डोळ्याचे आजार कानाचे आजार
डोळ्याचे आजार

children-eyeweakness डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे. अंधत्व हा मानवी विकासातला मोठा अडसर आहे. आपल्या देशात अंधत्वाचे प्रमाण खूप (सुमारे 1%) आहे. अंधत्वाची आपल्या देशातील प्रमुख कारणे म्हणजे कुपोषण (‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव), खुप-या रोग, मोतीबिंदू व काचबिंदू ही आहेत. यांपैकी पहिली दोन कारणे टाळण्यासारखी आहेत. मोतीबिंदूवर सोप्या शस्त्रक्रियेचा उपाय आहे. मात्र कुपोषण, खुप-यांमुळे आलेल्या अंधत्वावर बुबुळ-कलम शस्त्रक्रिया करावी लागते. डोळयांचे इतर आजार म्हणजे रांजणवाडी, दृष्टीदोष, डोळे येणे, जखमा,, इत्यादी. यांपैकी काही आजार काळजीपूर्वक प्राथमिक उपचार करून बरे करता येतात. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतून अंधत्वाचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतात अंधत्वाच्या आजारांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.

मोतीबिंदू (62%), दृष्टीदोष (लघुदृष्टी,दीर्घदृष्टी) -20%, काचबिंदू- 6%, डोळयांच्या आतील आजार- 5%, बुबुळ-फूल-1%, इतर- 6%

 

डोळयाची रचना व कार्य दृष्टीदोष

eyes structure पापणी उघडल्यावर डोळयाचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा बराच जास्त भाग आत असतो. डोळयाचा आकार गोलसर आणि मध्यम लिंबाइतका असतो. कवटीमध्ये यासाठी खोबण असते. खोबणीच्या मागच्या बाजूस छिद्र असते. त्यातून मेंदूशी संबंधित चेतातंतू आणि रक्तवाहिन्या डोळयात जातात. या नसांमार्फत दृष्टीज्ञान संवेदना जाते. काही चेतांमार्फत नेत्रगोलाशी संबंधित स्नायूंचे आकुंचन होऊन नेत्रगोलाची हालचाल होते.

अश्रू

नेत्रगोलाचा बाह्य भाग पापण्यांनी आच्छादित असतो. पापण्यांमध्ये अश्रुपिंडे असतात. यांतून सतत अश्रुजल पाझरते. रडणे, कचरा जाणे, दाह होणे, इत्यादींमुळे जास्त अश्रुजलाची गरज निर्माण होते. मात्र डोळयांचा नेहमीचा ओलेपणा हा पापण्यांच्या इतर बारीकबारीक ग्रंथींतून पाझरणा-या स्रावांमुळे असतो.

डोळयात पाझरणारे हे द्रवपदार्थ नाकात वाहून नेण्यासाठी नलिका असते. पापण्यांच्या नाकाकडच्या टोकावर काळजीपूर्वक पाहिल्यास एकेक छिद्र दिसेल. डोळयांतले पाणी या छिद्रांमध्ये शोषले जाते व नलिकेमार्फत नाकात उतरते. म्हणूनच रडताना नाकात पाणी उतरते. या नलिकांना सूज येते तेव्हा हे पाणी अडून डोळा सतत ‘पाझरतो’. यालाच लासरू म्हणतात.

नेत्रअस्तर

पापण्यांच्या आतला भाग व डोळयाचा पांढरा भाग (श्वेतमंडल किंवा शुभ्रमंडल) यांवर एक नाजूक आवरण असते. या आवरणावर ब-याच सूक्ष्म रक्तवाहिन्या दिसून येतात. मात्र हे आवरण बुबुळाशी संपते. बुबुळावर रक्तवाहिन्या अजिबात नसतात. या आवरणाला मराठीत नाव नाही. या पुस्तकात आपण याला नेत्रअस्तर म्हणू या. ‘डोळे येतात’ तेव्हा खरे तर हे नेत्रअस्तर सुजते. यामुळे त्यावरच्या रक्तवाहिन्या विस्फारून रंग अधिक लालसर दिसतो. पूर्वी दाह या प्रक्रियेबद्दल आपण वाचले आहे. गरमपणा, वेदना, लाली, सूज, इत्यादी दाहाची सर्व लक्षणे या आजारात दिसून येतात. कधीकधी हे नेत्रअस्तर बुबुळावर चढून वाढते, यालाच वेल वाढणे असे नाव आहे.

