Health Service देशाचे आरोग्य आरोग्य सेवा
महाराष्ट्राचे आरोग्य

Maharashtra Map आपला महाराष्ट्र देशातले एक प्रगत राज्य आहे. देशाच्या नकाशात जसे ते मधोमध आहे तसेच देशाच्या आरोग्याच्या नकाशातही मधोमध आहे. दक्षिणेकडील राज्ये म्हणजे केरळ, तमीळनाडू, कर्नाटक, गोवा हे महाराष्ट्रापेक्षा आरोग्याच्या ब-याच बाबतीत पुढारलेले आहेत. मात्र उत्तर भारतातली पंजाब सोडून अनेक राज्ये महाराष्ट्राच्या मानाने आरोग्यात मागासलेली आहेत.

परंतु महाराष्ट्राची आकडेवारी ही शहरी लोकसंख्येमुळे थोडी सुधारलेली दिसते. जर शहर आणि खेडे अशी तुलना केली तर मुंबई, पुणे वगैरेपेक्षा ग्रामीण आरोग्याची स्थिती बरीच खराब आहे. महाराष्ट्रात जवळजवळ 50%लोकसंख्या शहरी असल्याने आपली एकूण आकडेवारी चांगली दिसते. मात्र आपल्या ग्रामीण भागातले आरोग्य देशातल्या इतर प्रांतांसारखेच आहे.

महाराष्ट्रात देशातले सगळयात जास्त डॉक्टर्स आणि परिचारिका आहेत. याचे कारणही मुंबई-पुणे-नागपूर या शहरांमध्ये एकवटलेल्या आरोग्यसेवा. ग्रामीण महाराष्ट्राचे आरोग्य सुधारल्यास महाराष्ट्राची प्रगती जास्त उठून दिसेल.

Maharashtra Position विभागवार पाहिल्यास पश्चिम महाराष्ट्र व कोकण आरोग्याच्या बाबतीत मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यापेक्षा जास्त आरोग्यसंपन्न आहेत. ग्रामीण भागात देखील आदिवासी विभागांची आरोग्याची परिस्थिती इतर ग्रामीण भागापेक्षा जास्त बिकट आहे. या पुस्तकात मानव विकास निर्देशांकाची जिल्हावार आकडेवारी दिली आहे. त्यावरून कोणते जिल्हे मागास आहेत हे आपल्याला कळू शकते.

राष्ट्रीय कुटुंब पाहणीनुसार प्रांतोप्रांतीची 2005-06 ची आकडेवारी उपलब्ध आहे. यात मुख्यत: प्रजननविषयक आकडेवारी असते. खाली राष्ट्रीय कुटुंब पाहणीचे (3री फेरी) महाराष्ट्राचे निष्कर्ष थोडक्यात दिले आहेत.

जिल्हास्तरीय आरोग्य पाहणी

केंद्र शासनाने नुकत्याच केलेल्या जिल्हास्तरीय पाहणीनुसार महाराष्ट्राच्या आरोग्यासंबंधी ताजी आकडेवारी प्राप्त झाली आहे (2007-08).

यातील प्रमुख निष्कर्ष खालीलप्रमाणे

महाराष्ट्रात 7 वर्षावरील 75% व्यक्ती साक्षर आहेत.

15 वर्षाखालील मुलांचे प्रमाण 29% आहे.

42% जनतेस संडासाची सोय उपलब्ध आहे.

53% लोकांना नळाचे पाणी मिळते.

40% लोकांचे राहणीमान निकृष्ट आहे तर 26% लोकांचे राहणीमान उच्च आहे.

62% लोकांना क्षयरोग आणि डॉट्स उपचाराची माहिती आहे तर 70% लोकांना गर्भलिंग चिकित्साबंदीबद्दल माहिती आहे.

विवाहाच्या वेळी वराचे सरासरी वय 24 वर्ष तर वधूचे सरासरी वय जेमतेम 19 वर्षे आहे.

सुमारे 12% वर 21 वर्षापेक्षा लहान असतात तर 18% वधू 18 वर्षापेक्षा लहान असतात.

सुमारे 30% विवाहित महिला निरक्षर आहेत तर फक्त 22% विविहित स्त्रिया 10वी किंवा अधिक शिकलेल्या आहेत.

19 वर्षाखालील सुमारे 10% स्त्रियांचे बाळंतपण झालेले आढळले.

20 ते 24 वयोगटातील 51% स्त्रियांना 2 पेक्षा अधिक मुले झालेली आहेत.

आधी दोन मुले असलेल्या स्त्रियांपैकी सुमारे 67% स्त्रियांना अधिक मुले हवी असतात असे दिसते.

एकूण 64% जोडपी संततीप्रतिबंधक उपाय करतात असे दिसते. यापैकी बहुतेक सर्व आधुनिक पध्दत वापरतात तर केवळ 1% पारंपरिक पध्दती वापरतात. या जोडप्यांपैकी सुमारे 52% मध्ये स्त्रीनसबंदी झालेली असते तर पुरुष नसबंदी करून घेणा-यांचे प्रमाण केवळ 2.5% आहे. या जोडप्यांपैकी गोळी वापरण्याचे प्रमाण 2.3% तर तांबी चे प्रमाण 1.6% आणि निरोध वापरण्याचे प्रमाण 5% पेक्षा कमी आहे. या जोडप्यांपैकी 1% पेक्षा कमी स्त्रियांनी कधी ना कधी तातडीक संततीप्रतिबंधक गोळी (ईसीपी) वापरलेली होती.

