Medicine Law Icon आरोग्य कायदा
न्यायवैद्यकाची प्राथमिक ओळख

Forensic Identification मारामारी, बलात्कार, आत्महत्या, खून, अपघात, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन गाडी चालवणे अशा अनेक प्रसंगी कायद्याचा आणि डॉक्टरी प्रमाणपत्राचा संबंध येतो. त्यानंतर पोलीस, कोर्ट वगैरे प्रक्रिया चालू होतात. या प्रसंगी संबंधित व्यक्ती भांबावून जाते व फसवणूक होण्याचाही संभव असतो. या संबंधी थोडी माहिती आपण घेऊ या.

दखलपात्र गंभीर घटना

या सर्व घटनांची आधी पोलीस पाटील अथवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नोंद केली जाते. पोलिसांनी नोंद घेतल्यानंतर प्रसंगाच्या गांभीर्याप्रमाणे ‘दखल’ घेतली जाते. बलात्कार, खून, आत्महत्या, विषारी पदार्थांचे सेवन, दारू पिऊन वाहन चालवणे, अनैसर्गिक लैंगिक संबंध, लग्नानंतर सात वर्षाच्या आत विवाहितेचा मृत्यू किंवा शारीरिक इजा या सर्व दखलपात्र गंभीर घटना आहेत (इंडियन पीनल कोड 304 व 174, (3), 498 (अ). पोलिसांना यासंबंधी सर्व तपासणीची जबाबदारी घ्यावी लागते. आपण फक्त पोलिसांपर्यंत ही बाब पोहोचवायची असते. असे प्रकार नुसते पोस्टकार्ड पाठवल्यानंतरदेखील न्यायसंस्थेने नोंदवल्याची उदाहरणे आहेत. खालील दुखापती ‘गंभीर’ समजल्या जातातः

  • पुरुषाच्या जननेंद्रियास पौरूष कमी होईल अशी कोठलीही इजा करणे.
  • दात पडणे, हाड मोडणे (लहान फ्रॅक्चर असले तरी); सांधे दुबळे होणे, इत्यादींना कारणीभूत होणा-या इजा.
  • डोळा किंवा कानास इजा होऊन दृष्टी किंवा श्रवणशक्ती कायमची कमी होणे.
  • ज्या जखमांमुळे प्राणास धोका पोहोचतो अशा जखमा (अंतर्गत नाजूक अवयवांना, मेंदूस मार लागणे, इ.)
  • ज्या जखमांमुळे रुग्णालयात वीसपेक्षा अधिक दिवस राहावे लागलेले आहे अशा जखमा.
  • तीक्ष्ण हत्यारांच्या जखमा.

डॉक्टरी प्रमाणपत्रानेच ही जखम ‘दखलपात्र’ आहे हे सिध्द करावे लागते. उरलेल्या किरकोळ जखमांच्या बाबतींत पोलीस फक्त सरकारी डॉक्टरला चिट्ठी (पोलीस यादी) देऊन प्रमाणपत्र द्यायला सांगतात. जखम गंभीर असल्यास पोलीस ठाणे टाळून सरळ (सरकारी) रुग्णालयात गेल्यास तिथल्या डॉक्टरवर पोलिसांना खबर देण्याची जबाबदारी असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.