Child Health Icon मुलांचे आजार बालकुपोषण
जुलाब-अतिसार

जुलाब-हगवण-अतिसार हा मुलांचा नंबर एकचा शत्रू आहे. लहान मुलांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये जुलाब-अतिसार या आजारांचे सगळयात वर नाव येते. जुलाब-अतिसारांमुळे मृत्यू होतातच, पण वाचलेल्या मुलांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. (कुपोषण, वाढ खुंटणे, इ.)

सर्वसाधारणपणे चांगले पोषण आणि स्वच्छ पाणीपुरवठा या दोन गोष्टींमुळे समाजातले जुलाब-अतिसाराचे प्रमाण खूपच कमी होईल.

अतिसाराच्या आजारांमध्ये योग्य उपाययोजना केली तर कुपोषणासारखे परिणाम आणि मृत्यू मोठया प्रमाणावर टाळता येतील. जुलाब, अतिसार पूर्ण टाळता नाही आले तरी त्यामुळे होणारा शोष टाळता येतो हे निश्चित. कुपोषणही अटळ नाही. अतिसाराची कारणे नीट समजावून घेऊन योग्य उपाययोजना गावपातळीवरही करता येते. गेल्या काही वर्षात यामुळे या आजाराने फार मृत्यू होत नाहीत.

जुलाब व अतिसाराची कारणे

जुलाब, अतिसाराची कारणे दोन प्रकारची असतात. एक प्रकार म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे जुलाब व अतिसार. जीव-जंतुदोषांमुळे होणा-या जुलाबांमध्ये जिवाणू, विषाणू, अमीबा, जिआर्डिया हे सूक्ष्म जीव येतात. जंतांमुळे पण कधीकधी जुलाब होतात, पण जंत हे सूक्ष्मजंतू या प्रकारात येत नाहीत.

दुसरा गट म्हणजे जंतुदोषाशिवाय इतर कारणांचा गट. जंतुदोषाशिवाय इतर कारणेही असतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जुलाब म्हणजे जंतुदोष असेलच असे नाही.

जुलाबाच्या या इतर कारणांमध्ये वावडे, दात येताना होणारे जुलाब, शरीरात इतर ठिकाणी असणा-या आजारांमुळे पचनसंस्थेवर होणारे परिणाम (उदा. श्वसनसंस्थेच्या जंतुदोषामुळे होणारे जुलाब), अपचन, विषबाधा, इत्यादी येतात. मुलांच्या इतर संस्थांच्या निरनिराळया आजारांत (उदा. मलेरिया, न्यूमोनिया) कधीकधी जुलाब होतात, ही गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे. मुलांना दात येताना होणारे जुलाब नेमके कशामुळे होतात हे नीट कळलेले नाही.

सर्वसाधारणपणे ‘इतर’ कारणांमुळे होणारे जुलाब आपोआप आणि लवकर थांबतात. त्यासाठी वेगळे काही करण्याचे बहुधा कारण नसते. विषाणु-अतिसारही आपोआप थांबतो, पण यासाठी तीन ते पाच दिवस लागू शकतात.

जिवाणूंमुळे हगवण-अतिसार असेल तर जंतुविरोधी औषधे द्यावी लागतात. काही वेळा जिवाणू-हगवणही आपोआप बंद होते. ‘शिगेला’ या जिवाणूंमुळे हगवण झाल्यास रक्तही पडते. अशा वेळेस मात्र जंतुविरोधी औषध द्यावे लागते. जिवाणू हगवण आणि जंतांमुळे होणारी हगवण विशिष्ट औषधांनी एक-दोन दिवसांतच थांबते. पण म्हणून अतिसार होणा-या सरसकट सर्व मुलांना जंतुविरोधी औषधे देणे योग्य नाही. एकूण अतिसारांपैकी सुमारे पन्नास टक्के अतिसार विषाणूंमुळे होतात. विषाणूंवर कोठलेही विशिष्ट औषध चालत नाही.

रोगप्रक्रिया

अतिसार-जुलाब हे शब्द इथे एकाच अर्थाने वापरले आहेत. हगवण हा शब्दही अशाच अर्थाने वापरला जातो. या आजारांमध्ये ब-याच वेळा उलटया होतात.

या सर्व आजारांमध्ये (अ) पचनसंस्थेतले द्रवपदार्थ न शोषले जाणे आणि (ब) उलट पचनसंस्थेत स्त्राव पाझरून ते (क) तोंडावाटे (उलटी) किंवा जुलाबावाटे बाहेर पडतात.

