Accidents Icon अपघात व प्रथमोपचार
भाजणे

Burns स्त्रियांच्या अपघाती मरणाचा हा दुसरा दुर्दैवी मार्ग आहे. भारतात तरी जळून मृत्यू पावणा-यांत स्त्रियांचे प्रमाण खूपच अधिक आहे. यातही अपघात, आत्महत्या, खून असे तीन्ही प्रकार आहेत. पण जळिताच्या बहुतांश घटना अपघात म्हणून निकाली निघतात.

सामाजिक वास्तव

बुडण्याप्रमाणे भाजण्याचे प्रमाणही स्त्रियांमध्ये अधिक आढळते. याचे मुख्य कारण स्टोव्ह किंवा शेगडयांच्या अपघातापेक्षा खून, आत्महत्या हेच आहे. पुरुषांच्या बाबतीत मात्र बहुधा हा अपघात असतो. जळून मरणे ही भीषण घटना असते. याचे प्रमाण कमी करायचे असेल तर स्वयंपाकघरातल्या साधनांची सुधारणा तर महत्त्वाची आहेच, पण खरा भर स्त्रियांचे समाजातले स्थान सुधारण्यावर द्यायला हवा. स्त्रियांची स्थिती सुधारली तरच हे अपघात कमी होतील.

पुरुषांचे अपघात मुख्यतः कारखाने, ज्वालाग्रही पदार्थांचे स्फोट यामुळे होतात. दिवाळीतले दारूकाम हे एक कारण असून यात बहुधा मुले सापडतात. प्रत्यक्ष उष्णतेऐवजी काही वेळा रासायनिक पदार्थांमुळे भाजते (उदा. सल्फ्युरिक ऍसिड.) उष्णतेने भाजण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आग, उष्ण हवा, इत्यादींमुळे आणि दुसरा प्रकार वाफ किंवा उष्ण द्रवपदार्थ (पाणी, तेल, दूध, इ.) अंगावर सांडून भाजणे. यातील दुस-या प्रकारच्या भाजण्याच्या जखमा जास्त खोल असतात, कारण अशा पदार्थात जास्त उष्णता साठलेली असते.

भाजण्याची कारणे

भाजण्याच्या घटनांची यादी याप्रमाणे करता येईल.

 • स्त्रियांच्या खुनाचा प्रयत्न – जाळून मारणे.
 • स्वयंपाकघरात स्टोव्ह व शेगडीचे अपघात.
 • आत्महत्येचा प्रयत्न.
 • दिवाळीतले फटाक्यांचे अपघात.
 • ज्वालाग्राही पदार्थांचे स्फोट, कारखान्यातले अपघात.
 • घरांना आगी लागणे.
 • रासायनिक पदार्थामुळे भाजणे (उदा. ऍसिड)
 • शॉर्ट सर्किट, विद्युत धक्का लागून भाजणे, वीज पडणे
कसे व किती भाजले आहे?

Burns भाजण्याच्या जखमा किती खोल आणि किती भागावर आहेत हे ठरवणे महत्त्वाचे असते. यावर पुढचे उपचार, जगण्याची शक्यता, इत्यादींबद्दल सांगता येईल.

किती खोल भाजले आहे याबद्दल ठरवणे जरा अवघडच असते. नुसती कातडी लालसर भाजली असेल तर वरवर भाजले आहे असे म्हणता येईल. कातडीबरोबर खालची चरबी, स्नायू, इत्यादी थर भाजले असतील तर ती’खोल’ जखम असते.

 • खोल भाजले असेल तर कातडीखालचे चेतातंतू भाजल्यामुळे वेदना फारशी नसते.
 • याउलट भाजण्याच्या वेदना फार असतील तर ‘वरवर’ भाजण्याची शक्यता असते, कारण खालचे चेतातंतू जिवंत असतात.
 • त्वचेखालचे स्नायू उघडे पडले असतील तर या जखमा खोल आहेत हे स्पष्टच असते.
 • त्वचेवर भाजण्याचे फोड असतील तर हे भाजणे ‘मध्यम’ असते.
9 चा नियम

Rules 9 किती त्वचा भाजली आहे हे ठरवणे सोपे आहे. यासाठी ‘9 चा नियम’ आहे. शरीरावरचा एकूण पृष्ठभाग 100 भाग धरला तर त्यातील निरनिराळया भागांची वाटणी खालीलप्रमाणे :

