Disease Science Icon खास तपासण्या रोगशास्त्र
बेडक्याची तपासणी

ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.

अशा तपासणीसाठी छातीतून येणारा खाकरा, बेडके (थुंकी नाही) जमा करून ठेवावी. त्यातला शक्यतो हिरवट पिवळट पूमिश्रित भाग शोधून त्यातून काडीच्या साह्याने एक ठिपका काचपट्टीवर पसरवावा. याला क्षणभर खालून उष्णता देऊन त्यातले जंतू मारले जातात. (पण जळण्याइतकी उष्णता द्यायची नाही) उष्णता देण्यासाठी काचपट्टी अर्धा सेकंदभर स्पिरीटच्या ज्योतीतून फिरवली जाते. यानंतर या नमुन्याला रासायनिक रंग दिला जातो. क्षयरोगाचे जंतू हा रंग घेतात. सूक्ष्मदर्शकाखाली हे जंतू गुलाबी जांभळया रंगाचे व कांडयांसारखे दिसतात. योग्य पध्दतीने बेडका जमा न केल्यास जंतू न दिसण्याची शक्यता असते. तसेच सतत तीन वेळा तपासणी करावी. यात जंतू न आढळल्यास फुप्फुसाचा क्षयरोग ‘नाही’ असे म्हणता येईल.

मेंदूजल तपासणी

Removing water from back मेंदूच्या अनेक विकारांत, विशेषतः जंतुदोष समजण्यासाठी मेंदूजलाची तपासणी केली जाते. मेंदूजल हे निरोगी अवस्थेत स्वच्छ, पारदर्शक असते. तसेच त्यात प्रथिने व ग्लुकोज, इत्यादींचे ठरावीक प्रमाण असते. मेंदूच्या आवरणाच्या जंतुदोषामुळे दाह झाल्यास मेंदूजलात सूक्ष्मजंतू व श्वेतपेशी (पू) दिसतात. यात प्रथिने, ग्लुकोज यांचे प्रमाण बदलते. यावरून जंतुदोषाचे पक्के अनुमान काढता येते. तसेच हा दोष क्षयाच्या जंतूंचा आहे की इतर पू जनक जंतूंचा आहे हेही समजते.

यासाठी चेतारज्जूच्या दुपदरी आवरणातून मेंदूजल काढले जाते. ‘पाठीतून पाणी काढणे’ म्हणजे खरोखर मेंदूजल काढणे असते. कारण मेंदू व चेतारज्जूवरील दुपदरी आवरण एकच असते या दुपदरी आवरणात मेंदूजल खेळते असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.