urine system icon मूत्रसंस्थेचे आजार स्त्रीजननसंस्था
प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ

Prostate Checking उतारवयात प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होते. सर्वांनाच त्याचा त्रास होतो असे नाही. पण खूप जणांना साठीच्या आसपास हा त्रास होतो. याचे मुख्य लक्षण म्हणजे लघवीचा त्रास. रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागणे, कुंथावे लागणे, लघवी थेंब थेंब पडणे, लघवीतून रक्तस्राव होणे, इत्यादी अनेक प्रकारचा त्रास होतो. गुदद्वारातून बोट घालून तपासले असता प्रॉस्टेट ग्रंथींची वाढ आणि निबर-घट्टपणा जाणवतो. सोनोग्राफीने नक्की निदान होते.

यातला लघवी अडकण्याचा त्रास तात्पुरता कमी करता येतो. गरम-कोमट पाण्याच्या टोपलीत बसून शेक दिल्यास लघवी मोकळी व्हायला तात्पुरती मदत होते. पण कायमचा उपाय शस्त्रक्रियेचाच. पोटातून शस्त्रक्रिया करण्याऐवजी मूत्रमार्गातून नळीद्वारे हत्यार वापरून ग्रंथी खरवडून काढली जाते.

प्रॉस्टेट ग्रंथीला कर्करोगही होऊ शकतो व हा रोग आजूबाजूला लवकर पसरतो.

वीर्यकोश -प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष

लिंगसांसर्गिक आजारातील ‘गोनोरिया’ (परमा) व इतर काही ‘पू’ निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो.
हा आजार अचानक उद्भवला असल्यास खूप वेदना, लघवी गढूळ होणे, ताप, लघवी वारंवार होणे, इत्यादी त्रास संभवतो. भरपूर पाणी पिणे व जंतुविरोधी औषधांनी आराम पडतो. पण याचे उपचार डॉक्टरकडूनच व्हावेत.

काही वेळा ही सूज क्षयरोगाचीही असू शकते आणि ती खूप वर्षे राहते.

लघवीतून ‘धातू’ जाणे अशी तक्रार केली जाते तेव्हा बहुधा असा वीर्यकोशाचा आजार असू शकतो. या आजारामुळे लघवीच्या सुरुवातीला पू, गढूळ भाग बाहेर पडतो व नंतर स्वच्छ लघवी येते. अशी तक्रार आढळली तर तज्ज्ञाकडे पाठवावे.

शिश्नदाह

पुरुष जननेंद्रियाच्या (शिश्न) पुढच्या बोंडावरची त्वचा मागेपुढे होऊ शकते. ही त्वचा मागे सारल्यावर दिसणा-या बोंडावर व त्वचेखाली कधी कधी दाह होतो. बहुधा हा दाह सूक्ष्मजंतूंमुळे किंवा बुरशीमुळे होतो. लालसरपणा आग व खाज, चिकट द्राव, इत्यादी लक्षणे दिसतात.
निरनिराळया लिंगसांसर्गिक रोगांमध्येही अशी सूज दिसते; पण बहुधा त्याबरोबर व्रणही दिसतो.

लिंगसांसर्गिक आजार नाही अशी खात्री केल्यावर साध्या उपचारांनी शिश्नदाह बरा होऊ शकतो. यासाठी थंड पाणी व साबणाने संबंधित भाग दिवसातून दोन-तीन वेळा धुऊन जंतुनाशक मलम लावण्यास सांगावे. बुरशीजन्य दाह (दह्यासारखा पदार्थ) असेल तर जेंशन व्हायोलेट हे औषध वापरावे. याने दोन-तीन दिवसांत पूर्ण आराम पडतो. मात्र आराम न पडल्यास किंवा इतर लिंगसांसर्गिक आजाराची शक्यता वाटत असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.

कधीकधी मुंगी, किडा चावल्याने शिश्नावर दाह होतो व सूज येते. ही सूज एक-दोन दिवसांनी आपोआप उतरते. सीपीएम गोळयांचा वापर केल्यास खाज व सूज लवकर कमी होते. साध्या चिकणमातीचा ओला लेप लावल्यावरही गांध कमी होते. कारण ही सूज वावडयाची असते.

पुन्हापुन्हा शिश्नदाह होत असेल तर मधुमेहासाठी लघवी तपासणी करून घेतली पाहिजे. लघवीत साखर (मधुमेह) असेल तर असा दोष वारंवार संभवतो.

पुरुष नसबंदी

पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदीपेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते. या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात. अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढता येते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते.

या अत्यंत सोप्या व निर्धोक शस्त्रक्रियेचा पुन्हा प्रसार होणे आवश्यक आहे. पुरुषी अहंकारापोटी व ‘अशक्तपणा येतो’ हे खोटे कारण सांगून पुरुष टाळाटाळ करतात व स्त्रियांवर शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी टाकतात.

पुन्हा प्रजननासाठी आवश्यक वाटल्यास कापून अलग केलेल्या नसा शस्त्रक्रियेने परत जुळवता येतात- त्यात 50 टक्के यशाची शक्यता असते.

बीजांडास पीळ पडणे-बीजांड चेंगरणे

बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा (बंडल) असतो. याच्या टोकाला खाली बीज़ांड असते. जर या रक्तवाहिन्यांना पीळ पडला तर रक्तप्रवाह थांबतो व वेदना सुरू होतात. या वेदना कधीकधी पोटदुखीसारख्या असतात. म्हणून तीव्र पोटदुखी असताना बीजांडाची तपासणी करणे आवश्यक असते. या वेदना भयंकर असतात. वेळ न दवडता ताबडतोब शस्त्रक्रिया करून पीळ उलगडला नाही तर त्या बाजूचे बीजांड निर्जीव होते. उशीर झाल्यास ते काढून टाकण्याशिवाय उपाय उरत नाही. अशा रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात पाठवले पाहिजे.

कधीकधी अपघाताने किंवा मार लागल्याने बीजांड चेचले जाते. याची वेदना भयंकर असते आणि वेदनेमुळे मृत्यूही येऊ शकतो. या बाबतीतही ताबडतोब तज्ज्ञांकडे पाठवणे आवश्यक असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.