Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
डेंग्यू ताप (हाडमोडी ताप)

Enfillis Mosquitoes हा ताप एक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हा आजार इडास जातींच्या डासांमार्फत पसरतो.

डास चावल्यावर ३ ते १० दिवसांत थंडीताप, खूप अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, इ. त्रास सुरू होतो. या विषाणूंना खास औषध नाही. हा आजार साथीने येतो, त्यामुळे तो ओळखणे सोपे असते. साथीच्या सुरुवातीस मात्र थोडे रुग्ण असल्याने ओळखणे थोडे अवघड जाते.

रोगनिदान

साधारणपणे हा आजार ५ ते ७ दिवसांत आपोआप बरा होतो. पण काही जणांना रक्तस्रावाचा त्रास सुरू होतो. हिरड्या, नाक, जठर, आतडी यांतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. जठरातून रक्तस्राव झाल्यास उलटीत रक्त दिसते. आतड्यातून रक्तस्राव झाल्यास विष्ठा काळसर दिसते. त्वचेवर रक्ताचे बारीक ठिपके दिसतात. प्रत्यक्ष रक्तस्राव व्हायच्या आधी पण हा दोष ओळखता येतो.

रक्तदाब मोजण्यासाठी आवळपट्टी बांधली व १०० पर्यंत दाब निर्माण केला तर त्या हातावर असे लहान ठिपके तयार होतात, यावरून प्लेटलेट्स कमी झाल्याचे समजते. रक्तस्राव जास्त झाल्यास रक्तदाब कमी होतो आणि रुग्ण अत्यवस्थ होतो. याची लक्षणे म्हणजे घाम येणे, हातपाय गार पडणे, नाडी जलद चालणे, इ.

रक्त तपासणीत रक्त कणिकांचे प्रमाण २० हजाराच्या खाली गेल्यास रक्तस्रावाचा धोका समजावा.

उपचार

नुसता डेंग्यू ताप असल्यास पॅमालच्या गोळया देऊन भागते. डेंगू रक्तस्राव असेल तर मात्र रुग्णालयात दाखल करून विशेष उपचार करावे लागतात.

प्रतिबंध

हा ताप डासांमार्फत पसरत असल्याने याच्या साथी वेगाने पसरू शकतात. रक्तस्रावाचा त्रास सहसा पंधरा वर्षाखालील मुलामुलींना होतो. इतरांनाही हा धोका थोडाफार असतोच. या साथीत अनेक मृत्यू झालेले आहेत. यासाठी अद्याप लस नाही.

प्रतिबंधक उपाययोजना म्हणून खालील सूचना आहेत.

 • साथीच्या काळात रुग्णांना मच्छरदाणीत आणि वेगळे ठेवणे.
 • मच्छरदाणी वापरून डासांचे चावे टाळणे.
 • डासरोधक मलम/ धूर यांचा वापर करून डासांना लांब ठेवणे.
 • इडस डास हे जास्त करून शहरी वस्त्यांत आढळतात. या डासांवर पांढरे पट्टे असल्यामुळे ओळखायला सोपे जाते. डबे, मडकी, चाकांचे टायर्स, रिकाम्या नारळाच्या कवटया, इत्यादींमध्ये साचलेल्या पाण्यात इडस डास लवकर फैलावतात. यातले पाणी दर आठवडयाला काढून त्यांचा तळ ब्रशने घासावा लागतो तरच चिकटलेली अंडी निघतात. साथीच्या काळात अशा पाण्याच्या जागा निचरा करून डासांची उत्पत्ती टाळणे हा महत्त्वाचा भाग आहे.
 • साथीच्या काळात झोपताना हातपाय झाकतील असे कपडे वापरावे. यासाठी पँट व लांब बाह्यांचा शर्ट वापरावा.
कीटकनाशकांचा धोका आणि पर्यायी उपाय

औषध फवारणीबद्दल काही धोके लक्षात घेणे आवश्यक आहे.

