femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
बीजांडाच्या गाठी

बीजांडास अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. गाठ लहान असेल तर ओटीपोटात एक बाजूला लागते. कधीकधी या गाठी दुख-या असतात. यांतल्या काही प्रकारच्या गाठींमध्ये पाणी होते. अशा पाणीदार गाठींचे वजन एक-दोन किलोही भरू शकते.

सोनोग्राफी

गर्भाशय, बीजांड यांच्या गाठींचे प्राथमिक निदान पूर्वी हाताने तपासूनच होत होते. ‘सोनोग्राफी’ ही तपासणी यासाठी खूप उपयोगी ठरते. शंका आल्यावर लवकरात लवकर तज्ज्ञाकडे पाठवणे हीच सर्वात महत्त्वाची मदत आहे. सोनोग्राफीने छोटी गाठ किंवा कर्करोग शोधणे शक्य होते. वयाच्या चाळीशी नंतर दर २ वर्षांनी प्रत्येक स्त्रीने ओटीपोटाची सोनोग्राफी करून घेतल्यास अगदी प्राथमिक अवस्थेत गाठींचे निदान होते.

दुर्बिणतपासणी

दुर्बिणतपासणी (लॅपरोस्कोपी) तंत्राने आता गर्भाशय व बीजांडाच्या गाठींचे रोगनिदान अगदी सोपे झाले आहे. यातून तपासणीसाठी नमुनाही घेता येतो. छोट्या गाठी दुर्बिणीतून शस्त्रक्रियेने काढताही येतात.

गर्भाशयाच्या गाठी

Uterine Swelling गर्भाशयात अनेक प्रकारच्या गाठी येऊ शकतात. त्यात साध्या (म्हणजे कर्करोग नसलेल्या) गाठी आणि कर्करोगाच्या गाठी हे प्रमुख प्रकार आहेत. साध्या गाठी गर्भाशयाच्या आजूबाजूला पसरत नाहीत. वेळी-अवेळी होणारा रक्तस्राव हेच याचे प्रमुख लक्षण असते. कर्करोगाच्या गाठी असल्या तरी हेच लक्षण असते. साधी गाठ मोठी असेल तर हाताला ओटीपोटात ‘गोळा’ लागतो. या गोळयाचा आकार लहानमोठया कवठाइतकाही होऊ शकतो. कर्करोग असेल तर मात्र गोळा फार वाढायच्या आतच रुग्ण दगावण्याची शक्यता असते. कर्करोगाची बाकीची लक्षणे महत्त्वाची असतात. यात भूक, वजन कमी होणे, रक्तपांढरी ही लक्षणे विशेष असतात.

गर्भाशय बाहेर पडणे

Female Urine Issue गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे. ही तक्रार मध्यम वयानंतर पण विशेषतः उतारवयातील स्त्रियांमध्ये आढळते. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातली मूळची जागा सोडून खाली उतरणे. ओटीपोटातले गर्भाशय धरून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हा आजार होतो. जास्त बाळंतपणे, अशक्तपणा, उतारवय ही त्याची कारणे आहेत. खाली उतरण्याच्या पायरीनुसार तक्रारींचे स्वरूप कमी जास्त ठरते.

रोगनिदान, लक्षणे

पहिली पायरी – गर्भाशय खाली उतरताना आपसूकच योनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो. योनिमार्ग खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. यामुळे लघवी अडकते किंवा आपसूक थोडी थोडी लघवी होण्याचा त्रास सुरु होतो. उतारवयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग/ गर्भाशय खाली उतरणे हे एक कारण असू असते.

दुसरी पायरी – गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरले तर योनिद्वारातून गर्भाशयाचे तोंड दिसते.

तिसरी पायरी – यापेक्षाही अधिक उतरले तर पूर्ण गर्भाशयच बाहेर पडलेले दिसते. गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा नाजूक असते. त्यावर कपडा घासल्याने व्रण तयार होतात.

