Cancer Icon कर्करोग
रोगनिदान व उपचार
रोगनिदान

Cancer कर्करोगाचे रोगनिदान लवकर होणे आवश्यक आहे. मात्र मुद्दाम विशेष प्रयत्न केले तरच हे शक्य असते. यासाठी खास शिबिरे भरवता येतील.

आपल्या देशात तोंड व गर्भाशयाचा कर्करोग यांचे प्रमाण सगळयांत जास्त आहे. ह्या दोन्हीही जागा सहज तपासता येतात. या दोन्हींचे निदान कर्करोगाच्या पूर्वप्राथमिक स्थितीतही पेशी तपासणीने करता येणे शक्य आहे. स्तनांचा कर्करोगही लवकर शोधता येतो.

 • गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग ओळखण्यासाठी त्यावरच्या पेशी काचपट्टीवर पसरवून विशेष परीक्षेसाठी पाठवता येतात. याला पॅप-तपासणी असे म्हणतात. त्यात कॅन्सरपूर्व स्थिती स्पष्ट कळते. प्रसाराआधी या अवस्थेत किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून मोठा धोका टाळता येतो. रक्त तपासणीत विशिष्ट विषाणूंची चिन्हे दिसल्यास रंगाबद्दल पूर्वसूचना मिळते.
 • तोंडामध्ये चट्टा आला असेल तर त्याचीही अशीच तपासणी करुन लवकर उपचार करता येतात.
 • स्वयंतपासणीने स्तनाचा कर्करोग लवकर कळू शकतो.
 • सोनोग्राफी हे महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. याने पोटातील कर्करोग लवकरात लवकर कळून येतो.

इतर अवयवांच्या कर्करोगांसाठी मात्र लक्षणांवरून अनुमान करणे व त्वरित तज्ज्ञाकडे पाठवणे इतकेच शक्य आहे.

कर्करोगातील तपासण्या

Breast कर्करोगात अनेक प्रकारच्या तपासण्या कराव्या लागतात. रोगनिदान, पायरीचे निदान आणि उपचाराला प्रतिसाद मोजण्यासाठी अनेक वेळा निरनिराळया तपासण्या कराव्या लागतात. याची थोडक्यात माहिती खाली दिलेली आहे.

कर्करोग पेशी तपासणी – यामध्ये कर्करोगाच्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो. नमुना घे-यासाठी प्रत्यक्ष छोटा तुकडा काढून किंवा सुईने अंतर्गत गाठीचा नमुना घेणे यापैकी योग्य ते तंत्र वापरावे लागते. काही बाबतीत गाठ किंवा व्रण खरवडून किंवा झाडून पेशी घेतल्या जातात. प्रत्येक कर्करोगाप्रमाणे त्याचे योग्य तंत्र ठरलेले आहे. या पेशीतपासणीनंतर कर्करोगाचे प्राथमिक निदान, प्रकार, आक्रमकता याचा अंदाज येतो.

चित्र तपासणी – सोनोग्राफी, क्ष-किरण, सीटीस्कॅन, एम.आर.आय, रक्तवाहिनी चित्र, इ. निरनिराळया चित्रण तंत्राने कर्करोगाच्या गाठींचे आणि प्रसारांचे नेमके चित्र कळू शकते. काहीवेळा पूर्ण शरीराचा स्कॅन पण करावा लागतो.

रक्ततपासणी – रक्त तपासण्यांमध्ये रुग्णाची एकूण परिस्थिती कळण्यासाठी रुटीन किंवा विशेष तपासण्या केल्या जातात. याशिवाय कर्करोग विशिष्ट द्रव्ये शोधण्यासाठी काही खास तपासण्या उपलब्ध आहेत. यात एच.पी.व्ही. विषाणू, टयूमर मार्कर्स, इ. तपासण्या येतात.

एंडोस्कोपी – एंडोस्कोपी म्हणजे नलिका दुर्बिणीने अंतर्भागाची तपासणी करणे. या तंत्राने स्वरयंत्र, श्वासनलिका, अन्ननलिका, जठर, मोठे आतडे, मूत्राशय, स्त्रीबिजांड, गर्भाशय, इ. अवयवांचे निरीक्षण करता येते. या तंत्राने कर्करोग निदानात फारच प्रगती झालेली आहे. शिवाय या नलिकेतून याच वेळी संशयित गाठीचा नमुनाही घेता येतो.

टयूमर मार्कर – निरनिराळया कर्करोगांमुळे रक्तात विशिष्ट द्रव्ये आढळतात. यांना टयूमर मार्कर असे म्हणतात.

मॅमोग्राफी – ही तपासणी स्तनाच्या कर्करोगासाठी वापरतात. यात स्तनातल्या रक्तवाहिन्यांचा फोटो काढून गाठीची शक्यता तपासतात.