जंतुदोषांपैकी काही जिवाणू आतडयाच्या अंतर्भागातील आवरणावर हल्ला चढवतात यामुळे आवरणाचा दाह होतो. दाहामुळे ठिकठिकाणी आवरण गळून पडते आणि रक्तस्राव होतो. यामुळेच हगवणीत रक्त दिसते. शेंब पडते ती आवरण सुजून त्यातून चिकट स्त्राव बाहेर पडल्यामुळे. अतिसारामुळे बाळाची पचनशक्ती आणि भूक कमी होते. यामुळे कुपोषणाला चालना मिळते.

शोष

हगवणीच्या रोगप्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शोष. शरीरातून जुलाब-उलटयांद्वारे पाणी बाहेर जाऊन शरीरात कोरडेपणा व शोष निर्माण होणे. असंख्य लहान मुले या कारणानेच दगावतात. शोष पडल्याने शरीरातील पेशी कोरडया पडतात. शोष पडल्याने रक्ताभिसरण मंदावते कारण रक्तातील पाणी कमी होऊन रक्ताचा पातळपणा कमी होतो. रक्तातील पाणी कमी झाल्याने शरीरातील अनेक संस्थांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. यामुळे रक्ताभिसरणसंस्थेत फिरवण्यासाठी आवश्यक असलेले रक्ताचे माप कमी पडते. आहे तेवढया रक्ताने कामकाज चालवण्यासाठी हृदय वेगाने काम करते. यामुळे नाडी वेगाने चालते. पण फार वेळ अशी स्थिती राहिल्यास प्रमाणाबाहेर शोष पडून मेंदूला रक्तपुरवठा पुरेनासा होतो. यामुळे बेशुध्दी व त्यानंतर मृत्यू येतो.

मूत्रपिंडातून मूत्र तयार होण्याचे काम मंदावते व कालांतराने बंद पडते. यामुळे मूत्रपिंडे बिघडू शकतात.

लक्षणे
 • त्वचा कोरडी शुष्क होते (त्यामुळे चिमटीतून सोडलेली त्वचेची सुरकुती-घडी बराच काळ तशीच राहते).
 • जीभ कोरडी दिसते, तहान लागते.
 • डोळे/टाळू खोल जातात.

जुलाब उलटया थांबवण्यापेक्षा हा ‘शोष’ थांबवणे महत्त्वाचे असते. यासाठी पहिल्यापासून द्रवपदार्थ पुरवणे आवश्यक असते. शरीरातल्या सर्वसाधारण द्रवपदार्थात क्षारांचे काही प्रमाण असते. हे सर्व लक्षात घेऊन आपण देऊ त्या पदार्थात क्षारांचे काही प्रमाण ठेवले पाहिजे. म्हणूनच जीवनजलामध्ये मीठ, सोडा यांचे अंश असतात. जीवनजलातील साखरेचा अंश पोषणासाठी तर उपयोगी असतोच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नुसत्या मीठ-पाण्यापेक्षा साखर-मीठ-पाणी तोंडाने दिल्यास पचनसंस्थेत द्रवपदार्थाचे चांगले शोषण होते. वेळीच शोष थांबवल्यास पुढचे अनेक दुष्परिणाम टळतात.

जुलाबांमुळे पोटातले अन्नपदार्थही वाया जातात. पचन-शोषणाची शक्ती क्षीण होते (काही काळ तरी), त्यामुळे कुपोषणाच्या दुष्टचक्राला चालना मिळू शकते.

उपचार

Domestic Diarrhea Treatment अतिसाराच्या तक्त्यात मुख्य प्रकार नमूद केले आहेत. रोगनिदान होणे फार महत्त्वाचे आहे. सरसकट काहीतरी उपचार करणे बरोबर नाही.

जुलाब आणि इंजेक्शने

इंजेक्शने ब-याच वेळा अनावश्यक व कधीकधी घातकही असतात हे लक्षात ठेवा.

रक्त पडत असल्यास आणि तोंडाने दिलेल्या औषधाने काहीही फरक न पडल्यास जंतुविरोधी इंजेक्शने द्यावी लागतात. (ती तज्ज्ञानेच द्यावीत). विषाणू-अतिसार पोलिओचा असेल आणि त्यात इंजेक्शन दिले गेले तर हात किंवा पाय लुळा पडण्याचा दाट संभव असतो. म्हणून इंजेक्शनांपासून लांब राहणे महत्त्वाचे आहे.

