urine system icon मूत्रसंस्थेचे आजार
मूत्रसंस्थेच्या आजाराची लक्षणे

लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, उन्हाळी, लघवीतून पू येणे, लघवीत रक्तयेणे, पोटात दुखणे, चेहरा सुजणे ही मूत्रसंस्थेच्या आजाराची वेगवेगळी लक्षणे आहेत.

लघवी अडकणे आणि बंद होणे या दोन लक्षणांमध्ये महत्त्वाचा फरक आहे.

लघवी बंद होणे (किंवा कमी होणे) म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे किंवा कमी होणे, यामुळे लघवी कमी तयार होते किंवा बंद होते.

लघवी अडकणे
Urine Get Involved
Drops Drops Urine

‘लघवी अडकणे’ म्हणजे लघवी नेहमीप्रमाणे तयार होते पण मूत्रनलिकेच्या अडथळयांमुळे ती मूत्राशयात अडकून पडते. लघवी अडकली असेल तर बेंबीखालच्या ओटीपोटात तडस लागते. लघवी अडकली आहे असे वाटते. यामुळे ओटीपोटाच्या भागात फुगार वाटतो. लघवी अडकण्यामागचे आजार अनेक प्रकारचे असतात. सोबतच्या तक्त्यात त्याचे मुख्य प्रकार दिले आहेत.
लघवी अडकणे (तक्ता (Table) पहा)
लघवी अडकणे ही गंभीर तक्रार आहे. बहुतेक वेळा त्यावर उपचारासाठी डॉक्टरकडेच जावे लागते. लघवी अडकण्याच्या कारणाचे निदानही आवश्यक असते. रोगनिदानासाठी काही बाबतीत क्ष-किरण चित्राची किंवा सोनोग्राफीची गरज पडते.

आयुर्वेद लघवी अडकली असेल तर ती मोकळी करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणून बेंबीखालच्या भागावर (म्हणजे फुगलेल्या मूत्राशयावर) गरम पाण्याने किंवा कपडयाने शेक द्यावा. शेक देण्यासाठी पळसाची फुले गरम करून वापरली जातात. याचाही उपयोग होतो. पळसफुलांचा रस (500मि.ली.) + हिरडापावडर (5 ग्रॅ) + गूळ (300 ग्रॅ) + धायटीची फुले (35 ग्रॅ.) यांचे एकत्रित आसव करून ठेवावे. हे आसव पोटातून दिल्यास लघवी मोकळी होण्यास मदत होते. हे आसव दीड ते दोन चमचे द्यावे व ओल्या फडक्याने मूत्राशयावर शेक द्यावा. लघवी बाहेर पडत नसल्यास वेळीच तज्ज्ञाकडे पाठवावे.

लघवी बंद होणे

Urine Bag तरुण-प्रौढ वयात दररोज सुमारे एक ते दीड लिटर लघवी तयार होते. हवामानाप्रमाणे व पाणी पिण्याच्या प्रमाणानुसार लघवीचे प्रमाणही बदलते. हिवाळयात लघवीचे प्रमाण जास्तअसते कारण घामाचे प्रमाण कमी असते. याउलट उन्हाळयात लघवी कमी होते.र् साधारणपणे तरुण- प्रौढ व्यक्तींमध्ये रोज एक लिटर हे लघवीचे किमान प्रमाण धरले जाते. टाकाऊ पदार्थ, युरिया, इत्यादी योग्य प्रमाणात शरीराबाहेर पडण्यासाठी एवढी लघवी तयार व्हावीच लागते. मूत्रपिंडाच्या निरनिराळया आजारांत हे प्रमाण कमी होत जाते व बंदही पडू शकते. हे अचानक घडू शकते किंवा हळूहळू (काही दिवस, महिने) होऊ शकते. हळूहळू आपली लघवी बंद होत आहे, हे बऱ्याच रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाही.

