urine system icon मूत्रसंस्थेचे आजार स्त्रीजननसंस्था
पुरुषजननसंस्था
शरीरशास्त्र

Male Reproductive Diagram आधी आपण पुरुष जननसंस्थेची रचना पाहू या. अंडकोशातील बीजांडे, त्यातून निघणा-या वीर्यनलिका, वीर्यनलिकांच्या शेवटी असणारे वीर्यकोश, प्रॉस्टेस्ट ग्रंथी आणि शिश्न या सर्वांची मिळून पुरुष जननसंस्था बनलेली आहे.

यातील अंडकोशांचे काम म्हणजे दोन्ही बीजांडांना योग्य संरक्षण व थंडपणा देणे. इतर शरीरापेक्षा थंड तपमान मिळावे म्हणूनच बीजांडे थोडीशी बाहेर आणि वेगळया पिशवीत असतात. या रचनेऐवजी बीजांडे शरीरात-पोटात असती तर उबेमुळे त्यातून शुक्रपेशी निर्माण झाल्या नसत्या.

बीजांडाचे काम म्हणजे शुक्रपेशी निर्माण करणे. एका लैंगिक संबंधात किंवा वीर्यपतनात (सुमारे 2-3 मि.लि.) काही लक्ष शुक्रपेशी असतात. मुलगा वयात आल्यापासून ते म्हातारपणापर्यंत अब्जावधी शुक्रपेशी यातून निर्माण होतात. स्त्रियांमध्ये सुमारे 45 वर्षे वयानंतर स्त्रीबीजे निर्माण होण्याचे थांबते, पण पुरुषांत मात्र ही क्रिया कमीअधिक प्रमाणात टिकून राहते.

बीजांडाचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे पुरुष-संप्रेरके निर्माण करणे. पुरुष-संप्रेरकांमुळे ‘पुरुषी’ खाणाखुणा निर्माण होतात. छातीवर मध्ये केस, दाढीमिशा, लिंगाभोवती केसांची विशिष्ट रचना, पुरुषी आवाज, हाडापेराची ठेवण, स्तनांची वाढ न होणे, चरबीपेक्षा स्नायूंचे प्रमाण जास्त असणे, लैंगिक इच्छा, इत्यादी सर्व गोष्टी या संप्रेरकांमुळेच घडतात. पुरुष बीजांडाचे काम सुमारे 14-15 वर्षाच्या आत सुरु होते आणि एक-दोन वर्षातच पूर्ण जननक्षमता येते.

वीर्यनलिकांचे काम म्हणजे शुक्रपेशी बीजांडातून मूत्रनलिकेपर्यंत आणणे. दोन्ही बाजूंच्या वीर्यनलिका जांघेतून ओटीपोटात शिरतात इथे त्या प्रॉस्टेट ग्रंथीत शिरून मग मूत्रनलिकेत उघडतात. प्रत्येक वीर्यनलिकेच्या या शेवटच्या टोकाजवळ एकेक वीर्यकोश असतो. यांचे काम म्हणजे वीर्य साठवणे आणि लैंगिक संबंधाच्या शेवटी वीर्य दाबाने बाहेर फेकणे. हा दाब निर्माण होण्यासाठी हे वीर्यकोश स्नायूंनी बनलेले असतात.

Venus Cells प्रॉस्टेट ग्रंथी ही लहान लिंबाच्या आकाराची असते. ही ग्रंथी मूत्राशयातून निघणा-या मूत्रनलिकेच्या भोवतीच असते. म्हणजेच मूत्रनलिका या ग्रंथीतून पुढे जाते. वीर्यनलिकाही या ग्रंथीतूनच मूत्रनलिकेत उघडतात. या ग्रंथीतून एक स्त्राव पाझरतो. म्हातारपणी या ग्रंथीची वाढ होऊन घट्ट गाठ तयार होऊ शकते. यामुळे लघवीच्या तक्रारी निर्माण होतात. या ग्रंथीत कर्करोगही निर्माण होऊ शकतो.