डोळयाची बाहुली

मधल्या बुबुळाचे आपण काळजीपूर्वक निरीक्षण करु या. त्याच्या आत एक लहान मोठे होणारे छिद्र (बाहुली) दिसून येईल. बाहुलीचे ‘लहान-मोठे होणे’ हे त्या बाजूच्या वर्तुळाकार स्नायुपटलावर अवलंबून असते. या स्नायुपटलाला कृष्णमंडल (काळे असल्याने) असे नाव आहे. डोळयाचा रंग निळा, घारा, काळा दिसतो तो या स्नायूंच्या रंगामुळेच. याचे स्नायुतंतू सैल-आखूड होण्यावर बाहुली लहान मोठी होते. प्रकाश जास्त असला की स्नायू सैल होऊन बाहुली लहान होते व कमी प्रकाश डोळयात जातो. याउलट अंधारात बाहुल्या मोठया होतात. कारण त्या वेळी दिसण्यासाठी उपलब्ध प्रकाशापैकी जास्तीत जास्त प्रकाश आत जाणे आवश्यक असते.

प्रकाशकिरणांच्या तीव्रतेवर बाहुलीचे हे लहानमोठे होणे हे एका प्रतिक्षिप्त क्रियेमुळे होते. या प्रतिक्षिप्त क्रियेचे महत्त्व फार आहे. मरणासन्न बेशुध्दीत ही क्रिया होत नाही. मृत्यूची निश्चित खूण म्हणून डॉक्टर डोळयावर बॅटरीचा उजेड पाडून बाहुलीच्या आकारात बदल होतो की नाही ते तपासतात. मृत्यूनंतर बाहुल्या कायमच्या विस्फारतात व ही क्रिया होत नाही.

मेंदूत रक्तस्राव किंवा गाठ, इत्यादींमुळे एका भागात दाब आला असल्यास विशिष्ट बाजूची ही क्रिया मंदावते यामुळे दोन्ही डोळयांच्या बाहुल्यांत फरक पडतो. म्हणूनच डोक्यास मार लागला असेल तर ही क्रिया तपासली जाते.

बुबुळ

बुबुळ हा काचेसारखा अत्यंत पारदर्शक भाग असतो. कृष्टमंडळावर पुढून तो झाकणासारखा बसवलेला असतो. यात रक्तवाहिन्या अजिबात नसतात. आजूबाजूच्या द्रवपदार्थातूनच याच्या पेशी प्राणवायू व साखर घेतात. याला चेतातंतू असतात, आणि हा भाग खूप संवेदनाक्षम असतो. थोडासा ओरखडा देखील खूप दुखतो. आपल्याला बुबुळ कसे आहे याची कल्पना कॉन्टॅक्ट लेन्स वरुन येऊ शकते.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेत बुबुळाच्या कडेला चीर पाडून भिंगारोपण करून परत शिवले जाते.

भिंग व नेत्रमगज

कृष्णमंडलामागे भिंग (म्हणजे नेत्रमणी) असते. निरोगी अवस्थेत नेत्रमणी अगदी पारदर्शक असल्याने दिसत नाही. मात्र मोतीबिंदूमुळे त्याचे अस्तित्व जाणवते. नेत्रमणी बहिर्गोल असल्याने बाहेरचे प्रकाशकिरण त्यातून आरपार गेल्यावर पुढे एकत्र येतात. यामुळे बाहेरची प्रतिमा आत नेत्रपटलावर पडते. भिंगातून पडलेली प्रतिमा नेत्रपटलावर स्पष्ट पडते. नेत्रमणी थोडासा लवचिक असतो. स्नायू ताणल्यामुळे नेत्रमणी थोडा चपटा किंवा फुगीर होऊ शकतो. त्यामुळे बाहेरच्या वस्तूच्या अंतराप्रमाणे नेत्रमणी थोडासा चपटा किंवा फुगीर होऊन प्रतिमा स्पष्ट होते.