उपचाराची मार्गदर्शक तत्त्वे
 • योग्य रोगनिदान करा आणि आजाराप्रमाणेच उपचार करा.
 • शोष नसला तरी लगोलग जीवनजल चालू करा. आधीच फार शोष पडला असल्यास, मूल अत्यवस्थ असल्यास डॉक्टरकडे नेणे आवश्यक. कधीकधी शिरेतून सलाईन देण्याची वेळ येते.
 • हगवणीत रक्त, शेंब, कळ, घाण वास, ताप यांपैकी काहीही असल्यास सोबत जंतुविरोधी औषधे द्यावीत. हे नसल्यास फक्त जीवनजल चालू करा. (कोझाल किंवा ऍमॉक्सी ही जंतुविरोधी, तर मेझोल हे अमीबा-जिआर्डियाविरोधी औषध आहे.)
 • अपचन, वावडे, इत्यादी कारणे असल्यास पचनसंस्थेतून तो पदार्थ बाहेर जाईपर्यंत जुलाब होत राहतात. अपचनात मूल सहसा इतर अन्नपदार्थ घेत नाही.
 • पोषण चालू ठेवा : अपवाद (अपचन, वावडे) वगळता मुलांचे खाणेपिणे थांबवू नका. मूल अंगावर पीत असल्यास ते अजिबात थांबवू नका. वरचे चालू असल्यास हलके अन्न, दूध चालूच ठेवा, नाहीतर मूल कुपोषणाच्या संकटात सापडेल.
जीवनजल – जलसंजीवनी – घरगुती सलाईन

जीवनजलाचे महत्त्च समजण्याच्या पूर्वी अतिसाराच्या आजारात असंख्य मुले दगावत असत. डॉक्टर उपलब्ध असल्यास शिरेतून सलाईन (मिठाचे निर्जंतुक पाणी) द्यावे लागत असे. जीवनजलाचा वापर व्यापक प्रमाणावर व्हायला लागल्यापासून असंख्य मृत्यू टळलेले आहेत. जीवनजल म्हणजे शरीरातून बाहेर पडणा-या द्रवपदार्थाची भरपाई करण्यासाठी तोंडाने दिलेले सलाईन होय.

लोकपरंपरेनुसार शहाळयाचे पाणी, भाताची पेज, इत्यादी गोष्टी दिल्या जातात. शहाळयाचे पाणी (असेल तर), लिंबूसरबत, ताक, भाताची पेज (मीठ घातलेली), पातळ पाणीदार चहा-कॉफी ही सर्व पेये या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहेत.

जीवनजलाचा जास्त अभ्यास झाल्यानंतर त्याचे घटक व परस्परप्रमाण ठरलेले आहेत
 • एक लिटर पाणी
 • 20 ग्रॅम ग्लूकोज साखर (किंवा 40 ग्रॅम म्हणजे आठ चमचे किंवा मूठभर घरगुती साखर)
 • 3.5 ग्रॅम मीठ (पाऊण चमचा-तीन बोटांच्या चिमटीत मावेल इतके मीठ)
 • 2.5 ग्रॅम खायचा सोडा (अर्धा चमचा दोन बोटांच्या चिमटीत मावेल इतका) आणि
 • पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम (हे उपलब्ध असेल तर).

तयार मिळणा-या जीवनजल पावडरमध्ये वरील प्रमाण असते. ही पावडर एक लिटर शुध्द पाण्यात (शक्यतो उकळून थंड केलेल्या) मिसळायचे असते. जीवनजल चवीला खारटसर, सरबतासारखे लागते. घरी बनवल्यास चव घेऊन बघा. आपल्या अश्रूंपेक्षा ते जास्त खारट असू नये. चवीसाठी लिंबू पिळायला हरकत नाही.

शोष घालवण्यासाठी व टाळण्यासाठी जीवनजल हे वरदानच आहे. तोंडाने नुसते मीठ-पाणी घेतल्यास पचनसंस्थेतून ते शोषले जात नाही. पण त्याचबरोबर साखर असल्यास मीठ, पाणी, साखर एकत्र शोषले जातात आणि शरीरातील द्रवाची योग्य भरपाई होते. जीवनजल उर्फ घरगुती सलाईन देण्यामागचे हेच वैद्यकीय तत्त्व आहे.