कर्करोग पायरी किंवा अवस्था ठरवणे

Bidi Kamgar एकदा कर्करोगाचे निदान झाले की त्याचा प्रकार, टप्पा, पायरी, इत्यादी बाबी निश्चित कराव्या लागतात. यावरून उपचारांचा तपशील व यशाचा अंदाज करता येतो. हल्ली यासाठी टी.एन.एम. कोड वापरला जातो. टी (T) म्हणजे टयूमर म्हणजे गाठ. एन (N) म्हणजे नोड म्हणजे अवधाण. एम (M) म्हणजे मेटास्टासिस म्हणजे इतर अवयवात प्रसार. रक्ताचा कर्करोग सोडून बहुतेक कर्करोगांच्या निदानात या तीन बाबी विचारात घ्याव्या लागतात. कर्करोग पसरला नसल्यास शस्त्रक्रिया हा मुख्य उपाय ठरु शकतो. तो पसरला असल्यास मुख्यत: रासायनिक उपचार आणि/किंवा किरणोपचार करावे लागतात.

कर्करोगाचा टप्पा ठरवण्यासाठी इतरही काही पध्दती प्रचलित आहेत. याचा अंदाज अर्थातच अनेक तपासण्यांनंतरच लागतो.

उपचार
 • काही अपवाद वगळता कर्करोगाचे उपचार खर्चीक, दीर्घसूत्री, पीडादायक व ब-याच वेळा मर्यादित उपयोगाचे असतात.
 • गर्भाशयाचे, स्तन व तोंडाचे कर्करोग प्राथमिक अवस्थेत शस्त्रक्रिया करून पूर्णपणे काढून टाकता येतात. यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.
 • रससंस्थेचा कर्करोग (सुटयासुटया, रबरासारख्या गाठी येणे) उपचाराने बरा होण्याची शक्यता असते. यासाठी परिणामकारक औषधे निघाली आहेत.
 • रक्ताचा कर्करोगही उपचाराने बरा होऊ शकतो.
 • स्वरयंत्र, स्तन, इत्यादींचे कर्करोगही लवकर शोधून काढून टाकता येतात किंवा किरणोत्सर्गी उपचार करून बरे करता येतात. (कर्करोगाचे किरणोत्सर्ग हे एक कारण आहे आणि एक उपचारदेखील.)

कर्करोगावरचे उपचार तीन प्रकारचे आहेत

 • शस्त्रक्रिया करून काढून टाकणे
 • किरणोत्सर्गी उपाययोजना
 • कर्करोगविरोधी औषधे

यापैकी एक किंवा जास्त उपाययोजना गरजेप्रमाणे केली जाते.

कर्करोगाची शक्यता लक्षात घेऊन लवकर निदानासाठी डॉक्टरकडे पाठवणे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो.

कर्करोग उपचार ही बरीच गुंतागुंतीची गोष्ट असते.

शस्त्रक्रिया असेल तर ती गाठ मुळापासून अवयवासहित काढण्याची गरज असते. अर्थात काही अवयव पूर्णपणे काढता येत नाहीत.

रासायनिक उपचार हे शरीराच्या पेशींना देखील मारक व प्रतिकूल असतात. म्हणूनच शरीरातील इतर अवयवांचे व पेशींचे त्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. या उपचारानंतर शरीरावर दूरगामी आणि खोलवर परिणाम होतात. केस गळणे, भूक जाणे, थकवा, रक्तनिर्मिती थांबणे, प्रतिकारशक्ती थंडावणे (त्यामुळे संसर्ग) वगैरे घातक परिणाम होतात. यासाठी पूरक उपचार, विश्रांती, इत्यादी उपायांनी शरीर सावरून धरावे लागते. काही आठवडयांनी हे परिणाम थांबतात व शरीर हळूहळू सावरते. रासायनिक उपचाराच्या अनेक फे-या कराव्या लागतात.

किरणोपचार हा ही मुळात दाहक उपचार असतो. पेशींची वाढ थांबवण्यासाठी त्याचा वापर केला असतो. फक्त कर्करोगग्रस्त भागात त्याचा मारा करण्यासाठी आता आधुनिक यंत्रे आहेत. यात मुख्यत: दोन प्रकार आहेत. (अ) टेलिथेरपी म्हणजे किरणांचा दुरून मारा करणे. (ब) ब्रॅकिथेरपी म्हणजे जवळून मारा करणे. कर्करोग शरीराच्या आत खोलवर आहे की वरवर यावर सर्व ठरते. खोल आजार असला तर टेलिथेरपी लागते. त्वचा, तोंड, हातापाय, इ. भागात असेल तर ब्रॅकिथेरपी करता येते. ब्रॅकिथेरपीने इतर शरीराचे नुकसान कमीत कमी होते.

किरणोपचाराचे देखील दुष्परिणाम असतातच.

याशिवाय संप्रेरकांचा उपचार काही कर्करोगांमध्ये केला जातो. यात मुख्यत: स्तनांचा कर्करोग आणि प्रॉस्टेट ग्रंथीचा कर्करोग यांचा समावेश आहे. कर्करोगाविरुध्द प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काही प्रयत्न सुरु आहेत. यात शरीराची प्रतिकारशक्ती त्या कर्करोगाविरुध्द वापरण्याचा प्रयत्न केला जातो.

