/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
चेतारज्जूचे आजार

पोलिओ हा एक चेतारज्जूचा आजार आहे. याशिवाय अपघात, मार बसणे, मणका सरकून दाब पडणे, इत्यादींमुळे चेतारज्जूच्या कामकाजात बिघाड होतो. यामुळे निरनिराळी लक्षणे दिसतात. शरीराच्या संबंधित भागावर मुंग्या येणे, बधिरता येणे, शक्ती कमी होणे, संबंधित भाग लुळा पडणे, मूत्राशय, गुदाशय यांवर नियंत्रण न राहणे, इत्यादी परिणाम होतात. बिघाडाच्या जागेवर व कमीअधिक तीव्रतेवर हे परिणाम अवलंबून असतात. दोन मणक्यांच्या मध्ये एक कूर्चेची चकती असते. ही चकती आत सरकून चेतारज्जूवर दाबते. अशा प्रकारचा बिघाड कमरेत होण्याची शक्यता असते. यात पाय दुखणे, मुंग्या येणे, बधिरता, इत्यादी लक्षणे आढळतात. अशा आजारांसाठी तज्ज्ञांकडून उपचार होणे आवश्यक आहे.

तपासणी

पाठीच्या कण्यात चेतांवर इजा किंवा दबाव असेल तर या तपासणीतून कळेल. यासाठी रुग्णाला पाठीवर झोपू द्या व दोन्ही पाय सरळ ठेवायला सांगा. आता एक पाय वरती सरळ अवस्थेत वर उचलायला सांगा. उचलताना कंबरेत किंवा मांडीत वेदना होते का? वेदना होत असेल तर त्या बाजूच्या नसांवर दाब येत आहे असा अर्थ काढता येतो. दोन्ही बाजूंची तपासणी करावी.

मेंदूसूज

Brain Swelling मेंदूसूज म्हणजे मेंदूचे आवरण किंवा अस्तर सुजणे किंवा मेंदूतच सूज येणे, असा अर्थ इथे सोयीसाठी घेतलेला आहे. हे दोन्ही आजार वेगळे असले तरी परिणाम जवळजवळ सारखेच दिसतात त्यामुळे मेंदूसूज या एकाच नावाखाली दोन्हींचे वर्णन करता येईल.

मेंदूसुजेच्या या दोन्ही प्रकारांपैकी मेंदूच्या आवरणाच्या सुजेचे प्रमाण जास्त आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळतो.

कारणे

मेंदूच्या आवरणाची किंवा मेंदूतली सूज, जीवाणू किंवा विषाणूंमुळे होते. जीवाणूंपैकी ‘पू’ निर्माण करणारे जीवाणू किंवा क्षयरोगाचे जीवाणू याला कारणीभूत होऊ शकतात. मेंदूचा हिवताप पण याच गटात येतो.

लहान मुलांना ब-याच प्रकारचे जंतुदोष होतात. हे विकार वेळीच आटोक्यात आले नाही तर कधीकधी ते मेंदूपर्यंत पोहोचतात. कान फुटणे, घसासूज, टॉन्सिलसूज, दातात पू होणे, चेह-यावर गळू, पू, फोड, डोक्यास जखम, श्वसनसंस्थेचे जंतुदोष, प्राथमिक क्षयरोग, इत्यादी आजारानंतर मेंदूच्या आवरणाचा किंवा मेंदूचा जंतुदोष होऊ शकतो.

काही प्रकारची मेंदूसूज स्वतंत्रपणे येऊ शकते. उदा. साथीचा मेंदूज्वर. साथीच्या विषाणूंमुळे येणारा मेंदूज्वर एका विशिष्ट डासामार्फत (क्युलेक्स) पसरतो. हा फार घातक आजार आहे.