कारणे

गर्भाशय बाहेर पडण्याची तक्रार ही बहुतांशी अयोग्य प्रकारे झालेल्या बाळंतपणाशी संबंधित असते. बाळंतपणात पहिल्यापासून जोर करीत राहणे, बाळंतपण जास्त वेळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटे लावून बाळ ओढणे, मूल जास्त वजनदार असणे, इत्यादी अनेक कारणांमुळे गर्भाशय खाली ओढले जाते. यामुळे गर्भाशयाला धरून ठेवणारे स्नायू आणि पडदे सैल पडून नंतर गर्भाशय खाली उतरते. खूप बाळंतपणे झाल्यानेही स्नायू सैल पडत असल्याने गर्भाशय उतरण्याची शक्यता असते. बाळंतपणानंतर 40 दिवसांच्या आत हे स्नायू बळकट झालेले नसतात. अशा काळात लगेच कष्ट करणा-या स्त्रियांना हा आजार संभवतो. थोडक्यात सांगायचे तर उतारवय व बाळंतपणातील ताण या दोन गोष्टींमुळे गर्भाशय उतरते. जुनाट खोकला, तसेच बध्दकोष्ठ असेल तरी अंग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते या तक्रारींचा उपचारही बरोबरीने केला पाहिजे.

उपचार

पहिल्या पायरीच्या आजारात ओटीपोटाचे विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास चांगला उपयोग होतो. यासाठी आधी साधी पध्दत म्हणजे मलविसर्जनाची इच्छा दाबताना जशी आकुंचनाची क्रिया केली जाते, तशी क्रिया वारंवार करावी. यामुळे ओटीपोटाचे स्नायू चांगले काम करायला लागून गर्भाशय वर उचलले जाते. खरे म्हणजे असा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळी, संध्याकाळी 20-25 वेळा 30-40 दिवस केला पाहिजे. म्हणजे गर्भाशय उतरण्याचा संभाव्य धोका टळू शकतो.

शस्त्रक्रिया

Vajrasana गर्भाशय जास्त खाली उतरून त्याचे तोंड दिसत असेल किंवा लघवी अडकणे, आपोआप होणे असा त्रास होत असेल तर मात्र शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते.

प्रतिबंधक उपाय

प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक बाळंतपण रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे व्यायाम करावेत. कमी मुले होऊ देणे व मुलांमध्ये पुरेसे अंतर असणे आवश्यक आहे. यामुळे ओटीपोटातले स्नायू चांगले राहतात. बाळंतपणानंतर दीड महिना विश्रांती घेणे आवश्यक आहे.

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया

हल्ली गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया खूप प्रचलित आहे. प्रजनन काळाच्या शेवटी किंवा रजोनिवृत्तीनंतर ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सल्ला दिला जातो. यासाठी योग्य कारणे कोणती, काही पर्याय आहेत का हे माहिती पाहिजे तसेच शस्त्रक्रियेबद्दल थोडी माहिती इथे घेऊ या. गैरसमजाने किंवा आग्रहानेही या शस्त्रक्रिया होतात. या शस्त्रक्रियेचे थोडे दुष्परिणामही होऊ शकतात. शस्त्रक्रियांमध्येही काही कमी त्रासदायक पद्धती आता उपलब्ध आहेत.

शस्त्रक्रियेसाठी कारणे

गर्भाशय शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे.

 • मासिक पाळीशी संबंधित जादा किंवा इतर त्रासदायक रक्तस्त्राव औषधोपचारानेही थांबत नसल्यास.
 • ओटीपोटात कायमचे दुखणे, याचे कारण जंतूदोष असू शकतो.
 • गर्भाशयाशी संबंधित कर्करोग.
 • गर्भाशय योनीमार्गात किंवा योनीमार्गाबाहेर उतरणे.
 • बाळंतपणानंतर रक्तस्त्राव थांबत नसेल तर.
शस्त्रक्रियेच्या पद्धती

गर्भाशय ही पेरूच्या आकाराची एक स्नायूंची पिशवी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला गर्भनलिका आणि बीजांड असते. गर्भाशयाचे लांबट तोंड योनीमार्गात उघडते. वय व शस्त्रक्रियेचे कारण विचारात घेऊन किती भाग काढायचा हे ठरते.