औषध प्रतिकार

पहिली गोष्ट म्हणजे हळूहळू काही वर्षांनी त्या प्रदेशातले डास त्या त्या औषधांना दाद देईनासे होतात. हा अनुभव पिकांवरच्या किडींबाबतही येतो. हे कसे होते हे पाहणे आवश्यक आहे. अमर्याद संख्या असलेल्या कीटकांमध्ये काही प्रमाणात रंगसूत्रे, गुणसूत्रे, इत्यादींमध्ये सूक्ष्म बदल होत राहतो. उदा. ज्वारी-बाजरीच्या शेतातही एखादे रोप वेगळे दिसून येते. निसर्गात हा बदल सूक्ष्म प्रमाणात सतत होत असतो. अमर्याद जननक्षमता व संख्या असलेल्या डासांमुळे असे बदल होण्याची शक्यता संख्याशास्त्रीय कारणांमुळे वाढते. कारण जेवढे जीव जास्त तेवढी बदलांची शक्यता जास्त. अशा परिस्थितीत एखादा कीटक विशिष्ट औषधाला दाद न देणारा असणे स्वाभाविक असते. हेच विशिष्ट औषध सतत फवारत गेल्यानंतर या एखाद्या काटक डासाची प्रजा सोडता बाकी सर्व डास मरतील. हळूहळू सर्वच प्रजा त्या काटक गुणधर्माची बनेल. औषध फवारणीचा परिणाम होत नसल्याने त्यांचीच संख्या वाढत राहील. या पध्दतीने सर्व कीटक परिस्थितीशी जुळवून घेतात. वर्ष दोन वर्षाचा कठीण काळ सोडता सदैव त्यांची संख्या कायम ठेवतात.

 • शेतीसाठी आणि डासांसाठी रासायनिक औषधांचा होणारा वापर हा घातक ठरणार अशी चिन्हे आहेत. डीडीटी हे निसर्गात अजिबात नष्ट न होणारे द्रव्य आहे. आजपर्यंत पृथ्वीवर वापरलेले डीडीटी जसेच्या तसे आणि तेवढेच शिल्लक आहे. आता शेतीतल्या पिकांत, मातीत, पाण्यांत, सर्व प्राण्यांमध्ये डीडीटी चा अंश सापडतो. नवजात अर्भकाच्या शरीरातही त्याचा अंश आढळतो म्हणूनच रासायनिक औषधांच्या वापराबाबत योग्य दूरदृष्टी राहणे आवश्यक आहे.
 • कीटकांची संख्या एकूण पर्यावरणावर अवलंबून असते. विशिष्ट प्रदेशात, विशिष्ट काळात (मानवाचा हस्तक्षेप सोडला तर) वनस्पतिजीवनाचा व प्राणी जीवनाचा संबंध दीर्घकाल संतुलित असतो. उदा. एखादे जंगल असेल तर त्यात निरनिराळया झाडांचे परस्परप्रमाण, एकूण संख्या, ही बदललीच तर अगदी हळूहळू बदलते. जंगलात पुरेशा संख्येने हरिणांसारखे प्राणी असतील तरच मांसभक्षक प्राणी जगू शकतील. भात शेतीत किडींचे प्रमाण बेडकांमुळे मर्यादित राहते. पण या संतुलित निसर्गात मानवी हस्तक्षेपाने नव्या समस्या निर्माण होतात.
 • रेल्वे व रस्ते यामुळे जागोजाग साचणारे पाणी, पाण्याचा वाढलेला व अयोग्य पध्दतीने वापर, साचलेल्या पाण्याचे पृष्ठभाग, इत्यादींमुळे डासांना आदर्श परिस्थिती तयार होते. डासांचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करून उपाय केले पाहिजेत. सिंचनाच्या नव्या पध्दती वापरणे (उदा. ठिबक सिंचन), जलाशयात डासांच्या अळया खाऊन जगणारे गुप्पी मासे सोडणे, इत्यादी उपाय चांगले वाटतात.
 • भातशेती हे डासांचे वस्तीस्थान होऊन जाते. यासाठी दर सात दिवसांनी त्यातले पाणी वाहून जाऊ देण्याचा प्रयोग काही विभागात झाला आहे. यामुळे डासांची अंडी-अळया वाहून जातात. हा उपाय पाण्याच्या एकूण उपलब्धतेवर अवलंबून आहे.
चिकनगुण्या तापाची कारणे आणि साथ

mosquito चिकनगुण्याचा मूळ आफ्रिकन शब्दार्थ म्हणजे ‘वाकडेपणा – बाक’. या तापाने माणूस जागोजागी वाकतो म्हणून हे नाव. आपण याला मराठीत वाकडया ताप म्हणू शकतो.

