यकृताखाली पित्ताची एक पिशवी (पित्ताशय) असते. त्यात दाह झाल्यावर नंतर खडे तयार होतात. खडयांमुळे पित्ताशयातून कळा येतात. या कळा उजव्या बरगडीखालून सुरू होतात. त्याबरोबर उलटी होण्याचा संभव असतो. पित्तखडयांची वेदना फार तीव्र असते.
काही पित्तखडे पोटाच्या क्ष-किरण चित्रात दिसतात. काही प्रकारचे खडे मात्र दिसत नाहीत. मात्र निश्चित निदानासाठी सोनोग्राफीचा उपयोग होतो. (सोनोग्राफी ही एक फोटो काढण्याची पध्दत आहे. यात ध्वनिकंपने वापरतात.) क्ष किरणाच्या मानाने ही पध्दत निरुपद्रवी आणि या कामासाठी जास्त उपयुक्त आहे.
पित्तखडयांची कळ अगदी तीव्र असते. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरकडे पाठवून द्यावे. कळ थांबण्यासाठी मॉर्फिनचे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्शन अफूपासून तयार करतात. हल्ली पेंटाझोसिन नावाचे एक वेदनाशामक इंजेक्शन दिले जाते, तेही अगदी परिणामकारक आहे.
वारंवार त्रास असल्यास पित्तखडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागतात.
हा आजार गंभीर स्वरुपाचा असतो. पित्ताशयाचा दाह असेल तर ताप, उजव्या बरगडीखाली कळ व दुखरेपणा, उलटी, इत्यादी मुख्य लक्षणे असतात. शंका आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे.
स्वादुपिंड ही जठर व लहान आतडयाच्या मागे असणारी एक ग्रंथी आहे. या ग्रंथीतून नळीवाटे पाचकरस लहान आतडयात सोडले जातात. तसेच या ग्रंथीत काही विशिष्ट पेशीसमूह ‘इन्शुलीन’ या संप्रेरकाची निर्मिती करतात. (इन्शुलीनच्या अभावाने किंवा अपुरेपणामुळे मधुमेह हा आजार होतो.)
स्वादुपिंडाचे आजार क्वचित होतात. त्यात मुख्यत: जंतुदोष-सूज, खडा व कर्करोग हे आजार येतात. दारू पिणा-यांमध्ये स्वादुपिंडसूज इतरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. स्वादुपिंडाच्या कर्करोगात – उशिरा- पित्तमार्गावर दबाव येऊन कावीळ होते.
स्वादुपिंडाच्या सुजेची किंवा खडयाची वेदना बेंबीजवळ आढळते. ही वेदना अत्यंत तीव्र व खुपसण्याप्रमाणे असते. या वेदनेने रुग्ण पोट दाबून, हातपाय जवळ ओढून असहायपणे एका कुशीवर पडून राहतो. या आजाराची शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा.