Old Age Icon म्हातारपण
कुटुंबातल्या वृध्दांची काळजी

त्या त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडणीवर घरातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते. कुटुंबातले संबंध कसे आहेत यावर वृध्दांना मिळणारी वागणूकही अवलंबून असते. सर्वांना एकमेकांबद्दल पुरेसे प्रेम आणि आदर असेल तर वृध्दांची काळजी आपोआप घेतली जाते.

  • वृध्दांच्या शारीरिक-मानसिक गरजा समजावून घ्यायला पाहिजेत.
  • घरात उठाबसायला थोडी स्वतंत्र जागा (शक्य तर वेगळी खोली) असली की ब-याच गोष्टी सोप्या होतात.
  • साधा, हलका, ताजा आहार नियमितपणे मिळणे ही एक मुख्य गरज.
  • नित्य शारीरिक कर्मासाठी (लघवी, शौचास जाणे, इ.) त्यांना चांगली सुरक्षित सोय असणे आवश्यक आहे, नाही तर वृध्दांचे फार हाल होतात. ब-याच जणांना संडासला लांब किंवा अडचणीच्या ठिकाणी जावे लागत असते. यामुळे धडपडणे आणि त्यामुळे हातापायांचे हाड मोडणे या गोष्टी घडू शकतात. ब-याच वेळा या कामात वृध्दांना सोबत लागते.
  • आधाराला काठी ही चांगलीच. यामुळे धडपडणे टळू शकते.

आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीशी बरेच वृध्द कसेतरी जुळवून घेतात. पण मानसिक दृष्टया जुळणे थोडे अवघड असते. एकटेपणा हा मोठा शत्रू असतो. जोडीदार नवरा/बायको यापैकी कोणी हयात नसेल तर एकटेपणा काढणे सोपे नसते. कारण त्यांच्या पातळीवर समरस होणे हे इतरांना जमतेच असे नाही. सर्व कुटुंबाचा आणि त्या वयोगटातल्या इतर वृध्दांचा मानसिक आधारही आवश्यक असतो. इतरांचा तुसडेपणा, कठोरपणा वगैरे गोष्टी इतर वयामध्ये सहन केल्या जातात. पण वृध्दांना अशा गोष्टी जिव्हारी लागून राहतात, आणि खंत मनात घर करते.

पुरुष आणि स्त्री यांतला फरक वृध्दपणातही जाणवतो. विधुर माणसे विधवांपेक्षा जास्त दु:खी होतात कारण स्त्रिया मुलाबाळांमध्ये पहिल्यापासून असल्यामुळे त्यांना सोपे जाते. पुरुषाचे तसे नसते. कामधंद्यामुळे त्याला बाहेरच्या जगाची जास्त ओढ असते. ती म्हातारपणात पुरवली जात नाही. भारतात विधवा स्त्रीने एकटे राहणे हे परंपरेने चालत आले आहे. एकटा पुरुष हा त्यामानाने एकाकी पडतो. घरगुती कामात वेळ गेल्यास बहुतेक वृध्दांना जीवन सोपे जाते. त्यामुळे विशेषकरून पुरुषांनी अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत. काम नसले की म्हातारपण लवकर येते हे खरे आहे.

म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून

काळ थांबत नाही. पण उद्या येणारे म्हातारपण- वृध्दत्व आपण काही प्रमाणात पुढे ढकलू शकतो. यासाठी काही मानसिक आणि शारीरिक प्रयत्न हवेत; स्वत:ची योग्य काळजी घ्यायला हवी. आहारविहारात शिस्त आणि संयम पाळणे, शारीरिक श्रम, आवश्यक तेवढी झोप आणि योग्य आरोग्यविषयक काळजी या काही मूलभूत गोष्टी आहेत. मानसिक आरोग्यासाठी इतर चारचौघांशी किंवा समाजाशी योग्य ते संबंध असावे लागतात. यामुळे वृध्दावस्थेतल्या चिंता, काळज्या यांतून थोडीतरी सुटका होऊ शकते. आपल्यासारख्या दोन चार जणांचा गट असणे तर फार चांगले. पोथी वाचण्यासारख्या धार्मिक परंपरांचा खूप उपयोग होतो.

स्वत:च्या वयोगटातील दोस्तांबरोबरच वृध्दांना लहान मुलांशी रोजचा संबंध असणे हा एक आनंदाचा ठेवा असतो. नातवांनाही आजी-आजोबांचा लळा आणि प्रेम लागते. विभक्त कुटुंबांनी हा आनंदाचा ठेवा मुलांपासून आणि वृध्दांपासून हिरावून घेतला आहे.

शहरात कर्ती माणसे कामासाठी दिवसभर बाहेर पडतात. घरात आणि शेजारीही कोणी नाही अशा अवस्थेत बरेच वृध्द जगतात. खेडयांमध्ये वृध्दांना थोडातरी विरंगुळा असतो कारण अंतर कमी असल्यामुळे एकत्र जमणे सोपे पडते, तसे शहरात होत नाही. शहरांमध्ये हळूहळू वृध्दाश्रम ही गरज होत चालली आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.