Health Friends Icon आरोग्यमित्र आरोग्य सेवा
आरोग्यमित्र

Mahatma Ggandhi देशातल्या शेवटच्या माणसाची उन्नती होणे हाच देशाच्या प्रगतीचा मापदंड आहे असे गांधीजींनी म्हटले होते.त्या काळी त्यांनी सांगितलेल्या आणि करून पाहिलेल्या साध्यासोप्या गोष्टी आपण अजूनही करू शकलो नाही. दारिद्रय आणि रोगराई हटवणे हे मुख्य काम. नवशिक्षणाची सुरुवात स्वच्छतेपासून होते असे गांधीजी म्हणत. संडासांची सोय ही अगदी प्राथमिक गोष्ट आहे, त्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले. आरोग्यरक्षणाच्या साध्या सोप्या, निसर्गाला जवळ अशा पध्दतींचा गांधीजींनी जन्मभर प्रसार केला. आधुनिक विज्ञानाला त्यांनी नाकारले नाही. पण आयुर्वेदाचेही अवडंबर केले नाही. निसर्गोपचार गांधीजींना जवळचे वाटत. स्वातंत्र्याच्या थोडया आधी त्यांनी एका वैद्यराजांच्या मदतीने वर्ध्यात एका आयुर्वेद अभ्यासक्रमाची तयारी चालवली होती. त्यातून तयार झालेले विद्यार्थी खेडोपाडी लहानमोठी वैद्यकीय सेवा देऊ शकतील अशी त्यांची अपेक्षा होती. महाराष्ट्रात 40-50% लोकसंख्या शहरातून व छोटया नगरातून राहते. झोपडपट्टया व गरीब वस्त्यांची संख्याही खूप आहे. प्राथमिक आरोग्यसेवेची इथेही खूप गरज असते.

गांधीजींची ही कल्पना भारतात फारशी फलद्रूप झाली नाही पण साठसत्तर सालानंतर अनेक देशांमध्ये खेडोपाडी प्राथमिक आरोग्यरक्षणाचे कार्यक्रम सुरू झाले. चीन, जमेका, फिलिपीन्स, येमेन, न्यू गिनी, कोलंबिया, सुदान, थायलंड, मेक्सिको इ. अनेक छोटयामोठया देशांत असे प्रयोग झाले. चीनने तर यात खूप यश मिळवले.

Dr. Dasgupta Book अजूनही आपल्या देशात खेडोपाडी आरोग्यसेवा उपलब्ध करायची असल्यास याच मार्गाने आपल्याला जावे लागणार. भारतात दर वर्षी हजारो डॉक्टर्स शिकून बाहेर पडत असले तरी ते खेडयांच्या वाटयाला येण्याची शक्यता अगदी कमी. डेव्हिड वेर्नर या लेखकाने तर ‘डॉक्टर नसेल तेथे’ या नावाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. यात डॉक्टरशिवाय खेडयात काय काय करता येईल याची तपशीलवार मांडणी केलेली आहे. अशा पध्दतीने काम करणा-या कार्यकर्त्यास भारतात विविध ठिकाणी विविध नावे आहेत – आरोग्यरक्षक, आरोग्यमार्गदर्शक, आरोग्यदूत, भारतवैद्य. उपेक्षित भारतातल्या लाखो खेडयांमध्ये काम करण्यासाठी छोटा पण उपयुक्त अभ्यासक्रम या पुस्तकात आहे.

हे काम हाती घ्यायचे तर या पुस्तकाचा वाटाडया म्हणून उपयोग होईल. हे पहिले प्रकरण आपल्याला कोठल्या दिशेने जायचे आहे ते सांगण्यासाठी लिहिलेले आहे. प्रत्यक्ष काम करताना तुम्ही यापेक्षा कितीतरी अधिक शिकाल. हा केवळ नकाशा दाखविण्याचा प्रयत्न आहे.वाटचाल तर तुम्हांलाच करायची आहे.

कोठलेही काम करायचे तर त्यासाठी साधने लागतात. तसेच तुमच्याकडे तीन गोष्टी असणे आवश्यक असते, त्या म्हणजे कामाची माहिती (ज्ञान), कौशल्ये आणि मुख्य म्हणजे मनोवृत्ती (भावना). पुस्तके वाचून, काम करून ज्ञान व कौशल्ये मिळवता येतात. या पुस्तकातली पुढची सर्व प्रकरणे आरोग्यवैद्यकीय ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत. हे सुरुवातीचे प्रकरण मनोभूमिका तयार करण्यासाठी वाहिलेले आहे. आरोग्य समस्यांकडे कोणत्या नजरेने पाहायचे, काम करताना काय काय पथ्ये पाळायची याबद्द्ल मनोभूमिका कामातून घडत जाते. पण सुरुवातीस त्याची थोडी कल्पना यावी म्हणून काही सूचना या प्रकरणात आहेत. पुस्तक वापरताना आणि काम करताना वेळोवेळी त्या मदतीला येतील.

उध्दार नाही, हातभार!