 • डोके + चेहरा =9टक्के
 • खांद्यापासून पूर्ण हात =9 टक्के (दोन्ही बाजूंचे मिळून 18 टक्के)
 • जांघेपासून पायाच्या बोटापर्यंतचा भाग म्हणजे संपूर्ण पाय, त्याचा पुढचा भाग 9 टक्के आणि मागचा 9 टक्के मिळून प्रत्येकी 18 टक्के व म्हणून दोन्ही पाय36 टक्के
 • मानेपासून जननेंद्रियापर्यंत धडाचा भाग, त्याची व पुढची बाजू 18 टक्के
 • धडाची मागची बाजू 18 टक्के
 • असे सर्व मिळून 99 टक्के आणि
 • जननेंद्रियाची त्वचा 1 टक्का धरली जाते. ही टक्केवारी प्रौढांसाठी आहे. मुलांसाठी वेगळी टक्केवारी आहे.
  भाजण्याची टक्केवारी काढताना या नियमावरून काढली जाते. साधारणपणे 60 टक्के किंवा जास्त भाजले असल्यास जगण्याची शक्यता कमी असते. अगदी चांगले प्रयत्न झाल्यास काही बाबतींत यश मिळते. 40 ते 60 टक्के भाजले असल्यास आणि चांगले उपचार झाल्यास रुग्ण बहुधा वाचतो.

भाजण्याच्या टक्केवारीइतका भाजण्याचा खोलपणाही घातक असतो.

प्रथमोपचार

Pour Water सर्वसाधारणपणे उष्णता जेवढी जास्त वेळ त्वचेला लागेल तेवढी जखम जास्त खोल जाते. म्हणून भाजलेला भाग लवकरात लवकर थंड करता आला तर तेवढे नुकसान कमी होते. म्हणून भाजण्याच्या जखमांवर सगळयात महत्त्वाचा प्रथमोपचार म्हणजे साधे पाणी ओतणे. गैरसमजाने पाणी न टाकता अनेक गोष्टी केल्या जातात (उदा. चादरी गुंडाळणे); पण पाणी टाकणे यासारखा दुसरा चांगला प्रथमोपचार नाही. पाणी टाकल्याने आग लगेच विझते, उष्णता शोषली जाते, वेदना ताबडतोब कमी होते, चिकटलेले कपडे सुटायला मदत होते आणि जखमांची तीव्रता कमी होते. नंतर दर 2-3 मिनिटांनी जखमांवर ओली फडकी बदलून ठेवा.

भाजलेल्या व्यक्तीस ताबडतोब रुग्णालयात हलवावे लागते. कारण शरीरातील पाणी इतके कमी होऊन मृत्यू येऊ शकतो. म्हणून सलाईन देऊन आधी प्राण वाचवावा लागतो. शक्य असेल तर सलाईन लावून रुग्णालयात नेणे केव्हाही चांगले. रुग्ण घेत असेल तर तोंडानेही पाणी देणे चांगले, जेवढे पाणी शरीरात जाईल तेवढे जाऊ द्या. हा एक महत्त्वाचा प्रथमोपचार आहे. भाजलेल्या व्यक्तीस रुग्णालयात घेऊन जाताना स्वच्छ चादर, साडी वगैरेंनी जखमा झाकून न्या म्हणजे धूळ, माशा बसणार नाहीत.

रुग्णालयातले उपचार

रुग्णालयातल्या उपचारांची महत्त्वाची तत्त्वे अशी आहेत

 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम योग्य ठेवण्यासाठी शिरेतून सलाईन, इत्यादी द्रवपदार्थ देणे.
 • शरीराची प्रतिकारशक्ती, जखमा भरून येण्याची क्षमता टिकवण्यासाठी प्रथिनयुक्त आहार देणे, आवश्यक वाटल्यास रक्त देणे.
 • जखमांना जंतुदोष होऊ नये म्हणून मलमपट्टी करणे, जंतुविरोधी औषधे देणे. (त्वचा थोडया प्रमाणात भाजली असेल तर पट्टया बांधण्याची गरज नसते.)
 • खोल व उघडया जखमा असल्यास मृत भाग योग्यवेळी काढून टाकून मलमपट्टया करतात.
 • मलमपट्टयांच्या ऐवजी आणखी काही साधने वापरता येतात. कोरफडीची गरासहित साल, उकडलेल्या बटाटयाच्या साली, इत्यादी साधने वापरता येतात. ही साधने सहज मिळतात आणि निर्जंतुकही असतात. जखमांमध्ये पू लवकर होतो आणि तो काढून टाकणे महत्त्वाचे असते, नाही तर जंतुदोष वेगाने पसरतो.
 • जखमा स्वच्छ, लालसर, मांसल दिसायला लागतील तेव्हा गरजेनुसार त्वचारोपण केले जाते. याला प्लास्टिक सर्जरी म्हणतात. यासाठी रुग्णाची स्वतःची चांगली त्वचा काढून जखमांवर चिकटवली जाते. ही नवी त्वचा तिथे रक्तपुरवठयावर वाढायला लागते. योग्य काळजी घेतल्यास हळूहळू ही त्वचा पूर्ण जखमेवर पसरते. काही वेळा रक्तपुरवठयासहित त्वचेचा एखादा भाग ‘फिरवून’ जखमेवर लावला जातो.
 • जखमा खोल नसतील तर त्वचेच्या केसांच्या ग्रंथीपासून त्वचेच्या पेशी वाढायला लागतात व त्वचा भरून येते.
 • भाजलेले भाग बरे होताना आखडू नयेत म्हणून योग्य स्थितीत ते ठेवणे आवश्यक असते. उदा. हाताच्या काखेतला भाग जळाला असल्यास काख उघडून, हात शरीरापासून लांब करून ठेवणे आवश्यक असते, गुडघ्याचा मागचा भाग भाजला असेल तर गुडघा न वाकवता सरळ ठेवणे आवश्यक असते; नाही तर हळूहळू बरा होईल तसा तो आखडत जाईल. हे सांभाळणे फार आवश्यक असते. आखडलेले अवयव पुन्हा पूर्वीसारखे मोकळे करणे फार अवघड असते. नंतर शस्त्रक्रिया करून थोडयाफार प्रमाणातच ते शक्य असते, पण बरे होताना मुख्य काळजी अवयव आखडू न देण्याचीच असते.
 • चांगली काळजी घेऊन अनेक रुग्ण निश्चितपणे जगवता येतात. चाळीस टक्क्यांखाली मृत्यूची शक्यता कमी, पण जंतुदोषापासून रुग्णाला वाचवणे आवश्यक असते. साधारणपणे 10 टक्के भाजले असले तर रुग्णालयात दाखल न करता घरच्या घरी किंवा रुग्णालयात रोज येऊन जाऊन उपचार करता येतात.
 • भाजल्याच्या जखमांचा उपचार कित्येक महिने चालणारा असतो.
होमिओपथी निवड