शिश्न व मूत्रनलिकेसंबंधी आपण पूर्वी थोडी माहिती घेतलीच आहे. शिश्नाचा टोकाचा भाग बोंडासारखा गोलसर असतो. त्यावरची त्वचा मागेपुढे होऊ शकते. बोंडावरची ही त्वचा आणि टोकाचा भाग अत्यंत संवेदनाक्षम असतो. लैंगिक इच्छा निर्माण होण्यात ही संवेदना महत्त्वाची आहे. शिश्नात मूत्रनलिकेच्या आजूबाजूस जाळीदार पिशव्या असतात. लैंगिक इच्छेच्या वेळी या पिशव्यांत रक्त भरते. त्यामुळे शिश्नाची लांबी, आकार वाढून ते ताठ होते (इंद्रिय उत्थापन). संबंधानंतर या जाळया परत रिकाम्या होऊन शिश्न लहान होते.

पुरुष जननसंस्थेचे मुख्य काम म्हणजे प्रजनन आणि शिश्नावाटे मूत्रविसर्जन. या संस्थेच्या आजारांबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे.

जननसंस्थेच्या आजारांपैकी लिंगसांसर्गिक आजारांची चर्चा वेगळया प्रकरणात केली आहे. या गटाशिवाय जननसंस्थेच्या इतर आजारांची माहिती इथे दिली आहे.

झोपेत धातू जाणे

बरेच पुरुष, विशेषतः वयात येणारी मुले स्वप्नदोषाची तक्रार करतात. झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे. यात दोष असा काही नाही व असे होणे अगदी नैसर्गिक आहे. जवळजवळ सर्व मुलांना वयात येताना हा अनुभव येतो. याने अशक्तपणा, नपुसंकपणा येतो वगैरे भीती अगदी चुकीची आहे. असे काही होत नाही. मात्र चुकीची माहिती व भीती यामुळे ही मुले मन:स्ताप व दुःख सहन करतात. आईवडिलांशी बोलण्याचे धाडस होत नाही व आजूबाजूची मुलेही त्याच गैरसमजाने पोळलेली असतात. ही माहिती योग्य पध्दतीने शाळेतच मिळायला पाहिजे.

असाच प्रकार लैंगिक संबंधाची संधी कमी असलेल्या पुरुषांबाबत होऊ शकतो. याने वीर्य कमी होणे वगैरे काही होत नाही; रक्तही कमी होत नाही. वीर्य परत परत निर्माण होते हे लक्षात ठेवले पाहिजे. याचे अज्ञान हेच दु:खाचे मूळ असते.

‘धातू जाणे’ हा पुरुषांच्या भीतीचा आणखी एक विषय आहे. याबद्दल खालील मुद्दे लक्षात ठेवा.

  • बहुतेक वेळा वरील ‘स्वप्नदोष’ हेच त्याचे खरे कारण असते.
  • काही जण लिंग ताठरताना सुरुवातीस लाळेसारखा चिकट पदार्थ येतो त्याला ‘धातू’ म्हणतात. खरे म्हणजे हे वीर्य नसते. शरीरसंबंध सोपा व्हावा म्हणून निसर्गाने दिलेले वंगण असते.
  • काही पुरुषांच्या लघवीतून फॉस्फेटसारखे क्षार बाहेर पडतात, अशा वेळी लघवी पांढरी धुरकट होते. यालाही गैरसमजाने ‘धातू’ समजले जाते.
  • प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष झाल्यास त्यातला ‘पू’ लघवीनंतर बाहेर पडतो, यालाही ‘धातू’ समजले जाते.