एकूण जोडप्यांपैकी 14% जोडप्यांची संततीप्रतिबंधक साधनांची गरज भागलेली नव्हती असे आढळले.

सुमारे 92% गरजू स्त्रियांनी प्रसूतीपूर्व सेवा घेतली होती. परंतु त्यातील फक्त 62% स्त्रियांना पहिल्या तिमाहीत सेवा मिळू शकली.

गरोदर स्त्रियांपैकी फक्त 76% गरोदर स्त्रियांना तीन प्रसूतीपूर्व सेवा मिळाल्या. गरोदर स्त्रियांपैकी 74% चा रक्तदाब मोजला होता पण फक्त 34% स्त्रियांना गरोदरपणाची पूर्ण तपासणी करण्यात आली. 46% गरोदर स्त्रियांना रक्तवर्धक लोह गोळया मिळाल्या.

बाळंतपण झालेल्या स्त्रियांपैकी 64% बाळंतपणे आरोग्यकेंद्रे किंवा रुग्णालयात झाली आणि सुमारे 36% अजूनही घरी प्रसूत होतात. पैकी ग्रामीण भागात घरी प्रसूत होणा-या स्त्रियांचे प्रमाण अजूनही 45% च्या वर आहे शहरांमध्ये देखील सुमारे 12.5% स्त्रिया घरी प्रसूत झाल्या. घरी प्रसूत होणा-या स्त्रियांपैकी फक्त 16% स्त्रियांना कुशल व्यक्तीची मदत मिळाली. सुमारे 70% स्त्रियांची प्रसूती सुरक्षित झाली असा निष्कर्ष काढता येतो. प्रसूत झाल्यानंतर 80% स्त्रियांना काही ना काही आरोग्यसेवा मिळाल्याचे दिसते. जननी सुरक्षा योजनेचा आर्थिक लाभ फक्त 8% स्त्रियांना झाला.

बालकांच्या पूर्ण लसीकरणाच्या बाबतीत टक्केवारी अजून कमीच (69%) आहे. मात्र बीसीजी लस टोचलेल्यांचे प्रमाण 96%, तिहेरी लस (79%), पोलिओ-3(86%) आणि जीवनसत्व ‘अ’ एक डोस (70%) असे प्रमाण दिसते.

जन्मानंतर तासाभरात स्तनपान मिळणा-या बाळांचे प्रमाण अजून 54%च्या खाली आहे. शहर आणि खेडयांमध्ये हे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे. सहा महिन्यापर्यंत केवळ स्तनपान मिळणा-या बाळांचे प्रमाण 54%च आहे. सहा ते नऊ महिने वयात पूरक आहार मिळणा-या बालकांचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी म्हणजे 47% इतकेच आहे. हेही प्रमाण शहर खेडे या दोन्ही ठिकाणी जवळजवळ सारखेच आहे.

फक्त 30% स्त्रियांना (मातांना) बालकांच्या न्यूमोनियाबद्दल खाणाखुणांची जाणीव दिसते. ग्रामीण भागात हे प्रमाण केवळ 26% आहे. जुलाबानंतर जीवनजल दिले आहे अशा बालकांचे प्रमाण 44% आढळले. मात्र इतर उपचार धरल्यास हे प्रमाण 78% इतके होते. तसेच न्यूमोनिया असलेल्या 81% बालकांना उपचार झाल्याचे आढळते.

लिंगसांसर्गिक आजारांबद्दल फक्त 27% स्त्रियांना माहिती होते मात्र एड्सआजाराबद्दल 71% स्त्रियांना माहिती होते. 8% स्त्रियांना प्राथमिक किंवा नंतरचे वंध्यत्व असल्याची तक्रार आढळली. 1.5% स्त्रियांना बाळंतपणानंतर योनीमार्गाशी संबंधित विव्हर (पिश्चूला) आढळले.

कुठलीही संततीप्रतिबंधक साधने न वापरणा-यांपैकी फक्त 18% जोडप्यांना कुटुंबनियोजनाचा सल्ला दिला गेला होता.

15-24 वयोगटातील अविवाहित स्त्रियांपैकी 3.4% स्त्रिया निरक्षर होत्या तर 54% स्त्रियांचे 10वी पर्यंत किंवा अधिक शिक्षण झाले होते. अविवाहित स्त्रियांपैकी 60 व 70% स्त्रियांना अनुक्रमे निरोध व संततीप्रतिबंधक गोळयांची माहिती होती असे दिसते तर फक्त 28% स्त्रियांना इसीपी बद्दल माहिती होती.

70% खेडयांमध्ये ग्राम आरोग्य समिती तयार झालेली आहे परंतु फक्त 50% गावांमध्ये सरपंचाला या समितीस निधी असतो हे माहीत होते. म्हणजेच निम्म्या गावाच्या सरपंचांना अशी माहिती नव्हती. सर्वेक्षण केलेल्या खेडयांपैकी 62% खेडयांना उपकेंद्र जवळ म्हणजे 3 कि.मी.च्या आत आहे तर 65% खेडयांना प्राथमिक आरोग्य केंद्र 10 कि.मी च्या आत आहे.

ग्रामीण रुग्णालयांपैकी 60% रुग्णालयांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत मात्र यापैकी 96% रुग्णालयांमध्ये 24तास बाळंतपणाची सोय उपलब्ध आहे. फक्त 14% ग्रामीण रुग्णालयांत सिझेरियन ऑपरेशनची सोय आहे. तर फक्त 11% ठिकाणी रक्त पेढी आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.