Anatomy Icon शरीरशास्त्र
शरीरातील संस्था
शरीरात निरनिराळया कामांसाठी निरनिराळया संस्था आहेत.
 • रचना व बांधणी – अस्थिसंस्था (हाडे आणि सांधे)
 • हालचाल – स्नायू
 • पदार्थाची देवाणघेवाण – पचनसंस्था आणि श्वसनसंस्था
 • पदार्थाची अंतर्गत वाहतूक – रक्त, रस हे माध्यम आणि रक्ताभिसरण संस्था
 • टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट- मूत्रसंस्था, (तसेच मोठे आतडे, त्वचा व श्वसनसंस्था)
 • नियंत्रण -चेतासंस्था, ज्ञानेंद्रिये आणि संप्रेरकसंस्था
 • संरक्षण – त्वचा हालचाल आणि रोगप्रतिकार व्यवस्था
 • पुनरुत्पादन -जननसंस्था
अस्थिसंस्था

Bone Institution आपल्या शरीराचे चलनवलन हाडे, सांधे व त्यांना हलवणारे स्नायू यांमुळे होते. बहुतेक सर्व शारीरिक हालचालींत हाडे व स्नायूंचा भाग असतो. मात्र पापणी,जीभ वगैरे काही भागांत मुख्यतः फक्त स्नायूंचेच काम असते

अस्थिसंस्थेच्या रचनेचे मुख्यतः चार भाग पडतात

 • पाठीचा कणा
 • डोक्याची कवटी
 • हात, खांदे, छातीच्या फासळया
 • पाय, खुबे व कमरेची हाडे

पाठीचा कणा हा मध्यभागी असून बाकीचे गट हे त्याला जोडलेले असतात. हातांची व पायांची स्थूल रचना बरीचशी सारखी असते. फक्त हाताच्या विशिष्ट ठेवणीमुळे अधिक कुशल हालचाल शक्य होते.

शरीराचा आकार व उंची ही अस्थिसंस्थेमुळेच असते. तसेच हालचालही यामुळेच शक्य होते. कवटीमुळे मेंदूचे संरक्षण होते. छातीच्या पिंज-यामुळे फुप्फुसे व हृदयाचे संरक्षण होते. कंबरेच्या हाडांमुळे लघवीची पिशवी, स्त्रियांची जननसंस्था, इत्यादी सुरक्षित राहतात.

हाडांची रचना कठीण पेशींनी बनलेली असते. त्यातला कठीणपणा चुन्याच्या क्षारांमुळे असतो. काही हाडांमध्ये पोकळया असून त्यांत रक्तपेशी तयार होतात. हाडांच्या रचनेवरुन व आकारांवरुन त्यांचे प्रकार पाडलेले आहेत. (उदा. चपटी हाडे, लांब हाडे).

सांधे

Joints सांध्यांचे काम दोन प्रकारचे असते. एक म्हणजे निरनिराळी हाडे एकमेकांशी जोडणे आणि धरुन ठेवणे. दुसरे काम म्हणजे विशिष्ट प्रकारची हालचाल होऊ देणे. सांध्यांच्या रचनेप्रमाणे त्यांचे प्रकार असे :

 • करवती (अचल) सांधा : यात हालचाल होत नाही. हाडे पक्की जोडलेली असतात. उदा. कवटीची हाडे एकमेकाला अशी जोडलेली असतात.
 • बिजागरीचा सांधा : या सांध्यात दाराप्रमाणे किंवा अडकित्त्याप्रमाणे एकाच दिशेने हालचाल होऊ शकते. उदा. गुडघा, कोपर, इ.
 • उखळीचा सांधा: खुबा, खांदा यांमध्ये मागेपुढे, बाजूला वगैरे दोन-तीन दिशांनी हालचाल होऊ शकते.
 • सरकता सांधा : यांमध्ये हाडे फक्त एकमेकांवर थोडी सरकू शकतात. उदा. मनगटातील सांधे, पायाचा घोटा, टाचा, तळवा यांतील सांधे.

याखेरीज सांध्याला मजबुती येण्यासाठी बाजूंनी घट्ट पडद्याचे आवरण (सांधेकोष) असते. एखादा सांधा मुरगळतो तेव्हा या पडद्यांना ताण पडून इजा झालेली असते. या आवरणातून एक प्रकारचा तेलकट पदार्थ निघून हाडांची झीज होणे वाचते. हाडांचे एकमेकांवर घर्षण होऊ नये व हालचालींमुळे बसणारे धक्के कमी व्हावेत यासाठी हाडांवर मऊ कूर्चेचे आवरण असते.