वीर्यकोशांची सूज-पू असेल तरीही असाच अनुभव येतो. प्रॉस्टेट, वीर्यकोश, इ. च्या जंतुदोषात गुदद्वारातून बोट घालून दाबल्यावर मूत्रनलिकेतून हा पांढरट पदार्थ बाहेर पडताना दिसतो, यावरून निदान होऊ शकते. यावर अर्थात वेगळा उपचार करावा लागेल. बहुधा हा जंतुदोष लिंगसंसर्गाने झालेला असतो व जननसंस्थेत सौम्य स्वरूपात रेंगाळत राहतो.

थोडक्यात ‘धातू जाणे’ हा काही भयानक प्रकार नाही, ब-याचदा तो आजार नसतोच. बरेच भोंदू डॉक्टर या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हजारो रुपये उकळतात. आपण याबद्दल योग्य माहिती दिली पाहिजे.

अंडकोश वृषणसूज
जंतुदोषामुळे अंडकोश वृषणसूज

कधीकधी पू-जनक जंतूंमुळे बीजांडे व बीजांडांच्या मागे असणा-या एका लहान पिशवीला सूज येते. जंतुदोष झाल्यास त्या बाजूच्या बीजांडाचा आकार वाढणे, गरमपणा, दुखरेपणा, इत्यादी खाणाखुणा दिसतात. यावर ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते. मात्र उपचार तज्ज्ञाकरवीच व्हावेत. कधीकधी यात पूही भरतो. गालगुंड झाल्यावर कधीकधी बीजांडांना सूज येते. विशेष करून तरुण वयात गालगुंड आले तर ही शक्यता जास्त असते. याने पुरुषाला वंध्यत्वही येऊ शकते.

अंडकोशास सूज

कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेदना, ताप व बीजांडास सूज अशी लक्षणे असतात. पेनिसिलिन किंवा टेट्राच्या गोळया व ऍस्पिरिन, इ. उपचाराने हा आजार आटोक्यात येऊ शकतो. 1-2 दिवसांत आराम पडला नाही तर पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवा.

अंडकोशाचा हत्तीरोग

अंडकोशाची त्वचा हत्तीरोगामुळे सुजून निबर होते. याने संपूर्ण वृषणच मोठे दिसते. याचा आकार खूपच वाढू शकतो. एकदा वाढ झाल्यावर यावर काहीही औषधोपचार होऊ शकत नाही. मात्र सूज शस्त्रक्रियेने काढून टाकता येते.

अंडकोशात भोवती पाणी जमणे

Scrotal Swelling बीजांडांच्या भोवती एक पातळ दुपदरी आवरण असते. यात काही कारणाने (कधीकधी जन्मजात) पाणी साठून अंडकोश मोठा दिसतो. अशा वेळी दुखरेपणा, गरमपणा नसतो. अंधारात अंडकोशावर बॅटरी लावून पाहिले असता लालसर गाभा दिसतो. आतल्या पाण्यातून प्रकाशकिरण आरपार जात असल्याने व त्वचा पातळ असल्याने असे होते. हा दोष जन्मजात असेल तर झोपेत (म्हणजे आडव्या अवस्थेत) कोशातले पाणी पोटात परत जाते. मात्र दिवसा पाणी परत कोशात उतरते. त्यामुळे आकार कमी-अधिक बदलता राहतो. या दोषावर शस्त्रक्रिया हाच उपाय असून यात पाणी जमलेली पिशवीच काढून टाकतात.

हर्निया किंवा अंतर्गळ

अंडकोशात काही वेळा पोटातली आतडी उतरतात. मुळात बीजांडे ही पोटाच्या पोकळीत तयार होतात. जन्माच्या थोडे आधी हळूहळू जांघेतून उतरून अंडकोशात येतात. याच मार्गाने पाणी किंवा आतडयाचा भाग अंडकोशात येऊ शकतात. हर्निया म्हणजे असा उतरलेला आतडयाचा भाग. हा भाग बोटाने परत (उदरपोकळीत) सारता येतो. जरा दाब वाढल्यावार तो परत येतो. यावर देखील शस्त्रक्रियाच करावी लागते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.