिराळया तपासण्या करून, पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, मैला पाणी मिसळले आहे काय, ते पिण्याजोगे शुध्द आहे काय, याचा अहवाल मिळतो. पटकीचे (कॉलरा) जंतू आढळल्यास तारेने कळवले जाते. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुध्द करून वापरावे.

हल्ली पाणी तपासणीसाठी तयार किट्स मिळतात. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात कोली जीवाणूंसाठी पट्टी मिळते. ही पट्टी पाण्यात बुडवल्यावर तिचा रंग सेकंदानंतर बदलल्यास जीवाणू आहेत असे समजावे. याचा अर्थ म्हणजे पाणी दूषित आहे. असे पाणी शुध्द करूनच वापरावे. यासाठी ब्लिचिंग पावडर वापरावी लागेल.

बॅक्टोस्कोपने पाण्याचे जंतू प्रदूषण ओळखणे

बॅक्टोस्कोप ही सत्वर पाणी तपासणीची एक पध्दत आहे. हे किट पाबळ येथील विज्ञानाश्रमाने वापरलेले असून काही खाजगी प्रयोगशाळेतून हे प्राप्त करता येते. या किटमध्ये छोटया बाटल्यांमध्ये जंतू उगवण द्रव्य (अगार) असते. तपासायचे पाणी ठरावीक खुणेपर्यंत या बाटलीत भरावे आणि झाकण बंद करावे. 5 मिनिटेपर्यंत ही बाटली सावकाश हलवावी. यानंतर ही बाटली 24-48 तासपर्यंत खोलीत ठेवावी. (350से. तापमान) खूपच थंड हवा असल्यास झोपताना खिशात ठेवावी म्हणजे ऊब मिळेल. यानंतर बाटलीचे निरीक्षण करावे. काय दिसते त्याप्रमाणे निकाल समजून घ्यावा.

  • (अ) बाटलीत काहीही रंगबदल नाही – जंतू नाहीत.
  • (ब) पाणी काळे पडते – जंतू आहेत, हे पाणी पिऊ नये.
पाण्याची रासायनिक व भौतिक गुणधर्म तपासणी करण्यासाठी किट

पिण्याच्या पाण्यामध्ये अनेक क्षार व रसायने असू शकतात. पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी त्याची रासायनिक तपासणी करावी लागते. ही तपासणी जागच्या जागी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने एक मास्टर किट तयार करण्यात आले आहे. काही प्रयोगशाळा हे किट विकतात. एका किटमध्ये 100 रासायनिक तपासणी पट्टया असतात. याची किंमत अंदाजे 3000रु. असते. या किटचा वापर करून पुढील रासायनिक द्रव्यांची तपासणी करता येते.

पाण्यात किती क्लोरिन आहे?

या प्रश्नाचे उत्तर ऑर्थोटॉल्यूडीन चाचणीने मिळते (O.T. Test ) पध्दत

1. परीक्षानळीत 1 मिली. पाणी घेऊन त्यात 0.1 मिली ऑर्थोटॉल्यूडीन द्रव मिसळतात.

2. पाण्यात मुक्त क्लोरिन असल्यास पिवळा रंग येतो.

3. पिवळया रंगाच्या फिकट अथवा गडदपणानुसार त्यात किती क्लोरिन आहे हे बाजारात मिळणा-या तबकडीच्या रंगाशी तुलना करून समजते.

उदा. 0.1पी.पी.एम, 0.5पी.पी.एम., 1पी.पी.एम,

पाण्यातले फ्लोराईड

फ्लोराईड नावाचा एक क्षार असतो. याचे पाण्यातले प्रमाण कमी अधिक होऊ शकते व त्याचे आरोग्यावर दूरवर परिणाम होतात. फ्लोराईडचे प्रमाण जास्त असेल तर दातांवर डाग पडतात, हाडे ठिसूळ होतात व हाडांना बारीक भोके पडतात. फ्लोराईडचे प्रमाण फारच कमी असेल तर दात किडण्याचे प्रमाण वाढते.

शहरामध्ये पाणीपुरवठा करताना फ्लोराईडचे प्रमाण योग्य ठेवता येते. मात्र खेडयामध्ये याचा फारसा विचार केला जात नाही. मुळात पाणी मिळणेच दुरापास्त झाल्याने या बाकीच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जात नाही. पण गावात मुलांचे दात किडण्याचे प्रमाण फार असेल तर पाण्यातल्या फ्लोराईडची तपासणी करुन घेतली पाहिजे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.