Health Service देशोदेशीची आरोग्य व्यवस्था आरोग्य सेवा
देशोदेशीची आरोग्य व्यवस्था
आरोग्यसेवेचे महत्त्व…

प्रत्येक देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षण आणि आरोग्य ही मानव-विकासाची मूलभूत क्षेत्रे आहेत. गेल्या शतकात प्रत्येक देशामध्ये एक स्वतंत्र आरोग्यव्यवस्था तयार होत गेली. त्या त्या देशाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्रवैज्ञानिक परिस्थितीप्रमाणे आरोग्यव्यवस्था घडत गेल्या. मात्र अफगाणिस्तानसारख्या काही देशात सततच्या संघर्षामुळे आरोग्यसेवा विकसित होऊ शकल्या नाहीत. आपल्या देशात मिश्र आरोग्यव्यवस्था आहे. यात ग्रामीण-शहरी दरी, कमजोर सरकारी तर प्रबळ खाजगी आरोग्यसेवा निर्माण झाली आहे. आपल्या आरोग्यासमोर ब-याच समस्या आहेत. देशोदेशीच्या प्रयोगांमधून आणि विकसित प्रारुपांमधून आपणही काही नवीन प्रयोग करू शकू. म्हणूनच निरनिराळया देशांच्या आरोग्यव्यवस्थांचे सारांशाने स्वरुप या प्रकरणात दिले आहे.

शासनाची जबाबदारी

बहुतेक सर्व देशांमध्ये आरोग्यसेवा ही कल्याणकारी शासनाची अंगभूत जबाबदारी मानली जाते. म्हणजेच सरकार स्वत:च आरोग्यसेवा चालवते किंवा सामजिक विमा पध्दतीने आरोग्यसेवेची व्यवस्था करते. बहुतेक देशांमध्ये खाजगी वैद्यकीय सेवेला फारसा वाव नाही. अनेक देशांमध्ये शासन गोळा केलेल्या करांमधून काही टक्के खर्च आरोग्यसेवेवर करते. उदा. इंग्लंडमध्ये सरकारी खर्चाच्या सुमारे 10% रक्कम राष्ट्रीय आरोग्यसेवेवर खर्च होते. यातून डॉक्टरांचा आणि कर्मचा-यांचा पगार देऊन आरोग्यसेवा चालवल्या जातात. याला कर-आधारीत आरोग्यव्यवस्था म्हणता येईल. दुस-या काही देशांत सार्वत्रिक सामाजिक आरोग्य विमा योजना आहेत. उदा. जर्मनीमध्ये सर्व नागरिकांकडून आरोग्य विम्याची रक्कम कापून राष्ट्रीय आरोग्य फंडात जमा होते. यातून आरोग्यसेवा चालवल्या जातात. म्हणजेच शासन आणि राष्ट्रीय आरोग्य फंड यात थोडे अंतर असते. देशोदेशी अशा सार्वत्रिक आरोग्य सेवेची अनेक प्रारुपे आहेत. ब-याच युरोपियन देशांमध्ये उत्तम आरोग्यसेवा असतात आणि तिथली सरकारे या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आरोग्यसेवा चालवत असतात.

मात्र अनेक देशांमध्ये शासनाने आरोग्यसेवेची जबाबदारी पूर्णत: पत्करलेली नाही. अनेक विकसनशील देशांमध्ये ही समस्या आहे. या देशांमध्ये शासकीय आरोग्यसेवा अपु-या असल्याने लोक पारंपरिक व खाजगी आरोग्यसेवा वापरतात. भारत हे अशा देशांचे ठोस उदाहरण आहे. भारतात 75% जनता खाजगी आरोग्यसेवा वापरते. जगातल्या अनेक गरीब देशांमध्ये ही परिस्थिती आढळते. तसेच अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्येही हीच व्यवस्था आहे. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न अनेक राष्ट्रांनी चालविला आहे. मात्र यात अनेक समस्याही आहेत.