दररोज 24 तासांत मिळून अर्धा लिटरपेक्षा कमी लघवी तयार होत असेल तर ‘लघवी बंद’ होत आहे असे धरावे. याची कारणेही अनेक आहेत. लवकर इलाज झाला तर पुढचे नुकसान टळू शकते. सोबतच्या तक्त्याप्रमाणे कारणांचे तीन मुख्य गट पडतात. कारण काही असले तरी लघवी बंद किंवा कमी होणे ही अत्यंत गंभीर बाब असते. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. पहिल्या गटातील शुष्कतेचे कारण असल्यास जीवनजल त्वरित चालू करावे. लगेच सलाईन देण्याची सोय असल्यास आणखी चांगले.

आयुर्वेद

Female Urine Issue लघवी बंद होणे (म्हणजे मूत्रपिंडाचे काम बंद पडणे) ही अगदी गंभीर गोष्ट आहे.

याबरोबरच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून काही उपाय करण्यासारखे आहेत. यासाठी आधी पचनसंस्थेचे कार्य सुधारणे आवश्यक समजले जाते. सुंठ, मिरी, पिंपळी, आले यांपैकी एखादा पदार्थ वापरून पचन सुधारता येते. दीड ग्रॅम त्रिकटू चूर्ण (सुंठ, मिरे, पिंपळी) एक चमचा मधाबरोबर दिवसातून तीन -चार वेळा द्यावे. लहान मुलांमध्ये त्रिकटू चूर्ण अर्धा ग्रॅम इतकेच द्यावे. दही, मिठाई, मांसाहार व उडीद पूर्ण वर्ज्य करावेत.

मूत्रपिंडाचे कामकाज सुधारण्यासाठी पुनर्नवा उपयुक्तआहे. पुनर्नव्याच्या मुळयांचा काढा (30-50 ग्रॅम मुळया 1 लिटर पाण्यात भिजवून 200 मि.ली. होईपर्यंत आटवावे.) 30-50 मि.ली. काढा दिवसातून तीन वेळा द्यावा. याऐवजी पुनर्नवासव औषधाच्या दुकानात तयार मिळते, ते 20 मि.ली. मात्रेत दिवसातून तीन वेळा द्यावे.

लघवी बंद होणे-कमी होणे:कारणे (तक्ता (Table) पहा)

जास्त लघवी होणे

‘जास्त लघवी होणे याचा अर्थ नेहमीपेक्षा जास्त होणे. उदा. मोसमाप्रमाणे नेहमी 24 तासांत मिळून दीड ते दोन लिटर लघवी होते. मात्र आता ती 2 ते 3 लिटर किंवा जास्त होत असेल तर ती ‘जास्त’ आहे असे म्हणता येईल. हिवाळा, जास्त पाणी किंवा द्रवपदार्थ पिणे ही जास्त लघवी होण्याची सामान्य कारणे आहेत.

ही सामान्य कारणे सोडून ‘मधुमेह’ हे जास्त लघवी होण्याचे प्रमुख कारण आहे.

एकूण लघवी जास्त होत असेल तर नेहमीपेक्षा ‘जास्त वेळा’ म्हणजे परत परत लघवी होण्याची प्रवृत्ती होते.

वारंवार लघवी होणे

pregnancy during urine issue ‘वारंवार’ थोडी थोडी लघवी होत राहणे आणि ‘जास्त’ लघवी होणे यात फरक आहे. सर्वसाधारणपणे मूत्राशय, मूत्रनलिका यांत जंतुदोष असेल तर वारंवार लघवी लागते. मूत्राशय किंवा मूत्रनलिकेतील आवरणाचा चरचरीत लघवीमुळे दाह होत असेल तर लघवीस वारंवार लागते. मात्र यात एका वेळी लघवी 10-20 मिली. होते; जास्त होत नाही.

गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढीमुळे मूत्राशयावर दाब येतो. पहिल्या तिमाहीत यामुळे वारंवार लघवी होते.

