Pregnancy Childbirth Icon बाळंतपण गर्भपात
मातामृत्यू

Delivery Hospital आपल्या देशात गरोदरपणात व बाळंतपणात खूप स्त्रिया मरण पावतात. मातामृत्यू म्हणजे गरोदरपणा, गर्भपात, बाळंतपण किंवा बाळंतपणानंतर 6 आठवडयात झालेला मृत्यू. दर हजार जिवंत जन्मांमागे भारतात सुमारे चार स्त्रिया या प्रकारे मरण पावतात. महाराष्ट्रात हे प्रमाण हजारी जन्मामागे एक मातामृत्यू आहे. श्रीलंकेत एक लाख जन्मांमागे फक्त 23 मातामृत्यू होतात तर भारतात हजारी चार. इतकी तफावत पडण्याचे कारण म्हणजे भारतात स्त्रियांची दैना तर आहेच पण आरोग्यसेवाही पुरेशा चांगल्या नाहीत. मातामृत्यूची मुख्य कारणे म्हणजे –

1. पहिली दिरंगाई – गरोदर किंवा प्रसूतीचे वेळी रुग्णालयात नेण्याबद्दल जागृती नसणे.

2. दुसरी दिरंगाई – एकदा रुग्णालयात नेण्याचे ठरवल्यावर वाहनाची सोय न मिळणे, त्यामुळे रुग्णालयात न पोचणे ही महत्त्वाची अडचण होते.

3. तिसरी दिरंगाई – रुग्णालयात पोचल्यावर उपचाराला विलंब लागणे, तयारी नसणे, रक्ताची किंवा शस्त्रक्रियेची सोय न होणे इ. कारणाने रुग्ण दगावू शकतो.

भारतातले मातामृत्यू कमी करायचे तर या तिन्ही दिरंगाई कमी कराव्या लागतात.

मातामृत्यूची वैद्यकीय कारणे

मातामृत्यूची सर्वात महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे

  • गरोदरपणात, गर्भपातात किंवा बाळंतपणात रक्तस्त्राव
  • पू व जंतूदोषामुळे शरीरात गंभीर आजार होणे.
  • अडलेले बाळंतपण
  • बाळंतरोग – झटके, अतिरक्तदाब
  • गर्भपात, दूषित गर्भपात
  • इतर कारणे – हिवताप, रक्तपांढरी, इ.
उपाययोजना
  • वर सांगितल्याप्रमाणे तीन प्रकारच्या दिरंगाई/विलंब टाळणे महत्त्वाचे आहे.
  • प्रत्येक गरोदर स्त्रीने वेळेवर तपासणी करून उपचार घेतले पाहिजे.
  • गर्भपात, बाळंतपण यासाठी रुग्णालयातच गेले पाहिजे.
  • गावातून रुग्णालयात लवकर पोचण्यासाठी रस्ता, वाहन, दूरध्वनी या सगळया सोयी पाहिजेत.
  • प्रत्येक गावात यासाठी ग्रामपंचायतीकडे आर्थिक सोय केलेली आहे.
  • जननी सुरक्षा योजनेत यासाठी प्रवास-खर्च/वाहन खर्च मिळतो.

प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी सुसज्ज सेवा असायला पाहिजेत. मात्र या बाबतीत ब-याच अडचणी आहेत. प्रशिक्षित प्रसूतीतज्ज्ञांची ब-याच ठिकाणी उणीव आहे.

हे लक्षात ठेवा
गरोदरपणातील धोके, वेळीच रुग्णालयात न्या
  • 1. रक्तस्त्राव
  • 2. सतत उलटया
  • 3. तीव्र रक्तपांढरी
  • 4. पायावर सूज (घोटयाच्या वर), तीव्र डोकेदुखी, नजर अंधुक होणे, रक्तदाब वाढणे
  • 5. लघवी कमी कमी होणे
  • 6. ओटीपोटात खूप दुखणे
  • 7. हृदयविकार, मधुमेह, इत्यादी आजार
  • 8. मूल आडवे किंवा उलटे राहणे (नवव्या महिन्यात)
  • 9. पहिलटकरीणीत मस्तकप्रवेश वेळीच न होणे
  • 10. उंची 145 सें.मी पेक्षा कमी
  • 11. उशिराची पहिलटकरीण
  • 12. मातेचे वय16 पेक्षा कमी
  • 13. आधीच्या बाळंतपणात त्रास
  • 14. चारपेक्षा अधिक बाळंतपणे
  • 15. योनिमार्गे अचानक पाणी जाणे
  • 16. खूप ताप
बाळंतपणातील धोके-वेळीच रुग्णालयात न्या
  • 1. बाळ पोटात आडवे किंवा उलटे (खाली पाय वर डोके) असणे
  • 2. जुळे असणे-पोट मोठे असणे
  • 3. पहिलटकरणीत मस्तकप्रवेश न होणे
  • 4. कळा न येणे
  • 5. पाण्याची पिशवी फुटून पाणी जाणे, पण प्रगती न होणे
  • 6. नाळ-वार-हात-चेहरा-पाय यांपैकी काही गर्भाशयाच्या तोंडाशी दिसणे
  • 7. रक्तस्त्राव
  • 8. गर्भाशयातून येणा-या पाण्याचा रंग हिरवट-काळसर असणे
  • 9. खूप वेळा कळ, पण पोटावर आडवी रेघ व प्रगती नाही
  • 10. बाळाचे हृदयाचे ठोके 120 पेक्षा कमी, किंवा 160 पेक्षा जास्त
  • 11. बेशुध्दी, झटके.
बाळंतपणानंतरचे धोके -वेळीच रुग्णालयात न्या
  • 1. अचानक जास्त रक्तस्त्राव
  • 2. वार न पडणे, उशीर लागणे
  • 3. गर्भाशय बाहेर पडणे
  • 4. मोठी जखम
  • 5. झटके व बेशुध्दी
  • 6. वेडाचा झटका
  • 7. खूप ताप
  • 8. खूप पोट दुखणे
  • 9. स्तनांमध्ये गाठ.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.