कुंभमेळा – आरोग्यसेवा वृत्तपत्र लेखन

नाशिकचा हा कुंभमेळा वर्षभर चालणार असला तरी गर्दीच्या दृष्टीने त्यातल्या पर्वण्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाचा कृती आराखडा पाहिल्यावर आरोग्यसेवांची एकूण तयारी दिसून येते. शासन आणि मनपा मिळुन 1300 रुग्णखाटा आहेतच. या आराखड्यात 230 बेडची वाढीव व्यवस्था, रॅपिड रिस्पॉन्स टीम, तात्पुरती वैद्यकीय पथके, पर्वणीवेळी जादा दवाखाने, सुसज्ज रुग्णवाहिका आणि काही खाजगी रुग्णालयांचा मदतीसाठी उपयोग ही स्थूल रूपरेषा आहे. नाशिकमध्ये बाटलीबंद पाण्याचे व अन्नाचे नमुने तपासण्याची वाढीव यंत्रणा असेलच. यात्रेकरू तसेच नागरिकांचे या दृष्टीने नेमक्या सूचना देऊन प्रबोधन होईल अशी आशा बाळगू या. चेंगराचेंगरी ही दुर्दैवी घटना मागच्या नाशिक कुंभात आणि प्रयागलाही घडली. हे होऊ नये म्हणून गर्दीची विभागणी करणे आणि टप्प्या-टप्प्यात समूह विभागून देणे यासाठी प्रशासन काटेकोर नियोजन करीत आहे असे कळते.

प्रयागतीर्थातल्या २०१३ मधल्या कुंभमेळ्याचा हार्वर्ड विद्यापीठातील टीमने भारतीय डॉक्टरांच्या समवेत केलेला अभ्यास नेटवर उपलब्ध आहे. या अहवालानुसार चेंगराचेंगरीची दुर्घटना सोडता रुग्णालयांवर इतर दिवसांमध्ये काहीही ताण पडला नाही. त्यांचे १०० खाटांचे रुग्णालय रोज १-२ खाटा सोडता सरासरी रिकामेच होते. परंतु दवाखाने आणि आरोग्यकेंद्रे मात्र रुग्णसंख्येमुळे चोंदली होती. डॉक्टर्स या बाह्यरुग्णांना १० सेकंदांपेक्षा अधिक वेळ देऊ शकत नव्हते. एकूण बाह्य रुग्णांमध्ये सर्दी-खोकला, अंगदुखी, ताप, जुलाब आणि पोटदुखी याचे आजार उतरत्या प्रमाणात होते. याचा अर्थ अन्नपाण्याची सुरक्षा चांगली ठेवलेली होती. जागोजागी जमिनीत छोटे खड्डे तयार करून स्वच्छतागृहे तयार केली होती, वाळूच्या गोण्या टाकून सांडपाणी बंदिस्त केले होते व वेळोवेळी उचलून शहराबाहेर नेऊन टाकले जात होते. शुद्ध पाणी पुरवठा केलेला होता.

