/tantrika tantra icon मानसिक आरोग्य आणि आजार चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था)
मेंदूची रचना व कार्य

Brain Structure प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच. इतर प्राण्यांच्या मेंदूच्या मूलभूत घडणीखेरीज काही नवे ‘थर’ मानवी मेंदूत आहेत. मेंदूरचनेत हे ‘थर’ स्पष्टपणे दिसून येतात. मेंदूच्या रचनेत लहान मेंदू व मोठा मेंदू ही सामान्यपणे प्रचलित विभागणी आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने तीन विभाग धरलेले आहेत.

  • मूळ मेंदू – सर्वात खालचा, चेतारज्जूशी जोडलेला ‘देठाचा’ भाग (ब्रेनस्टेम)
  • मध्यमेंदू – मधला थर (मिडब्रेन)
  • मुख्यमेंदू – वरचा थर (सेरेब्रम)

मूळ मेंदू अगदी मूलभूत शारीरिक कामांचे नियंत्रण करतो – यात श्वसन, रक्ताभिसरण, शुध्दी किंवा जाणीव, इत्यादी प्राणिजीवनाला लागणारी प्राथमिक कामे येतात. मूळ मेंदूला इजा झाल्यास बेशुध्दी, श्वसन व हृदयक्रिया थांबणे आणि मृत्यू येणे संभवते.

मध्यमेंदू हा भावना, वासना, लैंगिक इच्छा, इत्यादी नियंत्रित करतो. प्रजननासाठी लैंगिक इच्छा, स्वसंरक्षण व आक्रमण या प्राणिजीवनासाठी आवश्यक पण उत्क्रांतीतल्या नंतरच्या प्रवृत्ती आहेत. या सर्व मध्यमेंदूतून नियंत्रित होतात. हिंसा आणि लैंगिक वासना या काही ‘पाशवी’ वाटणा-या गोष्टी मध्यमेंदूत आहेत, त्यांचा वारसा प्राचीन आहे. झोपेचे केंद्रही यातच आहे.

मुख्यमेंदू हा मध्यमेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा-उजवा असे दोन स्पष्ट भाग असतात. या दोन्ही भागांचे काम जरा वेगळे असते. डावा भाग विचारशक्ती, बोलणे, भाषा, तंत्रज्ञान, इत्यादी प्रगत कामे पार पडतो. उजवा भाग संगीत, नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान (म्हणजे आपल्या आजूबाजूला कोठली वस्तू कोठे कशी आहे याचे ज्ञान), इत्यादी जबाबदा-या सांभाळतो. यातही मोठया मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो. या भागाला इजा झाली तर विचारशक्ती दुबळी होईल आणि सामाजिकदृष्टया अयोग्य गोष्टी त्या व्यक्तीकडून होतील (उदा. चारचौघांत लघवी करणे, नागवे होणे, इ.). मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टीज्ञानाशी संबंधित आहे. कानाकडचा भाग ध्वनिज्ञान आणि वासाचे ज्ञान सांभाळतो. वरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना ज्ञान सांभाळतो.

मेंदूचे काम कोटयवधी मेंदूपेशींमार्फत (चेतापेशी) चालते. या मेंदूपेशींना असंख्य टोके असतात. ही टोके आजूबाजूच्या पेशींच्या टोकांना जोडलेली असतात. या जोडणीचे स्वरूप ‘रासायनिक + विद्युत’ असे असते. एका पेशीतून निर्माण झालेला संदेश दुस-या पेशीपर्यंत असा पोहोचतो यात टोकांमध्ये असलेले ‘रासायनिक ‘ माध्यम आणि त्यातून जाणारा ‘विद्युत’ संदेश यांचा मुख्य वाटा असतो. या रासायनिक पदार्थाचे प्रमाण वाढले किंवा कमी झाले किंवा विद्युतसंदेशांमध्ये बिघाड झाला तर मेंदूचे कामकाज बिघडते. अल्झायमरच्या आजारात असाच बिघाड होतो.