नेत्रमण्याच्या मागे द्राक्षाच्या मगजसारखा (नेत्रमगज) अगदी पारदर्शक पदार्थ असतो. सर्व नेत्रगोल यानेच भरलेला असतो.

नेत्रपटल

नेत्रगोलाची आतली मागची भिंत नेत्रपटलाने बनलेली असते. नेत्रपटल म्हणजे असंख्य संवेदनाक्षम पेशींचा पडदा असतो. प्रकाश, रंग, इत्यादी संवेदना या पेशींमार्फत मेंदूकडे पोचवल्या जातात. अतिरक्तदाब, मधुमेह व इतर काही आजारांत नेत्रपटल बिघडते आणि दृष्टी अधू होते.

नेत्रपटलापासून निघालेले चेतातंतू खोबणीच्या छिद्रातून मेंदूत शिरतात आणि मेंदूच्या मागे असलेल्या दृष्टीकेंद्रात पोचतात.

दृश्यप्रतिमा

प्रकाशकिरण बुबुळातून शिरून, नेत्रमणी, नेत्रमगज, इत्यादी पार करून नेत्रपटलापर्यंत जाऊन प्रतिमा स्पष्ट पडणे हे चांगल्या दृष्टीसाठी आवश्यक असते. प्रकाशाच्या मार्गात काही अडथळे येणे (फूल पडणे, मोतीबिंदू, इ.) किंवा प्रतिमा स्पष्ट न पडणे हे दृष्टीदोषांचे कारण असते.

प्रतिमा नेत्रपटलाच्या अलीकडे किंवा पलीकडे पडत असेल तर दृष्टीदोष तयार होतात. कृत्रिम भिंग वापरून (चष्मा) ही प्रतिमा नेत्रपटलावर स्पष्ट पाडता येते. पण त्यासाठी नेमके कसले भिंग पाहिजे याचा अभ्यास करणे आवश्यक असते. या तपासणीला आपण ‘नंबर काढणे’ असे म्हणतो.

दृष्टीदोष

reading paper दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते. डोळयाच्या बाहुलीतून प्रकाशकिरण आत शिरून भिंगातून एकत्र होतात. यामुळे आतल्या पडद्यावर वस्तूची प्रतिमा उमटते. या प्रतिमेचे ज्ञान मेंदूपर्यंत पोहोचून आपल्याला दृष्टीज्ञान होते. जेव्हा प्रकाशकिरण आंतरपटलाच्या मागे किंवा पुढे एकत्रित होतात तेव्हा दृष्टीदोष होतो. डोळयाची बाहुली आणि पडदा यांमधले अंतर कमीजास्त असेल तर प्रतिमा पडद्यावर अचूक व स्पष्ट पडत नाही. अशा वेळेला चष्मा वापरून (भिंग) हा दोष घालवता येतो. यासाठी नेत्रतज्ज्ञाची मदत घ्यावी लागते.

 • लघुदृष्टी – सर्वसाधारणपणे लहान वयात येणारा दृष्टीदोष लघुदृष्टी प्रकारचा असतो. म्हणजे ‘जवळचे दिसते पण लांबचे कमी दिसते’ या स्वरुपाचा हा दोष असतो. याचे कारण म्हणजे हा नेत्रगोल लांबट अंडाकृती असतो. त्यामुळे लांबची चित्रप्रतिमा नेत्रगोलाच्या आतल्या नेत्रपटलावर पोचत नाही म्हणून धूसर दिसते. भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर जास्त असणे हे याचे कारण असते.

  यामुळे मुले पुस्तक जवळ धरतात. मुलांना फळयावरचे नीट दिसत नाही. मुलाला ही अडचण नेमकी न सांगता आल्यामुळे वर्गात बोलणीही खावी लागतात. (घरात टी.व्ही. असल्यास मूल टी.व्ही. जवळ बसून बघते.)

