Disease Science Icon खास तपासण्या रोगशास्त्र
लघवीची तपासणी
लघवी तपासणी पुढील गोष्टींसाठी केली जाते
  • साखर (मधुमेह)
  • प्रथिने (मूत्रपिंडाचा आजार)
  • लघवीत रक्त (मुतखडा किंवा मूत्रसंस्थेचे इतर आजार)
  • पुवाच्या पेशी (जंतुदोष)
  • पित्तक्षार (कावीळ)
  • क्षार (मुतखडे), इ.

यातील साखर व प्रथिने यांसाठी केली जाणारी तपासणी सर्वात जास्त वापरली जाते. उतारवयात, शस्त्रक्रियेआधी, निरनिराळया आजारांत, मधुमेहासाठी ही प्राथमिक तपासणी उपयोगी पडते.

लघवीत साखरेची ही तपासणी अगदी सोपी आहे. यासाठी पुढील तंत्र वापरा. परीक्षानळीत पाच मि.लि. बेनेडिक्ट हे निळे औषध घेऊन उकळा व त्यात लघवीचे चार -पाच थेंब टाका. जर मूळचा निळा रंग न बदलता तसाच राहिला तर साखर नाही असा अर्थ. तो बदलला तर साखरेच्या प्रमाणाप्रमाणे हिरवा, पिवळा, तांबडा, तपकिरी असा होत जातो. औषधातल्या तांब्यावर साखरेची रासायनिक क्रिया झाल्यामुळे बेनेडिक्टचा रंग बदलतो.

प्रथिनांसाठीही सोपी तपासणी आहे. परीक्षानळीत चार-पाच मि.लि. लघवी उकळून त्यात 2-3 थेंब ऍसेटिक आम्ल टाका. लघवीत धूसरपणा किंवा गढूळपणा असल्यास प्रथिने आहेत. लघवी न बदलता स्वच्छ राहिल्यास प्रथिने नाहीत. प्रथिने आढळल्यास मूत्रपिंडात किंवा मूत्रसंस्थेत काही बिघाड आहे असा निष्कर्ष निघतो.

काविळीत लघवी जास्त गडद पिवळी होते. कारण त्यात बिलीरुबीन नावाचे द्रव्य उतरते. काविळीची लघवी काचेच्या परीक्षानळीत घालून जोराने हलवल्यास त्यावर पिवळा फेस येतो. पण हे ही लक्षात ठेवा की फ्युराडीन किंवा ‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळया घेतल्यास लघवी पिवळी होते. लघवीत रक्त आढळल्यास मूत्रसंस्थेत किंवा रक्तसंस्थेत गंभीर दोष संभवतो.

लघवी तपासणीसाठी डिपस्टिक पध्दत

लघवीतील निरनिराळया रासायनिक तपासण्यांसाठी रासायनिक काडया (प्लॅस्टिक कागदाच्या पट्टया) उपलब्ध आहेत. लघवीत ही काडी बुडवून त्यावरच्या रंगबदलावरून ग्लुकोज, प्रथिने, बिलीरुबीन व आणखी काही पदार्थ आहेत की नाहीत हे कळते. या काडया सहज वापरता येतात. एका बाटलीत साधारणपणे 50 काडया असतात. या काडया कात्रीने उभ्या कापून एकाच्या दोन करून वापरता येतात. एकदा बाटली उघडल्यावर तीन महिन्यांनंतर त्या निकामी होतात. यासाठी पाच-दहा काडयांची पाकिटे निघाली तर चांगला उपयोग होऊ शकेल. काडी काढून घेतल्यावर बाटलीला लगेच बूच बसवण्यास विसरू नका. हवेतील ओलेपणामुळे काडया लवकर खराब होतात.

विष्ठा तपासणी

पचनसंस्थेच्या लहान-मोठया आजारांत काही वेळा शौच (मल-विष्ठा) तपासणीची गरज भासते. विष्ठा तपासणीसाठी स्वच्छ बाटलीत अथवा प्लॅस्टिक पिशवीत नमुना घ्या. हा नमुना लवकरात लवकर तपासणीसाठी पाठवा.

विष्ठेची तपासणी करताना साध्या डोळयालाही काही गोष्टी समजतात. विष्ठेचा रंग, सैल घट्टपणा, रक्त, जंत, इत्यादी असल्यास दिसतातच. विष्ठेचा रंग पांढुरका असेल तर विशिष्ट प्रकारची कावीळ असण्याचा संभव असतो. रंग काळा असेल तर पचनसंस्थेत कोठेतरी रक्तस्राव झाला असण्याची शक्यता असते.

जंताचे निरनिराळे प्रकार (गोल जंत, टेपकृमी, इ.) दिसून येतील. लहान कृमी मात्र जरा काळजीपूर्वक पाहाव्या लागतात,

चिकट स्त्राव असेल तर विष्ठेला सैलपणा असतो. अशी विष्ठा संडासच्या भांडयाला चिकटून राहते.

विष्ठा सूक्ष्मदर्शकाखाली तपासताना त्यात जंतकृमींची अंडी, अमीबाचे कोश किंवा अमीबा किंवा जिआर्डियाच्या जिवंत हलत्या पेशी दिसू शकतात. पटकीचे वळवळणारे जंतूही सूक्ष्मदर्शकाखाली दिसू शकतात. (ही हालचाल पाहण्यासाठी शौचाचा द्रवरूप भाग तपासावा लागतो.)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.