स्नायुसंस्था

Back Muscles स्नायू म्हणजे गरजेनुसार आखूड-सैल होऊ शकणा-या असंख्य तंतूंची एक जुडी किंवा गट असतो. स्नायू बहुधा दोन वेगवेगळया हाडांना घट्ट जोडला गेलेला असतो. स्नायू आखडला की मधल्या सांध्यापाशी हालचाल होते. यामुळे हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. स्नायूंमुळे शरीरात पापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कु-हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत सर्व गोष्टी घडतात. तसेच श्वासोच्छ्वास, हृदयाची धडधड, मल-मूत्रविसर्जन, अन्न गिळणे, घुसळणे, अशा सर्व क्रिया स्नायूंच्याच हालचालींमुळे होतात.

काही स्नायू आखडण्याची व सैल पडण्याची क्रिया आपल्या इच्छेने होते. या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. (उदा. हाताचे, पायाचे स्नायू). मात्र हृदय आतडी यांचे स्नायू आपल्या इच्छेशिवाय काम करतात, म्हणून या क्रिया आपल्याला फारशा जाणवत नाहीत. काही स्नायू इच्छेशिवाय किंवा इच्छेने अशा दोन्ही प्रकारची कामे करतात. उदा. छातीचे श्वसनाचे स्नायू आपोआप काम करत असतात. शिवाय आपण मुद्दाम श्वास घेऊ, रोखू, सोडू शकतो.

सर्व प्रकारच्या स्नायूंवर मेंदूचे नियंत्रण असते. विजेच्या किंवा टेलिफोनच्या जशा तारा असतात तसेच मेंदूपासून निघून चेतातंतू स्नायूंमध्ये जोडलेले असतात. स्नायूंमध्ये काय चालले आहे व त्यांनी काय करायचे आहे हे संदेश या चेतातंतूंमुळेच शक्य होतात. हे चेतातंतू तुटले तर हे काम बंद पडून स्नायू निर्जीव होतात.

स्नायू काम करतात ते इंधनाच्या जोरावर. इंधन म्हणून ग्लुकोज साखरेचा व प्राणवायूचा उपयोग होतो. ही साखर व प्राणवायू रक्तामार्फत प्रत्येक स्नायुतंतूपर्यंत पोहोचवली जाते. साखर वापरल्यानंतर उरलेले टाकाऊ पदार्थ रक्तामार्फत उचलले जातात.

पचनसंस्था

Digestive System आपण अन्न खातो त्याचे पुढे काय होते? अन्नाचा घास तोंडामध्ये चावला जातो त्यात आपली लाळ मिसळते. ही लाळ गालांतल्या व जिभेखालच्या लालोत्पादक पिंडांतून तोंडात येते. या लाळेमुळे अन्न चावले जाताना थोडेसे पातळ व हलके केले जाते.

अन्न तोंडात घेतल्यापासून बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रवास एका बंद नळीतून होतो. या नळीत जागोजागी त्याचे पचन होते. आवश्यक पदार्थाचे पचन, शोषण होऊन बाकीचे शेवटी बाहेर टाकले जातात.

जठर

आपण घास गिळतो तो छातीतून खाली पोटात जातो हे जाणवते. गिळल्यानंतर घास अन्ननलिकेतून जठरात येतो. या जठराच्या पिशवीत पाचकरस व आंबट द्रव्ये अन्नात मिसळतात. तसेच या पिशवीत अन्न व सगळे रस तास-दीड तास घुसळले जातात. या घुसळण्यामुळे अन्नकण लहान व पातळ होतात. यामुळे त्यातली प्रथिने पचण्यास सोपी होतात. एखाद्या वेळेस माणसाला उलटी होते; आणि ती तपासून जेवणानंतर किती वेळ गेला आहे ते कळू शकते. उलटीतून अन्न पदार्थ खाल्ल्याप्रमाणे जसेच्या तसे पडले असतील तर पचन न होता लगेच पडले असा त्याचा अर्थ करता येतो. मात्र अन्न ब-याच वेळाने उलटले तर ते खिरीसारखे पातळ व एकजीव कालवलेले दिसते.

जठरामध्ये काही पदार्थ, औषधे शोषली जाऊन रक्तात मिसळतात. ही क्रिया कशी होते ते पाहू या. जठराची पिशवी ही एक प्रकारच्या स्नायूंची बनलेली असते. या पिशवीत आतून मखमलीसारखे आवरण असते. या आवरणाखाली सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे (केशवाहिन्यांचे) जाळे पसरलेले असते. जठरात शोषले जाणारे घटक या आवरणातून केशवाहिन्यांपर्यंत येतात. तेथून ते शोषले जाऊन रक्तात मिसळतात. यानंतर ते पुढे शरीरात सगळीकडे जातात.