 • दीर्घदृष्टी – दीर्घदृष्टी म्हणजे लांबचे दिसते पण ‘जवळचे
  कमी दिसते’ या स्वरुपाचा हा दोष असतो. या दोषामध्ये वस्तुपासून निर्माण होणारी प्रतिमा आंतरपटलामागे तयार होते.

  भिंगापासून नेत्रपटलापर्यंतचे अंतर कमी असणे हे याचे कारण असते. (याचे कारण म्हणजे नेत्रगोल थोडा चपटा असतो.) यामुळे वाचताना त्रास होणे, डोळे चोळणे, वाचताना कपाळावर आठया, तिरळे पाहणे, इ. त्रास होतो. सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो.

  सर्व मुलांची डोळयांची तपासणी (यंत्राने) करणे आवश्यक आहे. यावर वेळीच उपाय न झाल्यास मोठेपणी चष्मा देऊनही दृष्टी सुधारत नाही.

  चाळिशीनंतरच्या दृष्टीदोषात लांबचे नीट दिसते, पण जवळचे दिसण्यासाठी (धान्य निवडणे, वाचणे, शिवणे) चष्मा वापरावा लागतो.

 • अस्टिगमॅटिझम (बुबुळ वक्रता) – बुबुळ वक्रतेमधील होणा-या बदलामुळे स्पष्ट दिसत नाही. यात डोळयामध्ये स्पष्ट प्रतिमा कोठेच निर्माण होत नाही. या विकारावर भिंग म्हणजे चष्मा लावावाच लागतो.
दृष्टीदोषाची लक्षणे
 • डोळयांवर ताण पडल्याने डोके दुखते. (ही डोकेदुखी कपाळावर दोन्ही डोळयांच्या मधल्या भागात येते).
 • फळयावरील छोटी अक्षरे मुलांना वाचता न येणे.
 • फळा किंवा टी.व्ही., इ. दूरच्या वस्तूंकडे बघताना डोळे बारीक करणे.
 • वाचताना पुस्तक तोंडाजवळ धरणे.
 • जवळचे किंवा लांबचे नीट न दिसणे.
 • जास्त तास वाचन केल्यास डोळयांवर ताण पडणे.
 • तिरळेपणा दिसणे.
 • डोळे किंवा डोकेदुखी.
 • सुईत दोरा ओवताना, धान्य निवडताना त्रास होतो.
दृष्टीदोषावरील उपचार
 • दृष्टीदोषाच्या प्रकाराप्रमाणे योग्य चष्मा वापरावा लागतो. लहान वयात येणा-या या दृष्टीदोषावर योग्य प्रकारचे भिंग (चष्मा) वापरून दृष्टी सुधारता येते.
 • वयाच्या 15व्या वर्षानंतर यासाठी योग्य कॉन्टॅक्ट लेन्स वापरता येईल. यासाठी नेत्रतज्ज्ञ मदत करतील. कॉन्टॅक्ट लेन्सचे अनेक प्रकार आहेत. यात सॉफ्ट (लवचिक) आणि सेमी सॉफ्ट (अर्ध लवचिक) असे मुख्य प्रकार आहेत. हल्ली यात अगदी अल्प किमतीत महिनाभर वापरून झाल्यावर टाकून देण्याचे (डिसपोझेबल्स) कॉन्टॅक्ट लेन्स उपलब्ध आहेत.
 • लघुदृष्टी किंवा दीर्घदृष्टीवर लेसर किरणोपचार करून बुबुळाचा आकार सूक्ष्मरित्या बदलता येतो. याला ‘लेसिक’ असे नाव आहे. या उपचाराने चित्रप्रतिमा नेत्रपटलावर आणता येते. यामुळे चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सच्या ऐवजी डोळयाचा नंबर दुरुस्त करता येतो. ही शस्त्रक्रिया 18च्या वयानंतरच केली जाते. मात्र ही पध्दत पूर्णपणे निर्धोक नाही. यातून बुबुळाच्या आकार-वक्रतेचा फरक एकदा झाला की तो बदलता येत नाही. या उपचारासाठी खर्चही बराच आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.