एवढे आता माहीत असले तरी मन व मानसिक आजार यांबद्दल शास्त्राला अजूनही पुष्कळ कळायचे शिल्लक आहे.

गंभीर मानसिक आजार
भ्रमिष्टावस्था, दुभंग व्यक्ती

Defective Person सर्वसाधारणपणे ज्याला ‘वेड’ म्हणता येईल असा हा आजार. यांत मनोरुग्णाला स्वतःला व इतरांना पुष्कळ त्रास होतो. उपचार न केल्यास वर्षानुवर्षे हा आजार चालूच राहतो. याची सुरुवात 15-25 वयोगटात होते आणि कधीकधी एखाद्या घटनेतून अचानक सुरुवात होते. हा आजार आनुवंशिक असू शकतो.

यात मुख्य म्हणजे विचारशक्ती, जाणीव व भावना यात गोंधळ होतो. त्यामुळे वागणे, बोलणे, कृती हे सर्व बिघडते. अशा व्यक्तींच्या मनात अयोग्य कल्पना व विचार घर करून बसतात (ग्रह), नसलेल्या गोष्टी जाणवतात (भ्रम), आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा संबंध तुटतो आणि नेहमीच्या घटनांबद्दल वेगळा (चुकीचा) अर्थ लावला जातो. उगीचच खूप आनंद किंवा दुःख किंवा पूर्ण अलिप्तता, इतरांना न समजणारे बोलणे-वागणे, अतिशय बडबड किंवा कमी बोलणे, मौन, स्वतःशीच हसणे-बोलणे, अस्वस्थ किंवा अगदी स्वस्थ, कधी एकदम आक्रमक, शिवीगाळ करणे, विचित्र स्थितीत बराच वेळ राहणे, (उदा. गुढघ्यात मान घालून तासनतास बसून राहणे.), इत्यादी विविध पैलू दिसून येतात.

अशा व्यक्तींनी आत्महत्या करणे, इतरांना इजा करणे हे शक्य आहे, पण असे होईलच असे नाही. अशा व्यक्तींना ब-याच वेळा इतर लोक बांधतात, कोंडतात किंवा हाकलून देतात. पण अशा रुग्णांनाही औषधोपचारांनी खूप उपयोग होतो. मात्र नातेवाईकांनी चिकाटी, संयम, सहनशक्ती दाखवून उपचार चालू ठेवणे आवश्यक असते.

उदाहरणे
  • सायबू हा गेली दोन-तीन वर्षे आमच्या गावात आलेला 16-17 वर्षाचा मुलगा आहे. कोठून आला माहीत नाही पण तो कधीच कपडे घालत नाही, कोणी घातले तर काढून टाकतो. बाजारात दुकांनामधून किंवा हॉटेलमधून अन्नपदार्थ पळवणे व खाणे एवढेच त्याचे दिवसभराचे काम. लघवी, संडास, इत्यादींबद्दल त्याला कसलाही नियम नाही. यासाठी तो ब-याच वेळा लोकांकडून मार खातो व रडतो. कधी तो दिवसभर पारावर गप्प बसून राहील नाहीतर हसतच सुटेल. त्याचे बोलणे कोणालाही समजत नाही. त्याला आतापर्यंत कोणीही घ्यायला आला नाही . ‘ठार वेडा’ म्हणून घरच्यांनी त्याला सोडून दिलेला दिसतो.
  • पार्वती गेली 20-25 वर्षे या गावात दिसते. खूप बडबड, लोकांच्या अंगावर धावून जाणे, हसत सुटणे, कपडयांची शुध्द नसणे, काहीतरी हातवारे करणे, कोठेही झोपणे वगैरे गोष्टींमुळे ती ‘वेडी पार्वती’ म्हणून ओळखली जाते. खूप त्रास द्यायला लागली तर आजूबाजूचे लोक तिला बांधून घालतात, शांत झाली, की सोडून देतात.
  • शंकर हा दिवसभर फक्त ‘माझी जमीन घेतली ती परत द्या’, असे ओरडत फिरतो. गेली चार-पाच वर्षे तो एवढेच करतो. ब-याच वेळा जमिनीवर डोके आपटून घेतो. रात्री दोन-तीन मैलांवरच्या त्याच्या गावी जाऊन झोपतो. सकाळी परत कचेरीसमोर ओरडायला सुरुवात करतो.
इतर मानसिक आजार
तणावग्रस्त मानसिकता