हा ताप एका विषाणू प्रकारामुळे होतो. हा विषाणू पट्टेरी पायाच्या ईडासांमुळे पसरतो. आजारी माणसाच्या रक्तात हे विषाणू असतात. ईडास हे रक्त शोषतात व ईडासांच्या शरीरात हे विषाणू टिकून राहतात. दुस-या माणसाला हा ईडास चावला की 2-12 दिवसात हा आजार उमटतो. पण ईडास चावल्यानंतर सगळयांनाच हा आजार होईल असे नाही. हा आजार दुस-या कोणत्याही मार्गाने पसरत नाही.

याच ईडासामुळे डेंगू तापही पसरतो. दोन्ही तापाच्या साथी येतात. मात्र डेंगू घातक ठरु शकतो तसा चिकनगुण्या घातक नाही. पण चिकनगुण्याने खूप त्रास होतो.

लक्षणे व त्रास

या तापाची सुरुवात अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी या लक्षणांनी होते. खूप थकवा येतो. मरगळ येते. मळमळ, उलटी, अंगावर पुरळ ही पण लक्षणे दिसतात. सांधे दुखतात किंवा सुजतात पण. यामुळे बरेच लोक आधाराला काठी घेतात. ही सांधेदुखी ताप गेल्यावर पण अनेक आठवडे टिकू शकते. डेंगूमध्ये अशी टिकाऊ सांधेदुखी नसते. हा दोन्हीमधला फरक आहे. चिकनगुण्यात डेंगूप्रमाणे रक्तस्राव, मेंदूज्वर, किंवा मृत्यू होत नाहीत हे विशेष. या तापाने जन्मभर त्याविरुध्द प्रतिकारशक्ती मिळते.

या तापावर लस नाही व इलाज फक्त वेदनाशामक – व तापशामक औषधांचा, डायक्लोफेनॅक, इ. औषधे उपयुक्त आहेत. आयुर्वेदात यासाठी तापावर गुळवेल सत्व, योगराज गुग्गुळ (सांधेदुखी) ही उपयुक्त औषधे आहेत. लक्षणे असेपर्यंत उपचार घ्यावेत.

ईडास व त्याचे नियंत्रण

हा ईडास (डासाची मादी चावते) मानवी वस्तीजवळ आढळतो. भांडी, टायर, टब, फुलदाण्या, कुंडया, पिपे, बादल्या, कूलर, इ. ठिकाणी पाणी साठून राहिले की हे ईडास वाढतात. (अंडी घालतात) डासांचे पाय पट्टेरी असतात. त्यामुळे ईडास पटकन ओळखू येतात. ह्या ईडासांचा उपद्रव कमी करणे हा एकमेव प्रतिबंधक उपाय आहे. यादृष्टीने खालील काळजी घ्यावी.

 • दर आठवडयात एकदा डासांची पाण्याची ठिकाणे रिकामी करावीत व त्यांचा तळ ब्रशने घासावा.
 • पाणी ठेवणे गरजेचे असल्यास ते कापडातून गाळून घ्यावे. त्यानंतर कापड उन्हात वाळवावे म्हणजे अंडी मरतील.
 • पाण्यात गप्पी, गंबूसिया मासे सोडावेत. ते डासांच्या अळयांना खातात.
 • नेहमी मच्छरदाणीत झोपावे. मच्छरदाणी कीटकनाशकयुक्त असेल तर आणखी चांगले. (केओथ्रिनमध्ये बुडवून वाळवलेली) म्हणून याला K मच्छरदाणी म्हणू या.
 • अंगाला मच्छररोधक मलम लावावे. निलगिरी तेलाने डास दूर राहतात.
 • रुग्णांनी इतरांना लागण होऊ नये म्हणून मच्छदाणीत झोपावे. सर्वांनी डासरोधक मलम लावावे.
राष्ट्रीय डेंग्यू नियंत्रण योजना

भारतात डेंग्यू हे नाव नवीन वाटत असले तरी काही भागांमध्ये हा आजार पुष्कळ वर्षे टिकून आहे. 1963 साली कलकत्त्यात याची पहिली मोठी साथ निर्माण झाली. त्यानंतर अनेक वेळा देशात ठिकठिकाणी साथी येऊन गेल्या आहेत. हा आजार आकस्मिक असून वेगाने वाढतो म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते.

