कानाचे आजार डोळ्याचे आजार
बहिरेपणा
कानाची रचना आणि कार्य

deafness बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे. बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतर्कर्ण, मेंदूची संबंधित आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यापैकी कोठेही दोष असेल तर बहिरेपणा येतो. काही मुलांमध्ये जन्मजात कर्णबधिरता असते व त्यातला मुकेपणा हा बहिरेपणाचाच परिणाम असतो. हा आजार वेळीच ओळखू आल्यास काही उपचार व प्रशिक्षण करता येते.

कोणतेही मूल ऐकून ऐकूनच बोलायला शिकते, म्हणून त्याच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे. काही मुलांना जन्मजात बधिरता असते. हे आईवडिलांच्या लक्षात यायला उशीर होतो. यावर औषधोपचार काही नाही, मात्र हा दोष लवकर ओळखून त्या दृष्टीने संगोपन व प्रशिक्षण करणे आवश्यक असते.

बधिरतेमुळे शब्द कळत नाहीत, म्हणून ही मुले मुकी राहतात. अशा मुलांना सुरुवातीस वेगळया शाळांमध्ये घालावे लागते. अशा शाळा काही शहरांमध्ये आहेत.

आधीचे बाळ मूकबधिर असेल तर पुढील बाळ देखील असे होण्याची बरीच शक्यता असते. गरोदरपणात आईला जर्मन गोवरचा ताप किंवा गालफुगीचा ताप आल्यास गर्भावर हा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

महत्त्वाचे म्हणजे जन्मलेल्या प्रत्येक बाळाची लवकरात अशी तपासणी केली पाहिजे. टाळी वाजल्यावर दचकणे ही सर्वात सोपी खूण आहे. एक महिन्याचे बाळ टाळीला दचकते. टाळीने बाळ दचकत नसेल तर बधिरता असू शकते. तसेच आईचा आवाज, चमचा- वाटीचा ओळखीचा आवाज वगैरे आवाजांना बाळ प्रतिसाद देते की नाही हे आईने ध्यानात घ्यायला पाहिजे. चार महिन्याचे बाळ आवाजाच्या बाजूच्या दिशेला डोळे फिरवते. सहा महिन्याचे बाळ वरच्या आवाजाच्या दिशेने डोळे वळवते. वर्षाचे बाळ तोंडाने बोकाळते पण केवळ बा, बा, मा, मा एवढा आवाज पुरेसा नाही, निरनिराळे आवाज काढले पाहिजेत.

कर्णबधिरता ओळखण्याची नंतरच्या वयात एक महत्त्वाची खूण आहे. अशा मुलाला हवी आहे ती वस्तू न सांगता ते त्या वस्तूकडे बोट करते. (उदा. पाण्याचा माठ, जेवण, इत्यादी) मात्र यावेळी मूल थोडे मोठे झालेले असते.

दोन वर्षाचे बाळ बोलायला लागते. असे झाले नाही तर तपासणी केली पाहिजे.

कधीकधी बहिरेपणा पूर्ण नसतो, थोडाच असतो. अशा वेळी तपासणीसाठी यंत्रांची मदत होते.

कर्णबधिरतेची इतर कारणे

जन्मजात नसलेला, पण नंतर तयार होणारा बहिरेपणा हा बहुधा एका बाजूला येतो. वर लिहिल्याप्रमाणे त्याची कारणे कानाच्या निरनिराळया भागांत असू शकतात ती अशी…

  • बाह्यकर्ण : मळ जमून कान बंद होणे.
  • मध्यकर्ण : सूज व पू. तात्पुरती सूज असेल, कान पुवाने भरलेला असेल तर तेवढयापुरती पूर्ण बधिरता येते. दोन तीन आठवडयांनंतर ती सुधारते. दीर्घकाळाची कानदुखी व सूज असेल तर बधिरता कमीअधिक असते.
  • मध्य कर्णाचा पडदा व हाडांची साखळी पूर्णपणे नष्ट झाली तरी कानाच्या बाजूच्या हाडांमधून (विशेषत:कानामागचे टेंगूळ) ध्वनिलहरी अंतर्कर्णातल्या ध्वनिशंखापर्यंत पोचू शकतील. या हाडांमध्ये त्यासाठी खास पोकळया असतात व ध्वनिलहरी त्यामार्फत जाऊ शकतात. पण हाडातही सूज व पू असेल तर बहिरेपणा जास्त प्रमाणात येतो, कारण ध्वनिलहरी अंतर्कर्णापर्यंत अजिबात पोचू शकत नाहीत. अशा वेळी अंतर्कर्ण शाबूत असल्याची खात्री झाल्यावर श्रवण यंत्राची जोड देता येते.
  • अंतर्कर्ण: अंतर्कर्ण व त्यातील ध्वनिशंख व मेंदूची संबंधित आठवी नस यांत दोष असेल आणि ह्या भागांचे कामकाज पूर्णपणे थंडावले असेल तर त्या बाजूने अजिबात ऐकू येणार नाही. यावर सोपा उपाय नाही.