आतडी

जठरातून अन्न पुढे आतडयात ढकलले जाते. आतडी दोन प्रकारची आहेत.

सुरुवातीला लहान आतडे असते. हे सुमारे 22 फुट लांब व सुमारे दीड इंची नळीच्या आकाराचे असते. (यातला अन्नमार्ग मोठया आतडयाच्या तुलनेत लहान व अरुंद म्हणून याला लहान आतडे असे म्हणतात.) उदरपोकळीत लहान आतडयाची वेटोळी असतात. आतडयांची ही नळी स्नायूंची बनलेली असते व त्यातही मखमलीसारखे आवरण असते.

अन्न जठरातून आतडयात आल्यानंतर त्यात पित्तरस व आणखी एक प्रकारचा रस (स्वादुरस) मिसळतो. तसेच आतडयातून आणखी एक रस (आंत्ररस) पाझरतो. या रसांमुळे अन्नातले सगळे घटक नीट पचवले जातात. हे घटक हळूहळू आतडयांच्या आवरणातून रक्तात शोषले जातात.

अन्नाचे बहुतेक पचन व शोषण लहान आतडयात होते. बरीचशी औषधे लहान आतडयात शोषली जातात.लहान आतडयात काही वेळा आजार होऊन अतिसार, जुलाब होतात. या आजारात बहुतेक अन्न न शोषता तसेच बाहेर ढकलले जाते.

मोठे आतडे पाच-सहा फूट लांब पण रुंदीने मोठे असते. ते पोटात विशिष्ट रचना करुन बसवलेले असते. लहान आतडयातून चोथा व पाणी असलेला पातळ टाकाऊ पदार्थ मोठया आतडयात येतो. तेथे पाणी शोषले जाऊन सर्व चोथा आवळून बाहेर टाकला जातो.

मोठया आतडयाच्या सुरुवातीस उजव्या टोकाला एक मिरचीसारखा दिसणारा दोन-तीन इंचांचा अवयव असतो. याचा शरीराला तसा काही उपयोग नाही. मात्र त्याला सूज आल्यावर खूप त्रास होतो. हा अवयव म्हणजे आंत्रपुच्छ (ऍपेंडिक्स).

पाचकरस व यकृत

आवश्यक ते पाचकरस लालोत्पादक पिंडातून, जठरातून, लहान आतडयातून येतात. तसेच ते यकृत (लिव्हर) व स्वादुपिंडातून येतात. यकृत (लिव्हर) हा हिरवट तपकिरी रंगाचा मोठा (एक ते दीड किलो वजन) अवयव असतो. यातून पित्तरस पाझरतो पित्ताशयातून पित्तरस लहान आतडयात येतो.

याशिवाय यकृताचे महत्त्वाचे काम म्हणजे रासायनिक प्रक्रिया. आतडयात शोषलेले सर्व अन्नघटक व पदार्थ रक्तावाटे आधी यकृतात येतात. तिथे त्यातील साखर, प्रथिनघटक, स्निग्धद्रव्ये, जीवनसत्त्वे, क्षार अशी विभागणी होते. यानंतर आवश्यक ते पदार्थ रक्तात सोडणे, बाकीचे साठवून ठेवणे वगैरे कामे पार पाडली जातात. वापरुन झालेले रक्तातील घटक, औषधे, विषारी द्रव्ये यांची विल्हेवाट लावण्याचे काम यकृताचेच असते. थोडक्यात, यकृत हा शरीराचा जणू रासायनिक कारखाना आहे. (काही लोक याला काळीज म्हणतात पण काळीज म्हणजे खरोखर यकृत नसून हृदय असते).

मलविसर्जन

सर्वसाधारणपणे अन्न खाल्ल्यापासून आठ -दहा तासांत सर्व पचनक्रिया पूर्ण होऊन मळ बाहेर टाकण्यास योग्य होतो. सर्वसाधारणपणे दिवसातून एकदाच तो बाहेर टाकला जातो. पण काही जणांना मलविसर्जन दिवसांतून दोनदा तर काहींना दोन-तीन दिवसांतून एकदा असेही प्रमाण असू शकते.

आहारातील पदार्थाप्रमाणे मळाचे प्रमाण ठरते. जर आहारात भाजीपाला, कोंडा वगैरे चोथा असणारे पदार्थ कमी असतील तर मळाचे प्रमाण कमी होते. यामुळे शौचास साफ होत नाही. आहारात चोथा असणे आरोग्याला अत्यंत आवश्यक आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.