ज्या व्यायामात शरीराला मोठया प्रमाणात हवा वापरावी (प्राणवायू) लागते त्यांना एरोबिक्स (दमसांस) प्रकारचे व्यायाम म्हणतात. मराठीत त्याला खास शब्द नाही. यासाठी आपण ‘हवाहवासा’ किंवा फक्त ‘हवासा’ शब्द वापरू या.
लांब अंतर धावणे, पोहणे, दोरीवरच्या उडया, दंडबैठका, सायकलिंग, लेझिम, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, डोंगर चढणे वगैरे व्यायामप्रकार ‘हवासा’ प्रकारचे आहेत.
आपण स्नायूंचा व्यायाम करायला लागतो (उदा.पळणे), तेव्हा पहिले काही सेकंद स्नायू स्वतःचा राखीव ऊर्जा-प्राणवायू साठा वापरतात. त्यानंतर मात्र रक्तातून ऊर्जा, प्राणवायू पुरवल्याशिवाय काम चालत नाही. यामुळे अर्थातच हृदय व फुप्फुसे जास्त काम करायला लागतात. यालाच ‘दम लागणे’ असे म्हणतात. या प्रकारच्या व्यायामात हृदय-फुप्फुसांचे काम आपोआप वाढते, तसेच यात खूप ऊर्जा-प्राणवायू खर्च होतात. यामुळे शरीरातले ऊर्जासाठे वापरले जातात. कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी असा व्यायाम दम लागल्यानंतरही 8-10 मिनिटे तरी करीत राहणे आवश्यक आहे. चरबी कमी होण्यासाठी मात्र यानंतर 15 मिनिटांपेक्षा पुढचा व्यायाम उपयोगी पडतो.
आयसोमेट्रिक (स्थितियुक्त) व्यायामांत स्नायूंची लांबी कमीजास्त न होता तेवढीच राहते. फक्त त्यांतला जोर कमीजास्त होतो. उदा. आपण एखादी वस्तू दाबून किंवा पेलून धरतो तेव्हा अशी क्रिया होते. बुलवर्कर हा प्रसिध्द प्रकारही याच गटातला आहे. या पध्दतीने स्नायू कमी काळात/श्रमात पुष्ट होतात म्हणून शरीरसौष्ठवासाठी या प्रकारचा व्यायाम उपयुक्त आहे.
याउलट धावणे, पोहणे, इत्यादी आयसोटोनिक (गतियुक्त) व्यायामांत स्नायूंची लांबी कमी-जास्त होत राहते (आकुंचन-प्रसरण). यात श्रम जास्त लागतात. स्नायू तयार व्हायला खूप काळ जावा लागतो, पण त्यांची शक्ती जास्त दिवस टिकून राहते.
या दोन प्रकारांतला फरक हातगाडीच्या उदाहरणाने नीट समजेल. हातगाडी ओढताना पायांची हालचाल होते (गतियुक्त) मात्र हात जोर लावूनही स्थिर आहेत (स्थितियुक्त) त्यामुळे हातांना आणि पायांना वेगवेगळा व्यायाम घडतो. दोन्हीकडे जोर लावायलाच लागतो, पण वेगवेगळा.