Exercise Icon व्यायाम आणि खेळ आरोग्यासाठी योगशास्त्र
स्नायूंना ऊर्जा कशी मिळते?

पहिला टप्पा – तात्पुरती ऊर्जा : जेव्हा आपण व्यायाम सुरु करतो तेव्हा स्नायूपेशी आपला इंधनाचा ‘सदैव तयार’ असलेला ऊर्जाभाग वापरतात. त्यासाठी प्राणवायूची गरज नसते. ही ऊर्जा जास्तीत जास्त 40 ते 60 सेकंदांपर्यंत पुरते. जणुकाही बॅटरीसेलप्रमाणेच ही ऊर्जा मिळते. समजा तुम्हाला बस पकडण्यासाठी अचानक पळावे लागले, किंवा कुत्रा पाठीमागे लागला वगैरे प्रसंगी काही सेकंद पळण्यासाठी एवढी ऊर्जा पुरते. मात्र या ऊर्जा वापरातून बरेच लॅक्टिक आम्ल तयार होऊन रक्तात मिसळते. या आम्लाने काही जणांना डोके दुखणे, थकवा, इत्यादी त्रास जाणवतो. काही वेळानंतर हे परिणाम निघून जातात. खर्च झालेली ऊर्जा परत भरून येण्यासाठी (म्हणजे सेल परत चार्ज होण्यासाठी) थोडासा अवधी जातो.

दुसरा टप्पा – रक्तातील साखर : पहिल्या 40 ते 60 सेकंदांनंतर स्नायूंना काम करण्यासाठी रक्तातले ग्लुकोज वापरावे लागते. यासाठी प्राणवायूची गरज असते.

तिसरा टप्पा – चरबी व ग्लायकोजेन वापर : जेव्हा रक्तातली साखर संपते तेव्हा म्हणजे 20-25 मिनिटांनंतर रक्तातील स्निग्ध पदार्थ वापरायला सुरुवात होते. यालाही प्राणवायू लागतो. जर व्यायामाची सवय असेल तर यकृत ग्लायकोजेन साठा भरपूर वाढवून ठेवते. कसलेल्या खेळाडूंना 4-5 तासांपर्यंत साठा पुरतो. हा साठा परत भरून यायला आठवडाभर काळ जावा लागतो. म्हणून त्याच खेळाडूला मोठी कुस्ती, शर्यत वगैरे एका आठवडयात परत घेता येत नाही. ग्लायकोजेन हे स्नायू व यकृतातले ऊर्जा भांडार आहे. ते मुख्यतः वनस्पती आहारातून तयार होते. म्हणून स्टॅमिना (दमसांस) वाढविण्यासाठी शाकाहार पुरतो. यासाठी मांसाहाराची गरज नसते. अर्थात प्रथिनांची गरज स्नायू भरदार होण्यासाठी लागतेच.

तंदुरुस्ती (फिटनेस) म्हणजे काय?

  • तुमचा नाडीचा वेग चांगल्या व्यायामानंतर 5 मिनिटांच्या आत परत सामान्य होत असला तर तुम्ही तंदुरुस्त आहात
  • दीर्घ व्यायामाने आपला स्थायी नाडीचा वेग 50-60 इतका कमी पातळीवर असतो. हे तंदुरुस्तीचे लक्षण आहे.
  • अधिक वेळ व्यायाम करू शकणे म्हणजे तंदुरुस्ती.
चरबी कमी करण्यासाठी व्यायाम

ब-याच लोकांना चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा असतो. स्निग्ध पदार्थ जाळण्याची पाळी व्यायामात ब-याच वेळानंतर येते हे आपण वर वाचले. जास्त काळ आणि कठोर व्यायाम केल्याशिवाय चरबीच्या साठयांवर परिणाम होत नाही. स्निग्ध पदार्थ शरीरात सहजासहजी वापरात येत नाही. अगदी संकटकाळी (फार श्रम पडल्यावर किंवा उपासमारीत) ते वापरले जातात. असे संकटकाळ आपल्या जीवनात जवळजवळ नसतातच.

शारीरिक क्रियांना ऊर्जा किती लागते (दर ताशी) (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.