लघवी वारंवार होत असेल तर तज्ज्ञाकडून तपासणी होणे आवश्यक असते. मधुमेह किंवा इतर गंभीर कारण नसल्यास यावर साधा उपाय असा ः गूळ आणि एक-दोन चमचे हळदपूड एकत्र करून पाण्याबरोबर पोटात घ्यायला सांगावे. बऱ्याच जणांना याचा उपयोग होतो.

उन्हाळी

वारंवार लघवी होत असेल तर त्याबरोबर बहुधा उन्हाळी (लघवीस जळजळ) होते. अशा वेळी लघवी गढूळ दिसते. कधीकधी रक्तामुळे लघवी थोडी लाल- तपकिरी दिसते.

उन्हाळी म्हणजे गरमपणा. उन्हाळीची मुख्य कारणे म्हणजे एकतर लघवी तीव्र अथवा चरचरीत असणे. मूत्रनलिकेतील आवरणाचा (अस्तराचा) दाह होत असल्यास साध्या लघवीमुळेही जळजळ होते. मात्र पाणी पिण्याचे प्रमाण गरजेच्या मानाने कमी असल्यास लघवी कडक किंवा जळजळीत होते. त्यामुळे आवरणाचा दाह होतो. अशी लघवी गडद पिवळी किंवा कधी लालसर दिसते.

ताप असेल तर मूळ जंतुदोषावर जंतुविरोधी औषध द्यावे लागते. एरवी उन्हाळीचा उपचार म्हणजे भरपूर पाणी पिऊन लघवी सौम्य-पातळ करणे.

जास्त पाणी पिऊन लघवी सौम्य केल्यास हा त्रास लगेच थांबतो. याबरोबरच खाण्याचा सोडा लिंबू-पाण्यात मिसळून द्यावा किंवा सोडामिंटच्या गोळया द्याव्यात. असल्यास फेनॅडिनच्या गोळया- (पूर्ण नाव फेनॅझोपायरिडिन) घ्याव्यात. या औषधाने लघवीची आग हमखास कमी होते.

आयुर्वेद

उन्हाळीसाठी 100 मि.ली. पाण्यामध्ये 25 ग्रॅम धने भिजत ठेवून हे पाणी 12-12 तासांनी गाळून प्यायला द्यावे. याबरोबर चंद्रकलावटी आणि चंद्रप्रभावटी (250 मि.ग्रॅ) 2 गोळया 2 वेळा याप्रमाणे एक-दोन आठवडे द्यावे.

लघवीतून ‘पू’ येणे

लघवीतून धातू म्हणजे वीर्य जाणे हा शब्दप्रयोग लोकांमध्ये प्रचलित आहे. लघवीतून ‘धातू जाणे’ हा शब्दप्रयोग ‘पू जाणे’ यासाठीच वापरला जातो. ‘वीर्य’ व ‘पू’ दिसायला सारखेच असल्याने हा गैरसमज तयार झाला असावा. लघवीतून वीर्य जाऊ शकत नाही. कारण वीर्य फक्त लैंगिक क्रियेनंतर जाते. इतर वेळी नाही. झोपेत वीर्यस्खलन (स्वप्नदोष) होणे ही एक स्वतंत्र बाब आहे आणि याचा लघवीशी संबंध नाही. हा शब्दप्रयोग अर्थातच पुरुषांबाबतच वापरला जातो.

लघवीवाटे ‘पू’येण्याची कारणे म्हणजे (अ) मूत्राशयाचा जंतुदोष होऊन ‘पू’ तयार होणे व तो लघवीवाटे बाहेर पडणे. हे कारण असेल तेव्हा सर्वच लघवी गढूळ दिसते. (ब) दुसरे कारण म्हणजे मूत्रनलिकेचा जंतुदोष होणे. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये मूत्रनलिकादाहाची काही कारणे समान तर काही वेगवेगळी असतात. लिंगसांसर्गिक जंतुदोष, संभोगानंतर काही वेळा येणारा जंतुदोष, इत्यादी कारणे समान आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीत स्वच्छता न पाळणे, योनिदाहातून येणारा जंतुदोष, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. (क) पुरुषांमध्ये वीर्यकोशाचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष असेल तर पू येत राहतो.

