औषधीकरणाच्या काही पध्दती

आयुर्वेदाने औषधे तयार करण्याच्या वेगवेगळया पध्दती सांगितल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या पाच कल्पनांना खूप महत्त्व आहे त्या पुढीलप्रमाणे –

स्वरस – काही वनस्पतींचे रस काढून त्यांचा उपयोग करतात. उदा. तुळशीचा रस

काढे – वनस्पतीचा उपयुक्त भाग पाण्यामध्ये उकळून काढे तयार केले जातात. उकळताना वनस्पतीचा कडू, तिखट, तुरट घटक पाण्यात उतरतो. काढयासाठी एक भाग घटक व चार भार पाणी (अंदाजे) घ्यावे. मंद उष्णता वापरल्यावर औषधी अंश चांगला उतरतो. वनस्पती उकळण्याअगोदर चाखून जी चव लागते ती उकळल्यानंतर राहात नाही-असे झाले म्हणजे उकळणे पूर्ण झाले असे समजावे. ज्या वनस्पती घट्ट, टणक, कडक असतात त्या उकळण्याआधी चार-पाच तास पाण्यात भिजत ठेवल्यास काढा लवकर तयार होतो, उष्णता कमी लागते. काढा उकळत असताना हलवत राहणे आवश्यक आहे. नाही तर पापुद्रा धरून आत करपण्याची शक्यता असते. वनस्पतीचे आधीच लहान तुकडे करून घ्यावेत; म्हणजे कमी उष्णतेत काढा तयार होतो. काढा द्रवरूप वापरायचा नसल्यास आटवून कोरडा करून त्या द्रवाच्या गोळया तयार करता येतात. ज्या वनस्पती (किंवा घटक) ठेवून खराब होतात त्यांचे काढे लवकर करून ठेवावेत. एकदा काढा काढल्यानंतर उरलेला चोथा परत एकदा उकळल्यास, त्याला निकाढा असे नाव आहे.

अडुळसा, कडुनिंब, अश्वगंधा, काडे चिराईत, कोरफड, शतावरी, गुळवेल, इत्यादी वनस्पतींचे काढे तयार करून ठेवल्यास कायम उपयोगी पडतात, यासाठी गावातीलच साधने वापरावीत. मोठी भांडी, कढई, उलथने, चाळण्या, गाळायची फडकी (जाड-पातळ) रिकाम्या बाटल्या, सरपण, इत्यादी वस्तू असल्या की भागते.

काढयांप्रमाणे आसवे, औषधी साखर (अवलेह), चूर्णे तयार करून ठेवतात. कुमारी आसव म्हणजे कोरफडीचे आसव. यासाठी 750 मि.ली. ची रिकामी स्वच्छ बाटली घेऊन त्यात कोरफडीच्या गराचा वस्त्रगाळ रस 500 मि.ली. + 300 ग्रॅम गुळाचा चुरा+5ग्रॅम हिरडापूड+5ग्रॅम धायटीची फुले हे मिश्रण बंद करून ठेवावे. बूच थोडे सैल ठेवावे म्हणजे मिश्रणास थोडी हवा मिळेल. दीड महिन्यानंतर हे मिश्रण वस्त्रगाळ करून रस दुस-या बाटलीत भरावा. यालाच कुमारी आसव म्हणतात. अडुळसा, शतावरी, अश्वगंधा, इत्यादींचे काढे तयार केल्यानंतर त्यांची औषधी साखर तयार करता येते. यासाठी काढयात साखर मिसळून तो काढा पुन्हा हळूहळू आटवत न्यावा. आटवताना चांगले ढवळल्यास हळूहळू पाणी कमी होऊन औषधी साखर (अवलेह) तयार होते. साखर जेवढी कोरडी होईल तेवढी ती टिकते. औषधे तयार केल्यावर ती पॅकबंद करून मुंग्या, किडे यांपासून सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. औषधी बाटल्यांवर नावे चिकटवून ठेवावीत म्हणजे नंतर गोंधळ होणार नाही.

वनस्पतींपासून तयार केलेली औषधे कुटुंबाच्या पातळीवर वापरता येतील. तसेच आपण आजूबाजूच्या रुग्णांसाठी वापरू शक.तो. एवढेच नाही तर आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणूनही असे औषधांचे उत्पादन करणे शक्य आहे. यादृष्टीने काही विशिष्ट औषधे वनस्पतींच्या उपलब्धतेनुसार तयार करता येतील. पण वनस्पती गोळा करून तशाच विकण्यापेक्षा औषधे तयार करून विकणेच चांगले. यातून गावात एक उत्पन्नही मिळेल.

कल्क – काही औषधे चटणी स्वरूपात वापरली जातात. मात्र यात तिखट घालू नका.

हिम – काही वनस्पती पाण्यात काही वेळ भिजत ठेवून ते पाणी गाळून मग वापरले जाते.

फांट – यामध्ये पाणी उकळून मग त्यामध्ये वनस्पतींच्या भरडी मिसळून मग ते पाणी वापरले जाते. चहा हा एक फांट आहे. जास्त उकळल्यावर त्याचा काढा होतो.

या पाच कल्पनांव्यतिरिक्त चूर्ण, आसव, अरिष्ट, गोळया अशा वेगवेगळया पध्दतींनी औषधे बनवली जातात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.