skin iconत्वचाविकार
ऍलर्जी किंवा वावडे

ब-याच वेळा अंगावर गांध येते, खाज सुटते व पुरळ येतात, ती जागा लाल होते. याला पित्त उठणे असे म्हटले तरी पित्तरसाचा व या घटनेचा काही संबंध नाही. बहुतेक वेळा हा एक ‘वावडया’ चा (ऍलर्जी) प्रकार असतो.

शरीरास नकोशा पदार्थाच्या ऍलर्जी (वावडे) मुळे त्वचेचा दाह होतो. या पदार्थाचा प्रत्यक्ष संबंध कातडीशी येतो किंवा इंजेक्शन अथवा अन्नातून तो पदार्थ शरीरात जातो. अशा नकोशा पदार्थाविरुध्द शरीराची प्रतिक्रिया येते. यालाच ‘वावडे’ म्हणतात. पेनिसिलीन या औषधाला येणारी रिऍक्शन (प्रतिक्रिया) अशीच असते.

वावडे कोठल्याही पदार्थाचे येऊ शकते. ऊन, वातावरणातील बदल, फुलांचे बहर, औषधे, कीटकनाशके, प्राणी, कीटक, वनस्पती, आहारातले पदार्थ यांपैकी कोठलेही पदार्थ वावडयाला कारणीभूत ठरू शकतात.

तसेच आज ज्या वस्तू शरीराला चालतात त्यांचे काही काळाने ‘वावडे’ येऊ शकते.

तात्पुरते वावडे असेल तर गांध, पित्त उठणे अशा नावाने ते ओळखले जाते.

जुनाट वावडयाच्या आजारात बरीच खाज सुटते. संबंधित त्वचा लाल होते, पुरळ येतात व खाजवल्यावर पाणी व रक्त सुटते. काही लोक यालाच ‘इसब’ म्हणतात.

वावडयाचे प्रमाणही कमीअधिक असू शकते.

उपचार
  • नुसती गांध असेल तर ओली चिकणमाती (लेप) लावल्यास बरे वाटते.
  • वावडे असलेल्या पदार्थाचा संबंध टाळणे.
  • खाज थांबवण्यासाठी सी.पी.एम. नावाची गोळी द्यावी. या गोळीने तासाभरात खाज थांबते. मात्र त्याचा परिणाम चार-सहा तासच टिकतो. म्हणूनच दिवसातून दर सहा-आठ तासांनी एक गोळी घ्यावी लागते. बहुधा एक-दोन दिवसांत हा त्रास थांबतो. मात्र या गोळीने झोप येते. म्हणून जोखमीचे काम (वाहन चालवणे, यंत्रावर काम करणे) करणा-याने ही गोळी रात्री झोपतानाच घ्यावी. किंवा गोळी घेतल्यावर विश्रांती घ्यावी. सिट्राझिन प्रकारच्या गोळयांमध्ये हा दोष सौम्य असतो. त्यामुळे त्या सी.पी.एम. पेक्षा जास्त चांगल्या ठरतात.
  • जंतुदोष (पुरळ) झाला असेल तर सोबत 5 दिवस कोझाल उपचार आवश्यक आहे.
होमिओपथी निवड

एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, कल्केरिया कार्ब, सीना, कॉस्टिकम, फेरम फॉस, हेपार सल्फ, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर

उवा होणे

lice उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात.

उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात – शाळेत जवळ बसल्याने उवा एकमेकांमध्ये पसरतात.

उपचार
  • रॉकेल व खोबरेल तेल निम्मे मिसळून रात्री डोक्यास किंवा खाज असलेल्या भागात चोळून लावावे. किंवा याऐवजी बी.एच.सी. चे (गॅमा) पातळ औषध डोक्याच्या केसांना चोळून चोळून लावावे. दुकानात उवांसाठी बाटल्याही मिळतात.
  • औषध लावल्यानंतर सकाळी बारीक दातांच्या फणीने मेलेल्या उवा, लिखा काढून टाकाव्यात. यानंतर डोके साबण आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.
  • आठवडयाभरात परत औषध लावावे लागते. कारण चुकून राहून गेलेल्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात, त्या माराव्या लागतात.
  • कपडयांवरच्या उवा मारण्यासाठी कपडे उन्हात ठेवावे. बी.एच.सी. पावडर कपडयांना लावली तरी उवा मरतात.
घरगुती उपाय
  • उवांवर सीताफळाच्या पानांचा किंवा बियांचा रस लावणे हा एक उपाय आहे. यासाठी सीताफळाची कोवळी पाने काढून कुटून त्यांचा रस डोक्यास केसांमध्ये चोळून लावावा.
  • याऐवजी आणखी एक उपाय म्हणजे खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल डोक्याला, केसांना चोळून लावणे.
डोक्यातील कोंडा

डोक्यात कोंडा होणे ही तक्रार खूपदा आढळते. स्त्रिया व पुरुष या दोघांनाही हा त्रास होऊ शकतो. डोक्यात खाज आणि कोंडयाप्रमाणे कण पडणे ही मुख्य लक्षणे असतात. डोक्याप्रमाणेच नाकाच्या बाजूलाही हा त्रास आढळतो. कोंडा म्हणजे त्वचेच्या वरच्या थराच्या पेशींचे पुंजके असतात. या त्रासामागे मुख्य कारण म्हणजे यीस्ट नावाची बुरशी असते. यीस्ट ही बुरशी शरीरावर सर्वत्र आढळते, मात्र कोंडा होण्यामागे त्याची एकच प्रजाति कारणीभूत असते. कंगव्याच्या व कपडयांच्या संसर्गाने कोंडा-बुरशी एकमेकांना लागते.

उपचार

कोंडा म्हणजे यीस्टसाठी अनेक बुरशीनाशक औषधे आहेत. अनेक शांपूंमध्ये कोंडानाशक औषधे असतात. तसे त्यावर लिहिलेले असते. आंघोळीच्या वेळी शांपू वापरला की कोंडयाचे प्रमाण कमी होते. साधारणपणे 2-3 आंघोळींना शांपू वापरला की कोंडा जातो.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, ब्रायोनिया, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, लायकोपोडियम, नेट्रम मूर, -हस टॉक्स, सेपिया, सिलिशिया, सल्फर, थूजा

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.