 • गर्भाशयाबरोबर गर्भाशयमुख, लसिका आणि बीजांडे काढणे हा एक प्रकार. काही बाबतीत योनीमार्गही काढला जातो.
 • अंशिक शस्त्रक्रियेत गर्भनलिका, बीजांडे, गर्भाशय मुख तसेच मागे सोडतात.

पूर्वी या शस्त्रक्रिया पोटावरून होत. मात्र योनीमार्गातून शस्त्रक्रिया जास्त चांगली हे नक्की. शिवाय लॅपरोस्कोपीच्या सहाय्यानेही योनीमार्गातून गर्भाशय काढता येते.

गर्भाशय शस्त्रक्रियेनंतर होणारे दुष्परिणाम

या शस्त्रक्रियेनंतरही काही त्रास जाणवू शकतो तो असा

 • जंतुदोषामुळे ओटीपोट दुखत राहणे.
 • बीजांड काढल्यास संप्रेरकांची उणीव होऊन दुष्परिणाम होणे. बीजांड काढावेच लागल्यास तोंडाने संप्रेरके देता येतात.
 • पोटावरून शस्त्रक्रिया असल्यास टाक्यांची जागा सुजून दुखत राहते.
 • काही स्त्रियांना मानसिक नैराश्य जाणवते.

गर्भाशय शस्त्रक्रिया टाळण्यासाठी काही पर्याय
पुढील पर्यायांबद्दल आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून निर्णय घ्या.

 • रक्तस्त्रावामुळे शस्त्रक्रिया करायची असल्यास आधी औषधांनी थांबवण्याचा प्रयत्न करून पाहा.
 • गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या कृत्रिम गुठळीने किंवा उच्च सोनोग्राफी कंपनांनी बंद करण्याचे तंत्र उपलब्ध आहे.
 • लॅपरोस्कोपी तंत्राने गर्भाशयाच्या रक्तवाहिन्या बांधून बंद करता येतात.
 • गर्भाशयाच्या गाठी असल्यास लॅपरोस्कोपीने केवळ गाठी काढून टाकणे.
 • गर्भाशयाच्या आत उष्ण पाण्याचा फुगा ठेवून आतील आवरण निकामी करण्याचेही तंत्र आहे.
 • ओटीपोटात सूज, वेदना असल्यास योग्य औषधांनी ते बरे होऊ शकते.
 • गर्भाशय मुखाचा कर्करोग प्रारंभिक अवस्थेत असेल तर केवळ तेवढी शस्त्रक्रिया पुरते.
 • गर्भाशय खूप उतरले नसेल तर स्नायूंना टाके घालून आणि व्यायामाने वर खेचता येते.
 • शक्यतो पोटावरून शस्त्रक्रिया टाळावी. योनीमार्गे शस्त्रक्रिया केव्हाही जास्त चांगली.
विशेष सूचना
 • गर्भाशय काढण्याबद्दल रुग्णानी स्वत: कधीच सुचवू नये.
 • डॉक्टरांनी पहिल्याच भेटीत शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्यास पर्यायी उपचारांबद्दल माहिती घ्यावी.
 • नवरा किंवा कुटुंबियांनी बाईवर शस्त्रकियेसाठी दबाव आणू नये.
 • तुम्ही केव्हाही दुसऱ्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे चांगले. वकीलांप्रमाणे डॉक्टरांचाही सल्ला वेगवेगळा असू शकतो.
 • कर्करोग हे कारण वगळता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने काहीच अपाय नसतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.