mouth dental icon तोंड व दातांचे आरोग्य पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
दात दुधाचे आणि कायमचे

मानवजातीत दात दोन वेळा येतात – दुधाचे आणि कायमचे

दुधाचे दात

दुधाचे दात येताना ब-याच बाळांना पोटदुखी व हगवण यांचा 1/2 दिवस त्रास होतो असे दिसते. असे का होते हे नक्की माहीत नाही. अशा वेळी बाळ तोंडात काहीही घालते. त्यामुळे जंतुलागण होऊन पोट बिघडते हे कारण असू शकते. मात्र ब-याच वेळा दात येता येता जुलाबही लगेच चालू होतात. म्हणजे जंतू पोटात जाऊन आजार निर्माण व्हायला पुरेसा वेळ पण नसतो. कदाचित यासाठी आणखी कारण असू शकते.

 • दुधाचे दात सहा महिन्यांच्या वयात यायला सुरू होतात.
 • दोन अडीच वर्षात हे दात पूर्णपणे येतात.
 • सहा-सात वर्षेपर्यंत हे टिकतात.
 • सात ते नऊ या वर्षांमध्ये दात आले त्या क्रमाने पडायला लागतात.
 • दुधाचे दात एकूण वीस असतात.
होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, सीना, चामोमिला, हेपार सल्फ, मर्क्युरी सॉल, पोडोफायलम, पल्सेटिला, सिलिशिया.

दुधाचे दात नाजूक असतात, त्यामुळे ते लवकर किडतात. दुधाचे दात किडल्यावर उपचारांची गरज नसते असा एक गैरसमज आहे. यामुळे अनेक दुष्परिणाम होतात-पचन बिघडते, जंतुलागण होते. मुख्य म्हणजे दात लवकर पडल्याने पुढील दातांची दंतरेषा बिघडते. यामुळे पुढचे दात वेडेवाकडे येतात. म्हणून दुधाचे दात किडले असल्यास लवकर भरून घ्यावेत.

कायमचे दात

सुमारे सहा वर्षे वयाच्या मुलांना नवीन-कायमचे दात यायला सुरुवात होते. सर्वात आधी दाढा यायला सुरुवात होते. या वेळी दुधाचे दात अजून असल्याने ब-याच जणांना या दाढा दुधाच्या आहेत असे वाटते. त्यामुळे या दाढांकडे दुर्लक्ष होते. दातांमध्ये दाढ ही अगदी महत्त्वाची असल्यामुळे हे दुर्लक्ष महाग पडते. यानंतर वरच्या जबडयाचे पुढचे दात येतात. 8-9 वर्षाच्या दरम्यान ही प्रक्रिया चालू होते. वयाच्या 12-16 वर्षापर्यंत 28 दात आलेले असतात.

अक्कलदाढा त्यानंतर कधीतरी येतात. पण कधी कधी अक्कलदाढा येतही नाहीत. उत्क्रांतीमध्ये अक्कलदाढांची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. कारण मानवाचे अन्न जास्त मऊ झालेले आहे. अक्कलदाढा जबडयाच्या कोनाशी असल्याने त्याचा फारसा फायदाही होत नाही. काही वेळा शस्त्रक्रिया करून त्या काढाव्या लागतात. अक्कलदाढा येताना दुखण्याचा त्रास होतो पण यासाठी सहसा वेदनाशामक औषधे देणे पुरते.

1. दातांची रचना

Teeth Structure प्रत्येक दात हा जबडयाच्या हाडामध्ये पक्का बसवलेला असतो. खरे तर तो झाडाप्रमाणे हाडातून उगवलेला असतो.म्हणून त्याला मुळे असतात. एखादा पडलेला दात नीट बघा. जनावरांचे दातही बरेचसे आपल्यासारखेच असतात, त्यांचेही निरीक्षण करा. प्रत्येक दाताचा पृष्ठभाग आणि कडा वेगवेगळया असतात, कारण प्रत्येकाचे काम वेगळे असते.

 • सुळे टोकदार आणि घुसण्यासाठी बनवलेले असतात. अन्न तोडण्या-फाडण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
 • पुढचे दात कु-हाडी प्रमाणे कडा असणारे असतात त्यामुळे अन्न ‘तोडण्याचे’ काम करता येते.
 • खालचा आणि वरचा जबडा मिळून अडकित्त्यासारखी रचना होते. अडकित्त्याच्या कोनाकडे जास्त ताकद निर्माण होते.