राष्ट्रीय डास रोग प्रतिबंधक मोहिमेत म्हणूनच या आजाराचा समावेश केला आहे. या आजाराचा प्रादुर्भाव पुढील पाच वर्षात निदान निम्म्याने कमी करावा असे आपले उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पुढीलप्रमाणे सहा घटक आहेत.

(अ) ताप सर्वेक्षण

काचपट्टीवर रक्तनमुने घेणे(हिवताप वेगळा करण्यासाठी), संशयित हिवताप उपचारासाठी क्लोरोक्वीन देणे, डेंग्यूसाठी द्रवरुप रक्ताचे नमुने घेणे, ईडस डासांचे नमुने गोळा करणे, इ. गोष्टी येतात.

(ब) पायरेथ्रम आणि यु.एल.व्ही कीटकनाशक फवारणी

यामध्ये घरे आणि परिसर यांची पायरेथ्रम औषधाने फवारणी केली जाते. फॉगिंग किंवा धुरळणी हा याचाच एक भाग आहे. धुरळणीमुळे डास तात्पुरते बेशुध्द होतात.

(क) घरगुती आणि परिसरातील ईडास जनक पाणीसाठे रिकामे करणे

डबे, टायर्स, कुलर्स, कुंडया, पाण्याची टाकी, इ. ठिकाणी साठलेले पाणी दर आठवडयाला फेकून देणे व तळ कोरडा करणे हा महत्त्वाचा उपाय आहे.

ड) डेंग्यूसाठी शीघ्रनिदान किट

डेंग्यूसंभव जिल्ह्यांमध्ये डेंग्यूचे ताबडतोब निदान करण्यासाठी किटस् उपलब्ध आहेत. यात रक्ताचा नमुना तिथल्या तिथे तपासता येतो. यामुळे नियंत्रणासाठी फार वेळ वाट पहावी लागत नाही.

इ) आरोग्यसंवाद

यामध्ये डेंग्यूआजाराचे महत्त्व, नियंत्रणाच्या पध्दती याबद्दल मुख्य संदेश असतो.

महाराष्ट्रातील डेंग्यूचा प्रादुर्भाव

brain-model महाराष्ट्रात 2001 पासून डेंग्यू तापाचे लहान मोठे उद्रेक झालेले आहेत. 2001 मध्ये 23 उद्रेक झाले, त्यातून जवळजवळ 3000 व्यक्तींना लागण झाली आणि 5 जण मृत्यू पावले. यातील सुमारे 25% रक्तनमुने डेंग्यू निषाणयुक्त आढळले. यानंतर हळूहळू दरवर्षी ही परिस्थिती वाढत जाऊन 2005 साली 267 उद्रेक, 21000 लागण, 56 मृत्यू अशी परिस्थिती होती. त्यानंतर हळूहळू लागण कमी होत चालली आहे. डेंग्यू नियंत्रण योजनेतून केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळालेले दिसते. तरीही या साथींच्या आजाराबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमात सर्व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
 • ताप आणि डेंग्यू ताप लागणीबद्दल स्वत:हून आरोग्यकेंद्रांना माहिती देणे.
 • डास नियंत्रक फवारणी, धुरळणी आणि मच्छरदाण्यांचा वापर
 • दर आठवडयास घरगुती आणि परिसरातील कृत्रिम पाणीसाठे उपसून साफ करणे आणि त्यांचे तळ कोरडे करणे.
जपानी मेंदूज्वर