लाक्षणिक उपचार

ब-याच वेळा कर्करोग निदान उशिरा झालेले असते. उपचारांनंतरही काही लाक्षणिक उपचार करावे लागतात. मूळ कर्करोग उपचाराशिवाय हे जे लाक्षणिक उपचार केले जातात त्यांचा उपयोग रुग्णाचे जीवन सुसह्य करण्यासाठी केला जातो. रुग्णाचे उरलेले एकूण जीवन सुधारण्यासाठी याचा फार उपयोग होतो. वेदना, मळमळ, उलटी, जुलाब, रक्तस्त्राव, शय्याव्रण (फोड आणि जखमा) थकवा, मानसिक नैराश्य, इ. अनेक त्रास रुग्णाला होत असतात. हा त्रास काही प्रमाणात कमी करणे शक्य असते. डॉक्टर आणि नातेवाईकांनी यासाठी प्रयत्न करावेत. हल्ली घरगुती शुश्रुषेसाठी प्रशिक्षित आरोग्यसेवक उपलब्ध होऊ शकतात.

यासाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी खास प्रशिक्षण संस्थाही सुरु झाल्या आहेत.

याशिवाय कर्करोग रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसाठी अनेक बाबतीत समुपदेशनाची गरज भासते.

निदान, उपचार, आर्थिक बाबी, मदत निधी, रुग्णाची ने-आण, घरगुती उपचार, उपचारांचे दुष्परिणाम, एकूण यशापयश वगैरे अनेक बाबतीत सल्लामसलत लागते. ही मदत रुग्णालयाने उपलब्ध करायला पाहिजे.

1. तोंडातील कर्करोग : न भरून येणारा चट्टा, व्रण, गाठ, जबडयाखाली व नंतर मानेत टणक अवधाण.

2. घसा : गिळायला त्रास, घशात गाठ, व्रण, गळयातील मानेवर टणक अवधाण.

3. स्वरयंत्र : आवाजात बदल, आवाज बसणे, स्वरयंत्राची आरशाने तपासणी करावी लागते. मानेत अवधाण

4. श्वसनसंस्था : सतत खोकला, कधीकधी खोकल्यातून रक्त पडते, क्ष-किरण चित्रात डाग दिसून येतो.

5. अन्ननलिका : गिळायला त्रास, अन्न छातीत अडकल्यासारखे वाटणे.

6. जठर : भूक मंदावणे, जठरात अन्न जास्त वेळ राहिल्याने जडपणा, अर्धवट पचलेले किंवा न पचलेले अन्न उलटणे, पोटात हाताला गाठ लागणे, उलटीत कधीकधी रक्त

7. मोठे आतडे व गुदाशय : शौचातून कधी रक्तस्राव, शौचविसर्जनाच्या सवयीत बदल, बध्दकोष्ठ.

8. स्तन : स्तनात टणक गाठ, न भरून येणारा व्रण, काखेत टणक अवधाण.

9. गर्भाशयः अचानक रक्तस्राव, योनिमार्गाच्या तपासणीत गर्भाशयाच्या तोंडावर गाठ, खरखरीतपणा दिसणे, कधीकधी ओटीपोटात गोळा लागणे.

10. रक्त : रक्तस्रावाची प्रवृत्ती, यकृत, पांथरी सुजणे, सतत जंतुदोषाचे आजार (विशेषकरून लहान वयात येणारा कर्करोग.)

11. स्त्रीबीजांडे : ओटीपोटात किंवा त्यावर गोळा तयार होणे.

12. पुरुषबीजांडे : अंडवृषण मोठे होणे, कठीण लागणारी सूज.

13. शिश्न :शिश्नावरच्या त्वचेला किंवा टोकाला खरबरीत गाठ येणे, मधूनमधून रक्तस्राव.

14. मूत्राशय : अधूनमधून लघवीवाटे रक्तस्राव, खास नलिका घालून तपासणीत निश्चित निदान.

15. प्रोस्टेट ग्रंथी : लघवीत अडथळा, थेंबथेंब पूमिश्रित लघवी, इत्यादी, गुदद्वारातून बोट घालून तपासल्यावर कडक, टणक गाठ लागते.

16. यकृत : कधीकधी यकृताचा आकार वाढतो. कधीकधी कावीळ व पांढरी विष्ठा.

17. हाडे : हाडावर टणक सूज. वेगाने वाढणारी, न दुखणारी, विशेषतः मांडीच्या हाडाच्या खालच्या टोकाशी आढळणारी वाढ.

18. रसग्रंथी : ठिकठिकाणी सुटेसुटे रबरी गोळयासारखे अवधाण विशेषतः गळपट्टी, मानेतील अवधाण, ताप व वजन कमी होणे (विशेषकरून लहान वयात येणारा कर्करोग.)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.