जीवनजल देताना पुढील सूचना लक्षात ठेवा
 • उलटया होत असल्या तरी जीवनजल थोडेथोडे देत राहा, उलटी थांबवण्यासाठी जीवनजल थोडेसे उपयोगी पडते.
 • जीवनजल तयार करताना शक्यतोवर स्वच्छ-शुध्द (किंवा उकळून थंड केलेले) पाणी वापरा.
 • जीवनजल तयार करताना फक्त चार-सहा तास पुरेल इतकेच करून ठेवा. कारण त्यातल्या साखरेमुळे जंतूंची वाढ होण्याची शक्यता असते. एका वेळेस साधारणपणे अर्धा लिटर इतकेच जीवनजल तयार करून ठेवावे.
 • जीवनजल देताना चमच्या-चमच्याने थांबून-थांबून पाजत राहावे, म्हणजे दिलेले जीवनजल पचनसंस्थेत चांगले शोषले जाईल. एकदम जास्त पाजल्यास उलटी होण्याची शक्यता असते.
 • एक-दोन वर्षाच्या मुलांना 24 तासांत सुमारे एक लिटर जीवनजल पुरते. पण जुलाब होतच राहिल्यास प्रत्येक जुलाबागणिक सुमारे 100 मि.ली. जादा जीवनजल हिशेबात धरावे.
 • एक वर्षापर्यंतच्या बाळांना जीवनजलातले मीठ जरा जास्त होते. म्हणून या वयात एक तर जीवनजल निम्म्याने सौम्य करावे (दुप्पट पाणी घालावे) किंवा जीवनजल व साधे पाणी आलटून पालटून देत राहावे.
 • जीवनजल तयार करण्यासाठी तयार पाकीट (पावडर) मिळते. पण जीवनजल घरी करता येते. नुसते साखर-मीठ- पाणी चालते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जुलाब सुरू झाल्याझाल्या जीवनजल तयार करून देत राहावे.
 • शोष झालेले मूल चिडचिडे, रडके होते व शोषाच्या इतर खाणाखुणा (त्वचेवर कोरडेपणा, सुरकुती, डोळे खोल, टाळू खोल, जीभ, ओठ कोरडे, इ.) दिसतात. ही लक्षणे नाहीशी होईपर्यंत जीवनजल हळूहळू देत राहावे.
 • मूल अगदी अत्यवस्थ असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. अशा वेळी सलाईन शिरेतून देण्याची आवश्यकता असते. योग्य तंत्र शिकून आणि सरावाने कोणीही सलाईन लावू शकेल. मुलांमध्ये शीर (नीला ) सापडणे मोठया माणसांच्या मानाने अवघड असते, पण तेही हळूहळू शिकता येईल. मात्र गावात लगेच जीवनजल सुरू केल्यास सहसा सलाईनची गरज भासत नाही. सलाईन दिल्यास ते अगदी हळूहळू ( तासात 30 मि.ली. या प्रमाणात) द्यावे लागते. सलाईन जास्त दिले गेल्यास किंवा त्यातून जंतूंचा शिरकाव झाल्यास मृत्यू येण्याचा संभव असतो. म्हणून जीवनजल हाच सुरक्षित व परिणामकारक उपाय आहे हे लक्षात ठेवा.
आहार

अंगावर पिणा-या बाळांना जुलाब, उलटया होत असतानाही पाजत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रमाणांत जुलाबांना आळा बसतो कारण आईच्या दुधात विशिष्ट प्रतिकारशक्ती असते. यामुळे कुपोषण टळते; पचनसंस्थेचे नुकसान लवकर भरून येते. यामुळे शोषही काही प्रमाणात टळतो, पण स्तनपानाबरोबर आलटून पालटून जीवनजल चालूच ठेवा. वरचे दूध पिणा-या मुलांना नेहमीपेक्षा पातळ दूध (दूधपाणी समभाग) द्यावे. फार उलटया होत असल्यास तेवढा वेळ (म्हणजे काही तास) दूध वगळता येईल, पण उलटया थांबताच दूध परत चालू करावे व जीवनजलही द्यावे.

मोठया मुलांना आहार (भात, वरण, भाकरी, इ.) न देता पातळ पेजेसारखे अन्न द्यावे. पिठाची कांजीही चांगली. आहार बंद करू नये, अन्यथा मूल कुपोषणाच्या दुष्टचक्रात जाईल.

औषधे

जुलाबाबरोबर रक्त, शेंब, कळ, खूप ताप, इत्यादी लक्षणे असतील तर कोझाल, मॉक्स यापैकी जंतुविरोधी औषध द्यावे. अमीबा-जिआर्डिया विरुध्द मेझोल किंवा कुटजारिष्ट औषध द्यावे. पण नुसते पाणीदार जुलाब, उलटया असतील तर जीवनजल पुरते.