japanese brain fever
महाराष्ट्रात 2001 पर्यंत हा आजार आढळत नव्हता. त्यानंतर हळूहळू पूर्व महाराष्ट्रात याची लागण सुरु झाली. 2003 साली यामुळे एकूण 115 मृत्यू झालेले आहेत. त्यानंतर या भागात लागण झाली पण सुदैवाने मृत्यू झालेले नाहीत. याचबरोबर 2003 मध्ये चंडीपुरा विषाणूंच्या जातीमुळे मेंदूज्वराची लागण महाराष्ट्रात झाली. हे दोन्हीही मेंदूज्वर घातक आहेत. हा आजार मुख्यत: प्राणीजन्य असून डासांमार्फत पसरतो. ग्रामीण भागात गोठयातील जनावरांत आणि डुकरांवर हे डास आढळतात. याची जास्त लागण पावसाळयात आढळते. यामुळे विशेष करून डुकरांचे नियंत्रण हा या आजाराच्या नियंत्रणात महत्त्वाचा भाग आहे. खरे म्हणजे कुठल्या देशामध्ये पाळीव डुकरे बंदिस्त गोठयातच असतात. आपल्या गावांमध्ये मात्र डुकरे मोकाट फिरतात. ज्यांच्या मालकीची असतात अशी कुंटुंबे गरीब आणि निरक्षर असतात त्यांचा उदर्निर्वाह मुख्यत: मोकाट डुकरे विकूनच होत असतो. अशा लोकांचे पुनर्वसन आणि त्यांना मदत केल्याशिवाय मोकाट डुकरांचा प्रश्न सुटणार नाही. ब-याच गावांमध्ये उघडयावर संडास करण्याची पध्दत असल्याने मोकाट डुकरे वाढत राहतात. म्हणूनच हा प्रश्न सार्वजनिक स्वच्छतेशी निगडित आहे.

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण योजना

elephantiasis
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण योजना जवळ जवळ 50 वर्ष जुनी आहे. तरीही अद्यापपर्यंत या योजनेला भक्कम यश मिळालेले नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर, भंडारा, इ. पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये हा आजार जास्त करून आढळतो. याचे कारण म्हणजे हा आजार एकूणच आपल्या देशाच्या पूर्व भागात जास्त आढळतो. दक्षिण भागात मात्र केरळमध्येही याचे पुष्कळ प्रमाण आहे. ही योजना मुख्यत: हत्तीरोग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. सध्या या योजनेतून मुख्यत: चार सेवा दिल्या जातात. यात डासांच्या अळयांविरुध्द मोहीम, जंतवाहक व्यक्तींना उपचार, हत्तीरोगग्रस्त भागात सर्वांना डाकाझिनचा (डी.ई.सी) उपचार आणि अंडकोष सूज असल्यास शस्त्रक्रिया आणि नसबंदी.

हत्तीरोग सर्वेक्षण

जागोजागी स्वैल नमुना पध्दतीने हत्तीरोगासाठी सर्वेक्षणे केली जातात. महाराष्ट्रात ठाणे, पुणे, नागपूर, अकोला, नाशिक आणि औरंगाबाद या सहा ठिकाणी सर्वेक्षण पथके आहेत. राज्यातील मुंबई सोडून सर्व जिल्ह्यांची सर्वेक्षणे पूर्ण झालेली आहेत. अर्थातच परत परत सर्वेक्षणे करावी लागतातच.

यामध्ये खालील काही सेवाही अंतर्भूत केल्या आहेत.
 • अंडकोशासाठी शस्त्रक्रिया शिबिरे. यामुळे हत्तीरोग रुग्णांची माहिती मिळते.
 • पाणी साठयांमध्ये गप्पी मासे सोडणे. डास रोधक फवारणी करणे. (अबेट, बेटेक्स आणि एम.एल.ओ ही तीन अळीनाशके यासाठी वापरली जातात.)
 • हत्तीरोगग्रस्त रुग्णांसाठी दवाखाने चालवली जातात. यातून हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाबद्दल जास्त माहिती मिळते.
 • काही ठिकाणी डास निर्मिती कमी करण्यासाठी काही किरकोळ बांधकाम व दुरुस्ती केली जाते. (उदा. ड्रेनेज वाहून जाण्यासाठी)
 • आरोग्य शिक्षण. 2004 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात सुमारे 66000 रुग्ण सापडले. यापैकी 27000 अंडकोष सूजेचे तर सुमारे 39000 हात किंवा पाय यावर सूज येण्याचे रुग्ण होते.
हत्तीरोग नियंत्रण पथक

या पथकाची मुख्य कामगिरी म्हणजे हत्तीरोग वाहक डासांची संख्या कमी करण्यासाठी निरनिराळे उपाय योजणे. यासाठी संभाव्य पाणी साठयांवर डास अळी नाशक फवारे दर आठवडयास करणे हे प्रमुख धोरण असते. यानंतर त्याचा किती उपयोग झाला आहे याचे मोजमाप पण केले जाते. याच पथकाची दुसरी महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संभाव्य रुग्ण शोधून त्यांना उपचार करणे.