लक्षणे व रोगनिदान

क्षयरोगामुळे होणारी मेंदूसूज हळूहळू वाढणारी, सौम्य लक्षणांची असते. याउलट इतर जीवाणू व विषाणूंमुळे येणारी मेंदूसूज तीव्र लक्षणांची व वेगाने (2-3 दिवसांत) वाढणारी असते.

मेंदूसूजेमध्ये खूप ताप, डोकेदुखी, उलटया, झटके, अतिझोप, चिडचिडेपणा, वागण्या-बोलण्यात फरक व पुढे बेशुध्दी अशी लक्षणे दिसतात. बाळास मेंदूसूज असल्यास ते न थांबता सतत रडते.

क्षयरोगाच्या मेंदूसूजेच्या प्रकारात ही लक्षणे सौम्य असतात. ताप त्या मानाने कमी असतो. यात डोकेदुखी, उलटया कमी प्रमाणात असतात व वागण्या-बोलण्यातला फरक एक-दोन आठवडयांत दिसायला लागतो.

  • बाळाची टाळू अजून भरली नसेल तर मेंदूजलाच्या दाबाने टाळू फुगते व दाब जाणवतो. मेंदूसुजेची ही महत्त्वाची खूण आहे.
  • मान ताठरणे ही आणखी एक महत्त्वाची खूण आहे. मेंदू-आवरण सुजेमध्ये रुग्णाची मान ताठरते. मान पुढे वाकवताना वेदना होतात. याचप्रमाणे बसून हाताने पायाचा अंगठा धरताना वेदना होतात व वेदनेमुळे ते शक्य होत नाही.
उपचार

Removing Back Water अशा लक्षणांवरून मेंदूसुजेची शंका घेऊन रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे. एक-दोन दिवसांत योग्य उपचार सुरू झाला तर जीवाणूंमुळे येणारी मेंदूसूज पूर्ण बरी होऊ शकते. त्यासाठी शारीरिक तपासणीबरोबर मेंदूजलपरीक्षा आवश्यक असते. जीवाणू ज्या प्रकारचे (पू तयार करणारे किंवा क्षयरोगाचे) असतील त्यावरून औषधयोजना ठरते. विषाणूंवर औषध नसल्याने विषाणूंची मेंदूसूज एक तर आपोआप थांबते किंवा रोगी दगावतो. मेंदूसूज हा अगदी गंभीर आजार आहे. वेळेवर उपचार न झाल्यास रोगी बहुधा दगावतो किंवा मेंदूवर कायमचे दुष्ट परिणाम राहतात. जंतुविरोधी औषधांमुळे मेंदूसुजेवर काही प्रमाणात तरी नियंत्रण शक्य झाले आहे. म्हणून लवकर रोगनिदान व योग्य उपचार होणे आवश्यक आहे. क्षयरोगामुळे होणारा मेंदूचा विकार आता खूप कमी झाला आहे.

या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. जंतुविरोधी औषधांची इंजेक्शने रोज दिवसातून 3-4 वेळा द्यावी लागतात. क्षयरोगाची मेंदूसूज असेल तर बरे व्हायला कित्येक आठवडे लागू शकतात.

प्रतिबंधक उपाय

मुख्य म्हणजे लहान मुलांच्या जंतुदोषांवर वेळीच उपाय करून जंतुदोष आटोक्यात आणणे आवश्यक असते. विशेषतः कान फुटल्यानंतर मेंदूसुजेची शक्यता जास्त असते. साथीचा मेंदूज्वर सोडल्यास इतर प्रकारची मेंदूसूज संसर्गजन्य नसते. (म्हणजे घरात एका मुलाकडून दुस-याला लागत नाही.)

साथीचा मेंदूज्वर

साथीचा विषाणुमेंदूज्वर बहुधा डासांमुळे पसरतो. त्यासाठी सार्वत्रिक पातळीवर उपाययोजना करावी लागते. डासांची संख्या कमी करणे हेच अशा वेळी प्रमुख सूत्र असते. हे डास माणूस व डुकरांमध्ये विषाणूंचा प्रसार करतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.