Vaccine

प्रति,
मा. संपादक
लोकसत्ता

केंद्र सरकारच्या रोटाव्हायरस लशीच्या अंतर्भावाच्या निर्णयामुळे मतभेदांचे अपेक्षित वादळ उठले आहे. भारत सरकारने रोटाव्हरयरस, जुलाबांविरुद्ध, निमोकॉर्पस (न्युमोनिया विरुद्ध), साल्क लस (पोलिओ विरुद्ध टोचायची लस) आणि मेंदू ज्वर लस यांचा अंतर्भाव जाहीर केला आहे. मा. पंतप्रधानांच्या हस्ते यांचे उद्घाटन पण झाले. याविरुद्ध डॉ. जेकप कुलियन व इतर काही तज्ज्ञांनी साधार आक्षेप नोंदवले आहेत. सार्वजनिक आरोग्य हे मुलत: द्वैतांमधून निवड (दायरेमाज) असते. उपलब्ध पर्यायांपैकी साधक बाधक विचार करून व केल्यास फायदा विरुद्ध न केल्यास तोटा तोलून मापून निर्णय घ्यावे लागतात व त्याचे धन आणि ऋण असे दोन्ही परिणाम कमी अधिक प्रमाणात होतात. द्वैत किंवा मतभेद नसणार्या योजना किंवा मुद्दे फारच कमी असतात. रोटाव्हायरस लशीने केवळ ४०% आजार टळू शकतात, पण इतर होतच राहतील व रिकामी जागा व्यापतील हा मुद्दा आहेच.

तसेच त्यानी आतड्यांमध्ये अवरोध निर्माण होऊ शकतो व तो बाधक ठरू शकतो हे खरे असले तरी त्याचे प्रमाण व प्रकार सौम्य म्हणता येतील. पोलिओ इंजेक्शन शिवाय खरे पोलिओ नियंत्रण होणार नाही अशी तज्ज्ञांची बर्याहच वर्षांची मागणी आहे ती या निमित्ताने पूर्ण होते आहे पण याचा खर्च मोठा आहे. मेंदूज्वराची लस काही बाधित जिल्ह्यांमध्येच लागू आहे. निमोकॉकल लस परिणामकारक असली तरी खर्चिकच आहे. यापूर्वी राष्ट्रीय कार्यक्रमात हेपॅटॅटीस ई ची लस दिली होती त्यात गैरलागू होती यात शंका नाही. याचप्रमाणे पुष्कळ लशी राष्ट्रीय कार्यक्रमात अंतर्भूत होण्यासाठी वाट पाहत आहेत या सर्वांचा खर्च प्रचंड आहे व फायदे तोटे तोलणे आवश्यक आहे. मात्र माझ्या मते हा अंतर्भाव करताना कें्रद सरकारने पुरेशी चर्चा व प्रतिकूल मुद्दे लक्षात घेतले दिसत नाहीत. मुळात अनेक अमेरिकन संस्था, फौंडेशन्स, विद्यापीठे आणि कंपन्या यांचा अजेंडा नीटपणे तपासल्याशिवाय त्यांच्या शिफारशी घेऊ नये कारण अमेरिकन व्यवस्थाच ही मंडळी नीट चालवू शकलेली नाही. तथापि यातले बिल गेटस् फौंडेशन हे नफ्यासाठी काम करीत आहे असे लगेच म्हणता येत नाही.

त्याचप्रमाणे स्वच्छता वगैरे पूरक विकास होईपर्यंत लशी न देणे हा फाय व्यवहार्य मार्ग नाही. काही लशींचा बाळांच्या मेंदूवर व प्रतिकार क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो अशीही मते आहेत. टी.बी. च्या लशीबद्दल देखील गंभीर मतभेद आहेत. एका बाजूला बालरोग तज्ज्ञ संघटना, अधिकाधिक लशी स्वीकारत असल्यामुळे परवडणार्याे कुटुंबांना या लशी स्वीकाराव्याच लागतात व अनेक डॉक्टर्सना यात नाईलाजाने स्पर्धा म्हणून सामील व्हावे लागते. या लशींमुळे डॉक्टरांना वाढीव उत्पन्न मिळते हे लक्षात घेतले तर यावर चर्चा इतकी कमी का हे पटू शकेल. तथापि लशींचे उत्पादन एखादी राष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय कंपनी करीत आहे या कारणास्तव विरोध करणे या युगात किती समर्थनीय आहे कारण इतर अनेक सेवा व वस्तू आपण वापरीतच आहोत मग यालाच विरोध का?

व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमात लशी व तंत्रज्ञान सामील करण्यासाठी पुरेशी साधक बाधक चर्चा त्या त्या राज्यांच्या सल्लागार मंडळांनी केल्यावरच असे निर्णय कार्यान्वित करावेत असे माझे मत आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.