महाराष्ट्रात जून 2000 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार पुढीलप्रमाणे 14 जिल्हे हत्तीरोगग्रस्त आढळले आहेत. सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, जळगाव, नंदूरबार, ठाणे, सिंधूदुर्ग आणि नांदेड. या जिल्ह्यांमध्ये मिळून सुमारे दीड कोटी लोकांना सामूहिक उपचार करण्यात आले. याप्रमाणे 2005-06 मध्ये देखील हिवाळयात 18 जिल्ह्यांमध्ये सामूहिक उपचार करण्यात आले आहेत वरील 14 जिल्ह्यांव्यतिरिक्त यात रत्नागिरी, लातूर, उस्मानाबाद व अकोला यांचा समावेश होतो. सामूहिक उपचार आणखी 5 वर्ष चालूच राहणार आहेत.

2007-08 साली सुमारे 1 कोटी व्यक्तींची हत्तीरोगासाठी तपासणी करण्यात आली. यामध्ये 4700 रक्तनमुन्यात दोष आढळला आणि एकूण 655 नवीन रुग्ण आढळले. यावर्षी 4250 व्यक्तींच्या अंडकोश शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

हत्तीरोग नियंत्रण योजना यशस्वी होण्यासाठी लोकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. हत्तीरोगग्रस्त विभागात घरांमध्ये डासनाशक फवारणी ही अत्यावश्यक गोष्ट आहे. यासाठीच मुख्य सहकार्य लागते. तसेच या आजाराच्या लक्षणांनुसार आरोग्यकेंद्रात येऊन लवकर उपचार घेणे हेही महत्त्वाचे आहे. आरोग्य शिक्षणासाठी सुधारित उपचार पध्दतींचा प्रसार महत्त्वाचा आहे. यात हत्तीरोग झालेला पाय रोज साबण पाण्याने धुवावा. त्यामुळे घाण व जंतू निघून जातात. यासाठी दुस-या व्यक्तीची मदत लागते. यानंतर पाय कोरडया फडक्याने किंवा पंख्याच्या हवेने कोरडा करावा. पाय कोरडा झाल्यामुळे जंतूंची वाढ थांबते. जखमांची काळजी वेळच्या वेळी घेणे आवश्यक आहे. यात साबणपाण्याने स्वच्छता, जखम कोरडी करणे आणि त्यानंतर जंतूनिरोधक मलम लावावे. पायावर सूज असल्यास क्रेप बँडेज बांधून घ्यावे. म्हणजे सूज कमी होते.

पादत्राणे निवडताना आरामदायक, भरपूर हवा देणारी, घाम न आणणारी आणि इजा न करणारी, न घासणारी, पादत्राणे वापरावीत यासाठी कॅनव्हास म्हणजे कापडी पादत्राणे चांगली असतात.

पायामध्ये रक्तप्रवाह खेळता ठेवण्यासाठी पायाचा हलका व्यायाम करत राहणे आवश्यक आहे. उभे असताना देखील पाय मागेपुढे आणि वर्तुळाकार फिरवायला पाहिजे.

पायाला सूज आली असल्यास रात्री झोपताना आणि दिवसा बसताना शरीरापेक्षा पाय थोडा उंच करून ठेवणे महत्त्वाचे असते. यामुळे सूज कमी होते व नुकसान टळते.

हत्तीरोगाचा प्रसार मुख्यत: क्युलेक्स डासांमुळे होतो. हा डास साचलेल्या घाण पाण्यात म्हणजे गटारी, सेफ्टीक टँक, नाला, इ. ठिकाणी वाढतो म्हणून या सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे असते.

हत्तीरोगासाठी रात्रीचे दवाखाने

checking हत्तीरोगाचे जंत रक्तामध्ये रात्री जास्त आढळतात. म्हणूनच या आजारासाठी रात्रीचे दवाखाने आवश्यक असतात. असा प्रत्येक दवाखाना सुमारे 50000 रुग्णांना सेवा देतो. या कामासाठी एवढया लोकसंख्येस सुमारे अडीच वर्षे लागतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.