Family Planning Icon कुटुंब नियोजन वंध्यत्व
गर्भनिरोधन/गर्भप्रतिबंध इतिहास

गर्भप्रतिबंध म्हणजे स्त्रीबीज-शुक्रबीज यांचे मीलन न होऊ देणे किंवा फलित गर्भ रुजू न देणे. खरे म्हणजे फार पूर्वीपासून हा प्रयत्न मानवाने केलेला आहे. वीर्यपतनाआधी पुरुष इंद्रिय योनिमार्गातून काढून घेणे, ब्रह्मचर्य पाळणे, झाडपाल्यांचा वापर वगैरे अनेक पध्दती माणसाने वापरल्या. बाळाला अंगावर जास्तीत जास्त महिने पाजणे हा गर्भनिरोधनाचा मार्ग हमखास नसेल पण एकूण समाजातला जन्मदर स्तनपानाने कमी होतो. काही समाजांमध्ये गर्भाशयाच्या तोंडातून निघणारा चिकटा तपासून गर्भधारणा टाळण्याचा प्रघात आहे.

प्राण्यांचा अभ्यास करताना माणसाने काही पध्दती यशस्वीपणे वापरल्या. अरबस्तानातून उंटाचे काफिले लांबच्या प्रवासावर नेताना गर्भधारणा होऊ नये म्हणून उंटिणीच्या गर्भाशयात एखादा दगड घालून ठेवण्याची पध्दत फार पुरातन आहे. दुभत्या जनावरांच्या योनिमार्गातून विशिष्ट प्रकारचा शेंबचिकटा दिसू लागला की चोवीस तासात नर दाखवण्याची गरज असते (तरच गर्भधारणा होते) असा अगदी शास्त्रशुध्द समज आहे.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोपात बुध्दिप्रामाण्याचे युग सुरू झाले. यानंतर शास्त्रीयरित्या गर्भनिरोधनाचे प्रयत्न चालू झाले. पुरुषांनी पातळ कातडीचे ‘निरोध’ वापरण्याची पध्दत इथूनच हळूहळू सुरू झाली. हे निरोध बकरीच्या आतडयापासून केलेले असत.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोप अमेरिकेत स्त्रियांनी एक हक्काची बाब म्हणून गर्भधारणा टाळण्याचा मुद्दा मांडला. याबरोबरच योनिमार्गात बसवायचे बूच (डायाफ्राम), रासायनिक गर्भनिरोधके, सुरक्षित काळ पध्दत वगैरे पध्दतींचा प्रसार झाला. साठ सालानंतर स्त्रीसंप्रेरकांचा वापर गर्भनिरोधक म्हणून चालू झाला. संततिप्रतिबंधक साधनांमुळे प्रजोत्पादनाच्या भीतीशिवाय लैंगिक सुख मिळण्याची सोय झाल्याने संततिप्रतिबंधक विचारांचा आणि साधनांचा प्रचंड प्रसार झाला. भारतात त्याच वेळी र.धों कर्वे आणि शकुंतला परांजपे यांसारख्या समाजसुधारकांनी या चळवळीचे बीज रोवले.

गर्भनिरोधकांच्या मुद्यावर गांधीजींची मते फार वेगळी होती. प्रजोत्पादनाच्या हेतूशिवाय लैंगिक संबंध म्हणजे बेजबाबदारपणा आहे असे त्यांचे मत होते. गर्भधारणा टाळण्यासाठी पतिपत्नींनी ब्रह्मचर्य पाळणे हेच योग्य आहे असे त्यांचे मत होते. फार तर नैसर्गिक फलनकाळ सोडून संबंध ठेवावा असे त्यांना वाटे. स्वतंत्र भारतात सुरुवातीला या नैसर्गिक पध्दतींचा अवलंब करून गर्भनिरोधाचा कार्यक्रम आखला गेला. अर्थात नवीन युगात या पध्दतीचा फार प्रसार होणे शक्य नव्हते.

गेल्या एक-दोन शतकांत संततिप्रतिबंधनासाठी संप्रेरकांचा वापर वाढला आहे. गर्भाशयात ठेवण्याच्या साधनांचा वापरही वाढला आहे. खरे म्हणजे संततिप्रतिबंधनशास्त्र आता थोडेसे जास्त आक्रमक झाले आहे. नुकताच शरीरात दीर्घकाळ टिकून राहणा-या संप्रेरक-इंजेक्शनांचा प्रसार चालू झाला आहे. यात स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने स्त्री चळवळीने या धोरणाविरुध्द साहजिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. खरे म्हणजे पुरुषांनी वापरायची संततिप्रतिबंधक साधने स्वस्त व निर्धोक असल्याने त्यांचा जास्त प्रसार व्हायला पाहिजे तो होत नाही. पुरुष नसबंदी ही स्त्री नसबंदीच्या मानाने कितीतरी सोपी व साधी, तीही आता फार प्रचलित नाही. संततिप्रतिबंधन ही हळूहळू केवळ स्त्रियांची जबाबदारी झाली आहे; हे काही फार चांगले नाही.

संततिनियमनाची उद्दिष्टे

कुटुंबनियोजन (कुटुंबकल्याण) कार्यक्रमाची पुढीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत:

  • आईच्या वयाच्या विशीआधी पहिले मूल नको.
  • दोन-तीन मुलांपेक्षा अधिक मुले नकोत. खरे तर दोनपेक्षा जास्त नकोच. पण आपल्या देशात बालमृत्यूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे व मुलींपेक्षा मुलांबद्दल अधिक ओढ असल्यामुळे दोनवर थांबण्याचे प्रमाण कमी आहे.
  • आई-मुलांचे आरोग्य निकोप राहावे.
  • वंध्यत्व असलेल्या कुटुंबात योग्य उपायांनी मूल होण्याची शक्यता निर्माण करणे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.