कळ थांबवण्यासाठी आधुनिक अथवा पारंपरिक औषधांचा वापर केला जातो. पण कळ थांबवणे म्हणजे आतडयांची हालचाल कमी करणे असल्यामुळे हा उपाय चुकीचा आहे. कळ थांबवल्यास जुलाब उलटया आतल्या आत राहून पोट फुगेल. पोट फुगणे घातक आहे. फारच तीव्र वेदना असेल तर डॉक्टरकडून इलाज व्हावा हे बरे.

आयुर्वेदात व बाळघुटी परंपरेत जायफळ उगाळून चाखण्याची पध्दत आहे. याने जुलाबाचे प्रमाण कमी होते.

लहान मुलांच्या उलटया

लहान मुलांच्या उलटयांची कारणे अगदी साधी ते खूप गंभीर आजारांपर्यंत असतात.

 • 3-4 महिन्यापर्यंत ढेकर न काढल्यामुळे बरीच बाळे उलटी करतात. कधीकधी होणारी पांढरी उलटी, बाळाचे वजन कमी न होणे, बाळ खेळकर व आनंदी दिसत असेल तर बहुधा ही साधी उलटी असते.
 • उलटी खूप जोरात होते. टाळू फुगते, ताप येतो – अशी उलटी बहुधा मेंदूच्या जंतूसंसर्गात होते.
 • उलटीचा रंग हिरवट होतो, पोट फुगते, संडास नीट होत नाही, व बाळ किंचाळून रडते – यात बहुधा आतडयातील आजार असतो. उदा. आतडी अडकणे, ऍपेंडिक्स सूज.
 • उलटीबरोबर ताप असेल तर आतडयातील जंतुदोष, कानदुखी, घसादुखी, लिव्हरचे आजार, कावीळ, इ. असू शकेल.
 • उलटीसोबत वजन घटणे, वाढ नीट नसणे या गोष्टी असतील तर किडनीचे आजार असू शकतात.
 • उलटीसोबत जुलाब असतील तर हा जुलाब उलटयांचा आजार असू शकतो.
 • काही औषधांमुळे उलटया होतात.
 • प्रवास (गाडी लागणे) यासारखी कारणेही लहान मुलांमध्ये असू शकतात.
  उलटीबरोबर खालील गोष्टी असतील तर गंभीर आजार असू शकेल. या बाळांना लवकर पुढील उपचारांसाठी पाठवा.

 • परतपरत उलटया
 • उलटयांसोबत ताप
 • उलटयांसोबत गुंगी येणे, दूध न मागणे
 • पोट फुगणे
 • पोटावरून आतडयांची हालचाल दिसणे
 • पोटात गाठ लागणे
 • टाळू फुगणे/झटके
प्रथमोपचार

डॉम्पेरिडोन हे औषध 0.2 मि.ग्रॅ./प्रति कि.ग्रॅ पाजावे. त्यानंतर अर्धा तास काही देऊ नये. नंतर खायला किंवा प्यायला द्यावे.

दात येण्याचा त्रास

लहान मुलांना दुधाचे पहिले दात येत असताना थोडाफार त्रास होतो. सगळयाच मुलांना हा त्रास होतो असे नाही, तसेच सर्वांनाच प्रत्येक दात येताना हा त्रास होईलच असे नाही. लहान मुलांचे दात येण्याचा क्रम व अंदाजे महिना यांचे वेळापत्रक असते. काही मुलांमध्ये दात यायला थोडा उशीर होतो. काही वेळा ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव हे याचे कारण असते.

दात येताना होणारा त्रास अपचन, उलटी, जुलाब, खूप रडणे, इत्यादी स्वरूपांचा असतो. बहुधा हा त्रास एक-दोन दिवसांपुरताच असतो. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मुलाच्या हिरडया शिवशिवल्यामुळे ते मिळेल ती वस्तू तोंडात घालते; त्यामुळे पोटात घाण जाऊन जुलाब होतात. पण काही मुलांमध्ये तोंडात घाण न जाताही जुलाब होतात असा अनुभव आहे.

आयुर्वेदाने यावर औषधोपचार सुचवले आहेत. यासाठी डिकेमाली चूर्ण (एक राळेसारखा पदार्थ) पाव चमचा मधात मिसळून हिरडयांना चोळावा व नंतर पोटात जाऊ द्यावा. यामुळे पोटदुखी, जुलाब यांपासून आराम मिळतो. एका वर्षावरील मुलांना हे चूर्ण अर्धा चमचा वापरावे. दोन वर्षावरील मुलांना पूर्ण चमचा वापरावे. याबरोबर वर्षाच्या आतल्या बाळांना बाळगुटी देत राहावी. फक्त त्यातली मुरुडशेंग थोडी जास्त उगाळावी.

उपचार

लहान मुलांच्या उलट्या (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.