Roustabout Health Icon व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य
व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य

Vyavasayjanya Ajar मानवी जीवन हा एक सतत संघर्ष आहे. आदिमानवांनी जेव्हा पहिल्यावहिल्या शिकारी केल्या असतील किंवा अन्नाच्या शोधात वणवण केली असेल तेव्हापासून कितीतरी धोके त्याच्या मागे आहेत. असे कितीतरी आदिमानव श्वापदांचे बळी ठरले असतील, कितीतरी जखमा त्यांनी सोसल्या असतील. मनुष्य आता कितीतरी प्रगत झाला आहे. काही थोडे मनुष्यसमूह अजूनही ‘कंदमुळे-फळे-शिकार’ या जीवनचक्रात असले तरी बहुसंख्य लोक अनेकविध कामधंदे करतात. संगणकयुगात तर अनेक गोष्टी बटन दाबून घडू शकतात.

पण आदिमानवांना जसे व्यावसायिक धोके होते तसे आजही सर्वत्र आहेत, फक्त व्यावसायागणिक त्यांचा प्रकार बदलला आहे. व्यवसायही काही चांगले तर काही मनुष्यजातीला कलंक लावणारे (उदा. वेश्याव्यवसाय आणि भंगीकाम). प्रत्येक कामधंद्याचा माणसाच्या शरीरमनावर बरावाईट परिणाम होतो. काही व्यवसायांचा शरीराच्या काही भागांवर चांगला परिणामही होतो, उदा. लोहाराचे पीळदार स्नायू किंवा डोंबा-याचे लवचीक शरीर. पण या व्यवसायातही धोके, आजार आहेतच.

व्यावसायिक दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाय करणे हे आता एक शास्त्र झाले आहे. कारखान्यांमध्ये कामगारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी कायदे आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर यासाठी संघटनाही आहे. ही संघटना (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) सर्व देशांमध्ये कामगारांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पाहण्या करते व सुधारणा सुचवते. मात्र भारतासारख्या देशात कारखान्यांच्या बाहेरच जास्त कामकरी जनता आहे. तिचे आरोग्य पाहण्यासाठी काहीही यंत्रणा नाही. उदा. शेतीव्यवसायातल्या लोकांचे आजार व त्यात असलेले धोके याबद्दल फारसे संशोधन झालेले नाही. असंघटित कामगार, बालकामगार, वेश्या, भंगीकाम करणारे, इ. गट असेच दुर्लक्षित आहेत.

व्यावसायिक आजारांचे वर्गीकरण

vyavasayjanya-ajar2 निरनिराळ्या कामधंद्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे धोके आणि आजार संभवतात. त्यांची पुढीलप्रमाणे एक यादी करता येईल.

इजा किंवा शारीरिक तणाव यांमुळे दुष्परिणाम (भौतिक घटकांचे दुष्परिणाम)

काम करताना हातोडयाचा किंवा कु-हाडीचा घाव बसणे, पडणे, लागणे वगैरे अपघात तर अनेक वेळा होतात. अशा प्रत्यक्ष माराऐवजी अप्रत्यक्ष शारीरिक ताणाचाही त्रास असतो. टाइपिंग करणा-याला होणारा बोटांचा व पाठीचा त्रास, शेतात काम करणा-या स्त्रियांना होणारी कंबरदुखी, वाहतूक-नियंत्रक पोलिसांना होणारा पायांचा त्रास वगैरे बरीच उदाहरणे आहेत.

याशिवाय उष्णता, गारठा, किरणोत्सर्ग, हवेचा दाह, ध्वनिप्रदूषण-गोंगाट, सतत कंपन सहन करणे, विद्युत धक्के इ. हे सर्व इजांचे प्रकार आहेत.

सूक्ष्म धूलिकणांचे दुष्परिणाम

गिरणीमध्ये श्वासावाटे पीठ शरीरात जाणे, कापड गिरणीत कापसाचे जंतू फुप्फुसात जाणे, हळदीच्या कामगारांना हळदधुळीचा श्वसनात त्रास होणे, खडी कारखान्यात सिलिकॉसिसचा त्रास, इ.

Vyavasayjanya Ajar
Vyavasayjanya Ajar
रासायनिक दुष्परिणाम

व्यवसायजन्य परिस्थितीत काही घटक ताबडतोब परिणाम करणारे असतात (ऍसिड अंगावर उडणे, विषारी वायू फुप्फुसात जाणे). याउलट काही रसायने शरीरावर हळूहळू परिणाम करतात. उदा. फॉस्फरस.

जैविक दुष्परिणाम

प्राणी, जीवजंतूंपासूनचे धोके साप, विंचू, कुत्रे यांचे दंश, गाईगुरांपासून होणा-या जखमा, जंतकृमी, लिंगसांसर्गिक आजार हे सर्व या गटात मोडतात.

मानसिक दुष्परिणाम

कामाच्या ठिकाणी मानसिक ताणतणाव सतत राहिल्याने कायमस्वरूपी विकार जडू शकतात. व्यसनांचे मूळही यात असू शकते. अपघाताचा धोका असलेल्या कामांतही मनावर मानसिक ताण असतो. (उदा. वाहनचालक)

अनेक क्षेत्रांत निरनिराळे व्यवसायजन्य आजार असतात. यांतल्या काहींची दखल घेतली जाते पण बहुतेकांकडे दुर्लक्ष होते. अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून हे स्वीकारावे लागते. तरी जेथे जमेल तेथे व्यवसायजन्य आजार-धोके कमी करणे किंवा टाळणे यासाठी चांगले प्रयत्न हवेत. याबद्दल काय काय करता येते हे पुढे दिले आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.