एपिस,आर्निका,आर्सेनिकम, बेलाडोना, कॉस्टिकम, लॅकेसिस, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

कायदेशीर बाबी

भाजणे ही कायद्याच्या दृष्टीने एक दखलपात्र घटना आहे. पोलिसांना याची खबर देणे आवश्यक असते. अर्थात किरकोळ भाजण्याच्या जखमा कोणी पोलिसांना सांगत नाही, पण जास्त भाजले असल्यास ते आवश्यक आहे, मग तो अपघात असो किंवा नसो. सर्वसाधारणपणे रुग्णालयात दाखल झालेल्या किंवा भाजून मृत्यू पावलेल्या सर्व घटनांची पोलिसांतर्फे नोंद केली जाते.

स्त्रियांच्या भाजण्यात खून, आत्महत्या यांची शक्यता फार मोठी असल्याने रुग्णालयात दाखल केल्याकेल्या पोलिसांना कळवले जातेच, याचबरोबर संबंधित रुग्णाचा व नातेवाईकांचा जाबजबाब घेतला जातो. रुग्णाची स्वतःची जबानी फार महत्त्वाची असते. तेवढा वेळ असेल तर स्थानिक न्यायाधिशास बोलावून मृत्यूपूर्व जबानी घेता आली तर खुनाच्या घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा करणे सोपे होते. न्यायदंडाधिकारी नसल्यास डॉक्टरसमोर जबानी देता येते; पण त्याचे कायदेशीर महत्त्व कमी आहे. ब-याच स्त्रिया सासरच्या लोकांवर दया म्हणून किंवा मागे राहणा-या मुलांना त्रास होऊ नये म्हणून असा जबाब देणे टाळतात आणि गुन्हेगार सुटतात.

भाजण्याचे अपघात टाळण्यासाठी
 • स्वयंपाकघरात वावरताना सुती कपडे वापरावेत, कृत्रिम धाग्यांचे कपडे (नायलॉन, टेरेलिन, इ.) लवकर पेट घेतात, पेटल्याने वितळतात व अंगाला चिकटतात. फटाके वाजवतानाही सुतीच कपडे असावेत. (फटाके नकोच)
 • स्वयंपाकघरातले अनेक अपघात पदर स्टोव्हवर किंवा शेगडीवर पडून होतात. याची जाणीव ठेवून पदर बांधून स्वयंपाकघरात वावरावे. स्टोव्ह, शेगडीसाठी कट्टा असेल तर असे अपघात टळतील. पण आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये स्वयंपाक-कट्टयाची सोय नसते.
 • स्टोव्ह पेटवताना खूप पंप करून पिन करणे चुकीचे आहे. अशा वेळी काडी पेटवल्यावर एकदम भडका उडण्याचा संभव असतो. स्टोव्हमध्ये दाब कमी असतानाच पिन करावी व स्टोव्ह चांगला पेटल्यावर जास्त पंप करावा.
 • गॅस लीक (गळती) असेल तर विजेची बटने लावू नयेत, दारे, खिडक्या उघडावीत व घरातला गॅस कमी होऊ द्यावा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.