लोक स्वत: प्रगती करू इच्छितात, त्यांना उध्दार करणा-याची गरज नसते. आपण त्यांचा उध्दार करू शकत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. आपण केवळ त्यांना मदतीचा हात देऊ शकतो. शिवाय लोक स्वत: एखादी गोष्ट करायला उत्सुक नसतील, तयार नसतील तर थोडा धीर धरणे बरे. घाई केली तर ते काम होईलच असे नाही. आपण उपकारकर्त्याची भूमिका मनात ठेवली तर लोक केवळ तुम्हांला तोंडदेखला मान देतील किंवा मतलबाने वागतील. मित्राच्या भूमिकेतून हात देण्याची भूमिका मनात बाळगली तर सहजपणे काम करता येईल.

हे काम कशासाठी करायचे?

आपण आरोग्याचे काम करायचे ते कशासाठी? स्वत:शी विचार करून याचे उत्तर शोधले पाहिजे. निरनिराळया व्यापारधंद्यांचा नफा मिळवणे हा उद्देश असतो. पण शिक्षण, आरोग्यसेवा, कला आणि क्रीडा यांतून जीवन समृध्द होते, आनंदाने जगता येते. या कामातून स्वत:ला आणि इतरांना आनंद देणे हा मुख्य उद्देश असायला पाहिजे. तसे झाले नाही तर कामाचे लोढणे होते. आपला मुख्य उद्देश लोकांना ‘बरे करणे’, त्यातही ‘आजारी पडू न देणे’ अशा प्रकारचा असावा. सगळे सुखी असावेत, कोणी दु:खी असू नयेत ही प्रार्थना अंगी बाणली पाहिजे.

आरोग्य कार्यकर्त्याची भूमिका

आपण नेमके काय काय करायचे आहे हे थोडे आधी ठरवू या. असे काम करणारे जगभरचे कार्यकर्ते काय काय करू शकतात याचा आढावा घेऊन आपण त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करू या.

  • देशोदेशीचे आरोग्यरक्षक गावात दुखण्याखुपण्यावर इलाज करतात. अवघड आजार असल्यास डॉक्टरांकडे पाठवतात. हे काम आपणही करू शकतो. या पुस्तकात साधे आजार कोणते, मध्यम कोणते, गंभीर कोणते यांचा एक तक्ता दिला आहे. यापैकी साध्या व मध्यम आजारांना गावातच बरे करण्याची कला आपण शिकून घेतली पाहिजे.
  • गंभीर आजार सापडल्यास योग्य ती प्राथमिक मदत करून आपण त्यांना पुढच्या उपचारासाठी वेळीच पाठवले पाहिजे. गंभीर आजार आकस्मिक असतील (सर्पदंश, मेंदूसूज वगैरे) किंवा दीर्घकाळ चालणारे असतील (उदा. क्षयरोग, कर्करोग इ.) तर लवकरात लवकर त्यांना पुढच्या उपचारासाठी पाठवले पाहिजे. यात उशीर झाला तर या कामाचा काही उपयोग होणार नाही.
  • अपघातात योग्य तो प्रथमोपचार करणे आपले एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. जखमा, सर्पदंश, भाजणे, विंचू चावणे वगैरे अनेक अपघात घडत असतात. त्यात नेमके काय करायचे हे वाचून ठेवा. शिकून घ्या. वेळप्रसंगी वाचायला वेळ मिळणार नाही. शिकलेलेच कामी पडेल. योग्य प्रथमोपचार दिले तर लोक तुमचे नाव घेतील.
  • जे आजार टाळण्यासारखे आहेत त्यांचा योग्य तो प्रतिबंध करण्याचा प्रयत्न चालू ठेवा. यात गांवकरी, पंचायती, सरकारी कर्मचारी, शिक्षक वगैरे जे मदत करतील त्यांची मदत घ्या. अशा कामांची एक यादीच करा. उदा. पाणी शुध्द ठेवणे, डबकी न होऊ देणे, संडासांचा प्रसार, मच्छरदाणीचा वापर, नखे कापणे, अन्नपदार्थ झाकून ठेवणे, स्वच्छता ठेवणे, लसटोचणी, बालकांचे आरोग्यतक्ते इ. करण्यासारखी अनेक कामे आहेत. शक्ती अजमावून एकेक हाती घ्या. हे काम तुमचे एकटयाचे नाही, इतरांची मदत घ्या किंवा त्यांना मदत करा.
  • आरोग्यशिक्षणाचा प्रसार करा. शाळांमध्ये, शिक्षकांमध्ये यासाठी विशेष कार्यक्रम घ्यायला पाहिजे. प्रत्येक गटाच्या दृष्टीने काही ना काही विषय महत्त्वाचा असतो. दारू, धूम्रपान वगैरे विषय मोठयांच्या गटामध्ये घेतले पाहिजेत. वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आरोग्यशिक्षण चालूच ठेवा. याची फळे मोजता येत नाहीत आणि लगेच दिसतही नाहीत पण नुसत्या औषधगोळयांपेक्षा हे काम महत्त्वाचे आहे. असे विषय शेकडो आहेत आणि पुस्तकात जागोजागी तुम्हांला ते दिसतीलच.
  • स्थानिक साधनसामग्रीचा वापर करा. अशी औषधे घरी आणून तयार करून ठेवा. काही वनस्पती ठरावीक काळातच मिळतात. त्यांचा संग्रह करून ठेवा. लोकांनाही त्याची उपयुक्तता पटवून द्या. काही वनस्पती घरी लावता येतील. अशी एक यादी करा व प्रत्यक्ष वापर करा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.