आरोग्यसेवेपुढच्या समस्या

काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चालला आहे. शासकीय आरोग्यसेवा यामुळे अडचणीत येत आहेत. यावरही काही पर्याय आहेत. उदा. आरोग्यसेवेची रचना त्रिस्तरीय करून प्राथमिक स्तरावर 60-70% आरोग्यसेवा देता आल्यास बराच खर्च वाचतो. निरनिराळया देशांमध्ये यासाठी निरनिराळया प्रकारची प्राथमिक आरोग्यसेवेची व्यवस्था आहे.

वाढता खर्च आणि तंत्रज्ञान

Fullbody Checkup सर्व शासकीय आरोग्यसेवांपुढे हे एक मोठे आव्हान आहे. आरोग्यसेवांचा खर्च सतत वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, मधुमेहासारख्या दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण या सर्वांमुळे आरोग्यसेवांवरचा खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक शासनांसमोर हा खर्च कसा पेलायचा हे एक आव्हान आहे. अनेक युरोपियन देशांतून भारतात परदेशी नागरिक उपचारासाठी येतात. याचे कारण त्या देशांमधल्या आरोग्यसेवा पु-या पडत नाहीत आणि त्यांची प्रतीक्षा यादी वाढत आहे.

शहरे-खेडे विषमता

अनेक देशांमध्ये कमी अधिक ग्रामीण भाग असतोच. अमेरिका व युरोपमध्ये देखील असे ग्रामीण भाग आहेत. अविकसित देशांमध्ये 70-80% पर्यंत ग्रामीण जनता असते. बहुतेक देशांमध्ये खेडे-पातळीवर आरोग्यसेवा पुरवणे हे मोठे अवघड काम आहे. याचे मुख्य कारण ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती बरी नसते आणि सामाजिक सोयी कमी असतात. यामुळे डॉक्टर आणि नर्सेस त्या ठिकाणी रहायला तयार नसतात. यामुळे अनेक देशांमधील खेडयांमध्ये प्रशिक्षित आरोग्य कार्यकर्ते नेमून काम चालवले जाते. निरनिराळया देशांमध्ये असे कार्यकर्ते निरनिराळया नावांनी ओळखले जातात. काही देशांमध्ये परिचारिकांनाच आणखी प्रशिक्षण देऊन ग्रामीण आरोग्यसेवा चालवल्या जातात.

डॉक्टरची आणि नर्सेसची टंचाई

अनेक विकसित देशांमध्ये डॉक्टरी पेशाकडे ओढा कमी असल्यामुळे मनुष्यबळाची टंचाई आहे. या टंचाईमुळे गरीब देशातले डॉक्टर आणि नर्सेस प्रगत देशात पगार आणि राहणीमानाच्या ओढीने स्थलांतर करतात. युरोप,अरब देश, अमेरिका, कॅनडा इ. देशांमध्ये गरीब देशांमधून असे स्थलांतर झालेले आहे. भारत, क्युबा, ब्राझील, फिलीपाईन्स इ. देशांमधून गेली अनेक वर्षे डॉक्टर आणि नर्सेस देशांतर करत असल्याने या देशांमध्ये आरोग्यसेवा कमजोर झालेल्या आहेत. अमेरिकेत प्रत्येक रुग्णालयात भारतीय डॉक्टर्स आणि नर्सेस सापडतात हे त्याचमुळे.

औषधांच्या किंमती

गेल्या काही वर्षात औषधांमध्ये खूप संशोधन होऊन नवनवीन औषधे उपलब्ध झाली आहेत. या औषधांची किंमत पूर्वीच्या औषधांच्या तुलनेने जास्त आहे. यामुळे आरोग्यसेवांचा खर्च वाढत चालला आहे. आजही लोकांचा आरोग्यसेवेच्या खर्चाचा एक मोठा भाग औषधांचाच असतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.