लघवीतून रक्तयेणे

मूत्रसंस्थेत मूत्रपिंडापासून मूत्रनलिकेपर्यंत कोठेही जखमेने रक्तस्राव झाला तर लघवीत रक्त उतरते. दुसरे म्हणजे रक्तातच रक्तस्रावाची प्रवृत्ती तयार झाली (उदा. सर्पदंश, चुकीचे रक्तशरीरात दिले जाणे, इ.) तर लघवीत रक्तदिसते.

लघवीत उतरणाऱ्या रक्ताचे प्रमाण आणि रक्तस्राव झाल्यानंतर गेलेला वेळ यावर लघवीचा रंग अवलंबून असतो.

रक्ताचे प्रमाण अगदी थोडे असेल तर लघवीचा रंग बदलत नाही. पण सूक्ष्मदर्शी यंत्राने तपासणी केल्यास तांबडया पेशी आढळून येतात. रक्तस्राव ताजा असेल तर लघवीचा रंग कमीअधिक लालसर असतो. मात्र ठेवल्यावर थोडया वेळाने त्याचा रंग तपकिरी होतो.

लघवीतून रक्त येण्याची कारणे अनेक आहेत. मूत्रपिंडास मार लागून रक्तस्राव होणे, मूत्रपिंडाचा जंतुदोष, मुतखडे, मूत्रसंस्थेचा कर्करोग, मूत्राशयाला अपघातात मार लागणे, इत्यादी वेगवेगळी कारणे असतात. याचे निदान रुग्णालयातच होणे आवश्यक आहे.

मुतखडयामुळे लघवीतून रक्तस्राव होत असल्यास, तात्पुरता उपाय (रक्तस्राव कमी करण्यासाठी) म्हणून अडुळसा पानांचा रस (20 ते 30 मि.ली.) दर 2-3तासांनी द्यावा. अडुळसा रसाबरोबर खडीसाखरही द्यावी.

मूत्रसंस्थेच्या आजारामुळे पोटात दुखणे

urinary system pains map मूत्रसंस्थेच्या अनेक आजारांमध्ये पोटात दुखते. प्रत्येक आजाराप्रमाणे पोटात दुखण्याची जागा व स्वरूप वेगवेगळे असते.

मूत्रपिंडात आजार असेल तर ‘पोटात दुखणे’ या रोगनिदान तक्त्याच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे (पाहा ः पचनसंस्थेचे आजार) बेंबीच्या बाजूला दोन-तीन इंचावर दुखणे असते. पाठीकडून तपासल्यास शेवटची बरगडी संपते तेथे हे दुखणे आढळते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे हे दुखणे मंद किंवा तीव्र असू शकते. मूत्रवाहिन्यांमध्ये खडा असल्यास त्याच्या जागेप्रमाणे दुखणे असते. मूत्रवाहिनीत खडा असेल तर कळ पोटातून जांघेकडे किंवा लघवीच्या जागेकडे जाते. याबरोबर उलटी, घाम, अस्वस्थता, लघवीत रक्त उतरणे यांपैकी तक्रारी आढळतात.

मूत्राशयाचा आजार असेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे बेंबीच्या खालच्या भागात दुखते. जंतुदोष असेल तर जळजळ किंवा कळ असते. लघवीस अडथळा असेल तर कळ येते. ही कळ मूत्रनलिकेत आल्यासारखे वाटते. मूत्रनलिकेतील जळजळ किंवा कळ प्रत्यक्ष मूत्रनलिकेतच जाणवते. पोटात दुखण्याची जागा, स्वरूप व इतर तक्रारी यांवरून आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी पचनसंस्थेच्या प्रकरणात ‘पोटात दुखणे’ हा तक्ता पाहा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.