बहिरेपणाचे आपल्या देशात सर्वात जास्त आढळणारे महत्त्वाचे कारण लांबलेली मध्यकर्णसूज हेच आहे. कान फुटल्यावर पूर्ण आणि योग्य उपचाराची व्यवस्था होणे हे महत्त्वाचे असते. हे आपणही करू शकतो.

श्रवणयंत्रे

कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो. मात्र अंतर्कर्णाचा शंख खराब झाला असेल किंवा त्याची चेता-नस किंवा मेंदूचा भाग सदोष असेल तर श्रवणयंत्रांचा उपयोग होत नाही. यासाठी पूर्ण तपासणी करूनच श्रवणयंत्रे द्यावी लागतात.

= श्रवणयंत्राचे मुख्य प्रकार =
कानामागे बसवायचे श्रवणयंत्र

याचा मुख्य भाग कानामागे असतो. स्पीकर किंवा आवाजाची नळी कानात बसवलेली असते. या दोन्ही भागाला जोडणारी एक नळी असते. काही उपप्रकारात नळीऐवजी वायर असते.

मध्यम किंवा गंभीर बधिरतेसाठी ही श्रवणयंत्रे उपयुक्त आहेत. कर्णबधिर मुलांसाठी हीच श्रवणयंत्रे वापरावी लागतात. ही यंत्रे ब-यापैकी टिकाऊ असल्यामुळे परत बदलण्याचा खर्च कमी असतो.

कानात बसवायची श्रवणयंत्रे

ही श्रवणयंत्रे कानाच्या नरसाळयातच बसवतात. म्हणूनच ही प्रत्येक कानाप्रमाणे बनवावी लागतात. या श्रवणयंत्रांमधून एक शिटीसारखा आवाज येण्याची तक्रार येते. हा या श्रवणयंत्रांचा थोडा दोष आहे. ही श्रवणयंत्रे मुख्यत: प्रौढ/तरुण व्यक्तींसाठी वापरली जातात, कारण त्यांचा आकार एकदा केला की बदलावा लागत नाही. मात्र बुचाप्रमाणे आकार असल्याने इतर आवाज ऐकू यायचे थांबतात, हा त्याचा एक दोष आहे.

कानाच्या नळीत बसवण्याची श्रवणयंत्रे

या श्रवणयंत्राचा स्पीकर किंवा आवाजाची डबी कानाच्या नळीत (जिथे मळ जमतो त्या नळीत) ठेवली जाते. एका वायरने ही बॅटरी व डबी जोडलेली असते. वायरचा आकार लहान असल्याने कान बंद होत नाही. कानात इतर आवाज जाऊ शकतो. हा याचा चांगला गुण आहे. या श्रवणयंत्राच्या आवाजाची गुणवत्ता चांगली असते. या डबीला लागणारी बॅटरी कानामागेच अडकवलेली असते. याशिवाय पूर्णपणे कानात बसवायचेही श्रवणयंत्र उपलब्ध आहे.

काही जणांचा मध्यकर्ण खूप खराब असू शकतो. अशा व्यक्तींच्या कानामागच्या हाडाचा वापर ध्वनिवहनासाठी करता येतो. हाडावर बसवायचे श्रवणयंत्र मिळते. (याला बाहा असे नाव आहे.)

टेलिफोन किंवा मोबाईल वापरता यावा म्हणून काही श्रवणयंत्रांना आता टेलिकॉईल लावली जाते.

आधुनिक श्रवणयंत्रात एकूण पर्याय खूप आहेत. डिजिटल श्रवणयंत्रांची किंमत खूप असते पण आवाजाची गुणवत्ताही चांगली असते. संगणकाच्या मदतीने यांचे टयूनिंग केले जाते. व्यक्तिगणिक बधिरतेची कंपन संख्या बदलते; त्यानुसार डिजिटल टयूनिंग करता येते हा फायदा आहे.

मात्र एकदा टयूनिंग करून चालत नाही. यासाठी परत परत तंत्रज्ञाकडे जावे लागते. श्रवणयंत्राची बॅटरी ही वारंवार बदलावी लागते. बॅटरीची शक्ती कमी झाली की आवाज कमी होतो.

इतर श्रवणयंत्रांमुळे आजूबाजूचा गोंगाट वेगळा करता येत नाही; डिजिटल श्रवणयंत्रामुळे हे शक्य आहे. पण डिजिटल श्रवणयंत्रांची किंमत काही हजारांपासून लाखापेक्षाही जास्त असू शकते.

याशिवाय आता एफ् एम् प्रकारची श्रवणयंत्रे उपलब्ध होत आहेत. ही श्रवणयंत्रे मुख्यत: कर्णबधिर मुलांच्या वर्गांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र अजूनही आपल्या देशात वापरण्यासाठी ही व्यवस्था महाग पडते. नाशिकच्या माई लेले श्रवण विकास केंद्राने यासाठी देशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.