जबडयाचे स्नायू कसे काम करतात? जेवताना गालाला हात लावला तर हे सहज कळेल. दात आणि जबडयाचे हे काम अन्न तोडणे, फोडणे, दळणे या पध्दतीने होत राहते. जर तोंडाने हे काम नीट केले नाही तर अपचनाचा त्रास होतो.

एखादा पडलेला दात बारीक करवतीने उभा आणि दुसरा आडवा कापून पहा. यावरून आपल्याला त्याची रचना कळेल. वरचा (बाहेरचा) थर अगदी कठीण असतो. याला आपण दाताचे ‘कवच’ असे म्हणू या. त्याच्या आत थोडा कमी कठीण पदार्थ असतो. सर्वात मध्ये एक पोकळी असते. त्यात दात जिवंत असताना रक्त आणि चेतातंतू असतात. ही पोकळी अगदी मुळापर्यंत असते कारण त्यातूनच रक्तवाहिन्या, चेतातंतू येतात.

दातामध्ये कधीकधी पू होतो. हा पू मुळापासून जबडयाच्या हाडात कसा पोचतो हे यावरून आपल्याला समजेल.

दाताचा मुळांचा भाग जबडयात घट्ट बसलेला असतो. त्यावर गुलाबी रंगाच्या हिरडयांचा थर असतो. दात व हिरडया जर स्वच्छ व निरोगी राहिल्या तर दातांचे आयुष्य चांगले राहते. सामान्यपणे दातावर कीटण चढून हिरडयांचा -हास होतो. यामुळे दातांची मुळे उघडी पडत जातात. असे दात लवकर पडून जातात.

दात वेडेवाकडे असतील तर ते सरळ करण्यासाठी दंतवैद्यकीय उपचार शक्य आहेत. दातांची ठेवण व्यवस्थित असली तर दातांची साफसफाई चांगली होते. यानेच दात जास्त टिकतात. शिवाय दातांचे सौंदर्य हा वेगळा फायदा आहेच.

2. दातदुखी

Toothache दात दुधाचे असोत की कायमचे असोत, दाताला कीड लागली की दातदुखी सुरू होते. दात किती किडला आहे यावरच त्याचे दुखणे व परिणाम अवलंबून असतात.

दातांना कीड लागण्याची कारणे

काही ठिकाणी पाण्यामध्ये फ्लोराईड कमी असते हे एक कारण. गावात दात किडण्याचे प्रमाण फार असेल तर हे कारण असणे शक्य आहे.

दातांची काळजी न घेणे हे सर्वात महत्त्वाचे कारण. दातांची निगा न राखल्यास दातांच्या फटीमध्ये अन्नकण, साखर, इत्यादी साठून सूक्ष्मजंतू वाढतात. जंतूंमुळे अन्नातून आम्ल निर्माण होते. यामुळे हळूहळू दातांचे टणक कवच ठिसूळ होते. याने कवचाची. झीज होऊन दाताला खड्डे पडतात. हे खड्डे आतल्या पोकळीपर्यंत खोलवर पोहोचले तर पोकळी उघडी पडते.

होमिओपथी निवड (दात किडणे)

नायट्रिक ऍसिड, कल्केरिया कार्ब, सीना, नेट्रम मूर, सिलिशिया, सल्फर

दातदुखीचे टप्पे

दातदुखीचे पुढीलप्रमाणे तीन टप्पे आहेत.

 • दाताचे कवच गेल्याने आतला भाग किंवा पोकळी उघडी पडून थंड-ऊष्ण पदार्थ झोंबतात.
 • पोकळीत पू होऊन ठणका लागतो.
 • दाताच्या मुळाशी सूज व पू होऊन ठणकणे. यामुळे हिरडया व गालावर सूज येते.
उपचार
 • दातदुखीपासून तात्पुरता आराम मिळण्यासाठी ‘ऍस्पिरिन’, आयबूफेन किंवा पॅमालच्या गोळया घ्याव्यात.
 • ठणका असेल तर 5 दिवस डॉक्सी किंवा कोझाल हे जंतुविरोधी औषधही पोटातून घ्यावे.
 • किडलेला दात भरण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी दंतवैद्याला दाखवावे.
आयुर्वेद

इरिमेदादी तेलाचा फाया दुख-या दातावर ठेवावा. दातातील कीड फार खोल असेल आणि हिरडया सुजून पू येत असल्यास दाताच्या डॉक्टरकडे पाठवावे.

होमिओपथी निवड (दातदुखी)

आर्निका, बेलाडोना, ब्र्रायोनिया, कल्केरिया कार्ब, चामोमिला, हेपार सल्फ,मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर, थूजा

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.