Pregnancy Childbirth Icon गरोदरपणातील काळजी
गरोदरपणातील सामान्य काळजी
प्रास्ताविक

Childbirth गरोदरपण व बाळंतपण ह्या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी या अवस्थांमध्ये अनेक प्रकारच्या लहान – मोठया तक्रारी व धोके संभवतात. गरोदरपण व बाळंतपण दोन्ही सुखरुप होणे, मुल निरोगी व सुरक्षित असणे, मातेचे आरोग्य सुरक्षित राहणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निसर्गातील इतर प्राण्यांमध्ये गरोदरपण, बाळंतपण वगैरे गोष्टी सहज आणि निर्धोक घडत असतात असा एक समज आहे. मात्र प्राण्यांपेक्षा माणसाचे बाळंतपण काही प्रमाणात जास्त अवघड आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे मानवी अर्भकाचे डोके शरीराच्या तुलनेने इतर प्राण्यांपेक्षा जास्त मोठे आहे. गरोदरपण आणि बाळंतपण (त्यानंतरचे सहा आठवडे) या घटनांशी संबंधित आजारांचे आणि माता मृत्यूंचे प्रमाण भारतात तुलनेने फारच जास्त आहे ( म्हणजे दर हजार बाळंतपणांत चार माता- मृत्यू).

आपल्या देशात ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक बाळंतपणे घरी होतात. बरीच बाळंतपणे सुखरुप होत असली तरी काही बाबतींत धोके संभवतात. गरोदरपणात, बाळंतपणात काय काय काळजी घ्यायची असते, धोके कसे ओळखायचे याबद्दल आपण या प्रकरणात थोडक्यात पाहू या. मात्र गरोदरपण व बाळंतपण सुखरुप पार पाडण्यासाठी व त्यातले बारकावे समजण्यासाठी जास्त प्रशिक्षणाची (व त्यासाठी खास पुस्तकाची) गरज आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमार्फत आता बाळंतपण रुग्णालयातच करावे असे प्रयत्न आहेत.

गर्भधारणेचे निदान
मासिक पाळी चुकणे

Inspect the Inside of the Womb नेहमी पाळी नियमित असेल व आता मासिक पाळी चुकून दोन आठवडयांपेक्षा जास्त दिवस गेले असतील तर गर्भ धारणेची शक्यता धरावी. पाळी चुकून वर एक-दोन महिने गेले असतील व गर्भधारणेची इतर लक्षणे असतील तर खात्रीने सांगता येते. मात्र काही स्त्रियांची पाळी अनियमित असते, दोन-दोन महिने येत नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत खात्री देता येत नाही. त्यासाठी इतर तपासणीची मदत लागेल.

सकाळी येणारी मळमळ

ब-याच स्त्रियांना गर्भधारणेनंतर पहिल्या तीन-चार महिन्यांत सकाळी उठल्यानंतर मळमळ, क्वचित उलटी होते. शरीरातले ‘स्त्रीरस’ (स्त्रीसंप्रेरक-इस्ट्रोजेन) वाढल्याने असे होते. काही स्त्रियांना असा अनुभव येतच नाही, तर काहींना याचा फार त्रास होतो.

स्तनांचा आकार

गर्भावस्थेत स्तनांचा आकार वाढतो व ते जडावतात. बोंडाची त्वचा हळवी व काळसर होते. स्तनांमधील हा फरक पहिल्या गर्भधारणेच्या वेळी जास्त उठून दिसतो. एकदा काळसर झालेले बोंड प्रसूतीनंतरही तसेच राहते.

तपासणी – लघवी तपासणी

पाळी चुकल्यानंतर 10 दिवसांतच लघवी तपासून गर्भनिदान करता येते. गर्भाच्या वाढीबरोबर काही विशिष्ट संप्रेरके तयार होतात व ते लघवीत उतरतात. गर्भपात करायचा नसेल तर याही तपासणीची आवश्यकता नाही.

तपासणी – आतून तपासणी

तीन महिन्यांच्या आधी गर्भाशय खूप आत असते. म्हणून अशा वेळी आतून (म्हणजे योनिमार्गातून) तपासणी करावी लागते. गर्भपात करून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर गर्भनिदान होणे आवश्यक असते व त्यासाठी ही तपासणी करताना ‘आतली’ दोन बोटे आणि पोटावरचा हात यांमध्ये गर्भाशय पकडून त्याचा आकार व तोंडाचा मऊपणा हे तपासले जाते. गर्भ नसलेले गर्भाशय निबर लागते व त्याचा आकार मोठया लिंबाइतका असतो. गर्भधारणेनंतर आकार वाढत जातो व गर्भाशयाचे तोंड मऊ होते. मात्र या तपासणीसाठी थोडाफार अनुभव पाहिजे.

पोटावर गर्भाशय हाताला लागणे

पाळी चुकून साधारण 3 महिन्यांनंतर गर्भाशय पोटावरून हात लावून कळू शकते. आठवडे, महिने जातील तसा त्याचा आकार वाढत जातो. तपासणीसाठी आल्यावर स्त्रीला आधी लघवी करून यायला सांगावे. लघवी केल्याने लघवीची पिशवी ( मूत्राशय) रिकामी होते, तेव्हा गर्भाशयाचा आकार नीट कळतो. नाही तर गर्भाशयाच्या आकाराबद्दल गैरसमज होणे शक्य असते, गोलसर, घट्ट, वाढलेल्या आकाराचे गर्भाशय हाताला लागल्यावर गर्भधारणेची खात्री धरायला हरकत नाही. मात्र या तपासणीसाठी चार महिने तरी पूर्ण व्हावे लागतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.