नाशिकच्या या व्यवस्थेत पॅरामेडिक्स मला फारसे दिसत नाहीत, रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित पॅरामेडिक्स असतील असे गृहित धरले तरी ठराविक ठिकाणी पॅरामेडिक्स दिसतील असे उपलब्ध ठेवणे आवश्यक वाटते. हे शेकडो पॅरामेडिक्स गरजेप्रमाणे प्रथमोपचार करून रुग्णवाहिका मिळवून देणे हे काम करू शकतात. कोणत्याही घात-अपघातात पहिला तास वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाचा असतो. यात कुशल पॅरामेडिक्स महत्त्वाचे ठरतात. खरे म्हणजे या निमित्ताने शहरातले हजारो नागरिक-स्वयंसेवक पॅरामेडिक प्रशिक्षणातून तयार होऊ शकतात. यासाठी वैद्यकीय संघटनांनी, महाविद्यालयांनी व नागरी संघांनी स्वतंत्रपणे प्रयत्न करायला हरकत नाही, अर्थात शासकीय व्यवस्थेशी त्याचा सांधा जुळला पाहिजे. सध्या भारतातली आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा बरीच सुधारली आहे, त्याचा उपयोग या कुंभमेळ्यात होईलच, विशेषत: आपत्ती टाळण्यासाठी. प्रयागप्रमाणे या कुंभमेळ्यातील आरोग्य वैद्यकीय व्यवस्थापनाचा नीटपणे अभ्यास करण्याची गरज आहे. यासाठी मविप्रचे वैद्यकीय महाविद्यालय व गणेशवाडीचे आयुर्वेद कॉलेज यांनी पुढाकार घ्यायला हवा आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देखील यात सहभागी व्हायला पाहिजे. काही संस्था, विशेषत: पब्लिक हेल्थ फौंडेशन किंवा सामाजिक रोग प्रतिबंधक अभ्यासकांची असोसिएशन यात महत्त्वाचे योगदान देऊ शकते.

कुंभमेळ्यात साथी पसरतील का? तर माझ्यामते अशी फार शक्यता नाही. पण आपली तयारी पाहिजे. अन्नपाणी व्यवस्थापनाने जुलाबाच्या साथी टळू शकतील. पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे मच्छरजन्य आजार वाढू शकतात. भारतभरातून प्रवासी हिवताप, डेंग्यू वगैरे संसर्ग आणू शकतात. स्वाईन फ्लू पावसाळ्याच्या ओल्या, दमट हवेत वाढू शकतो, पण तत्पुर्वी वैशाख वणव्यात तो जवळजवळ थांबलेला असेल. टायफॉईड व कावीळ हे आजार संसर्गानंतर ३-४ आठवड्यांनी दिसायला लागतात. हल्ली नद्यांचे पाणी कोणीही शहाणा माणूस थेटपणे पीत नाही. पण सिंहस्थात नदीचे पाणी पवित्र समजून पिणारे असंख्य असतील. ते घरी जातील तेव्हा त्यांचे हे आजार सुरू होतील. नाशिकमधल्या नागरिकांनाचे पाणी जरी वरच्या धरणांमधून येत असले तरी पाईपलाईन लिकेजेसमुळे घाण पाणी पाईपलाईन्समध्ये शिरू शकते. हा दोष २४ तास पाणीपुरवठा झाल्याशिवाय पूर्णपणे टळू शकत नाही. तरीही माझ्या मते काही विशिष्ट गटांना कावीळ व टायफॉईडची लस उपलब्ध करून देणे उपयुक्त आहे. पण सर्वांनीच ही लस घ्यायला पाहिजे असे नाही. स्वाईन फ्लूची लस शास्त्रीय कारणांनी त्या त्या साथीत उपयोगी पडत नाही हे मुद्दाम नमूद करायला पाहिजे. आत्ताच आपण गोदावरी स्वच्छ ठेवू शकत नाही, त्यात शहराचे सांडपाणी आजही मिसळते हे उघड आहे. कुंभकाळात यात अनेक पटींनी घाण मिसळेल. प्रयागची गंगा देखील कुंभमेळ्यानंतर दुप्पट प्रदूषित झाली असा अहवाल आहे. (ऑक्सिजन डिमांड जैविक प्रदूषणाची पातळी दाखवते, ती ३ वरून ७ वर गेली.) त्यामानाने नाशिकची नदी फारच लहान आहे.

दळणवळण वाढत जाईल तशी कुंभमेळ्याची गर्दी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. एवढ्या गर्दीत कोणते पावित्र्य शिल्लक राहील हा प्रश्नीच असतो. प्रत्येक धर्माच्या नेतृत्वाने वेळोवेळी त्यात अंतर्गत सुधारणा करण्याची सजगता दाखवायला पाहिजे, ते शासनाचे काम नाही. कधीतरी याचा विचार करायला हवा.

डॉ. शाम अष्टेकर
फोन ९४२२२७१५४४

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.