या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणाव, अधिरेपणा, कारण नसता कशाची तरी भीती वाटत राहणे ही याची प्रमुख वैशिष्टये आहेत. या मानसिक स्थितीबरोबरच इतर शारीरिक लक्षणे (पोटात गोळा उठणे, छातीत धडधड, छाती भरून येणे, श्वास वेगाने चालणे) असतात. विसरभोळेपणा, निद्रानाश, द्विधा मन असणे, वाईट स्वप्ने, कमी भूक, दुबळेपणा, चक्कर येणे, घाम येत राहणे, इत्यादी लक्षणे आढळतात.

याचाच आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या गोष्टींबद्दल अवास्तव नावड किंवा भीती (फोबिया) असणे. ती गोष्ट पुढे आली, की त्या व्यक्तीचा स्वतःवर ताबा राहत नाही आणि अवास्तव मोठी प्रतिक्रिया उमटते. उदा. काही व्यक्तींना कीटकांबद्दल नावड असते. एखादा कीटक अंगावर पडल्याबरोबर अशी व्यक्ती ओरडत सुटते. गर्दी, एकटेपण, साप, रात्र, भाषणाचा प्रसंग अशा कशाबद्दलही भीती असू शकते.

नैराश्य

अतिनैराश्यापेक्षा हा प्रकार जरा सौम्य असतो. दुःखीपणा आणि काळजी ही याची प्रमुख लक्षणे असतात. थोडेसे निमित्त मिळाले तरी अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा ती उफाळून येतात. थकवा, अशक्तपणा, असहायता, कशातही रस नसणे, आत्मविश्वासाचा अभाव, भूक व झोप कमी, आत्महत्त्येकडे कल अशा लक्षणांपैकी काही लक्षणे असू शकतात. अशा मनोरुग्णांना मानसिक आधार, योगोपचार, औषधे, इत्यादी मार्गांनी चांगला गुण येतो.

हिस्टेरिया किंवा रोगभ्रम

Teeth Bolt हा प्रकार जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये आढळतो. याचे वैशिष्टय म्हणजे मनोरुग्ण कोठल्या तरी शारीरिक आजारासारखी लक्षणे दाखवतो. पण असा आजार आहे ही त्याची पक्की खात्री असते. रोगभ्रम हे आजाराचे ‘ढोंग’ नाही, कारण मनोरुग्ण आपल्या विकारांना शारीरिक आजारांचे रूप अजाणता देत असतो, जाणूनबुजून नाही.

याचे मूळ कारण म्हणजे काहीतरी वैफल्य, ताण, दुःख, काळजी, भीती आत पोखरत असणे. शारीरिक लक्षणांवाटे या त्रासाला वाट मिळते.

यांतली शारीरिक लक्षणे बहुधा ओळखीची असतात. उदा. वात (दातखीळ बसणे), हातपाय लुळे पडणे (वातविकार), पोटदुखी, छातीत दुखणे, मुंग्या येणे, बधिरता, झटके, अचानक दृष्टी जाणे, ऐकू न येणे, उलटी, ढेकरा, उचकी, खोकला, दम लागणे, इत्यादी लक्षणांपैकी एखादे लक्षण आढळते. मात्र प्रत्यक्ष तपासणीत संबंधित आजारांच्या खुणा दिसत नाहीत. नातेवाईकांना यामुळे काळजी, भीती वाटते व मनोरुग्णाला अप्रत्यक्षपणे यामुळे दिलासा मिळतो. ही लक्षणे बहुधा आपोआप थांबतात. मात्र कधीकधी त्यांची तीव्रता इतकी असते, की ताबडतोब रुग्णालयात न्यावे लागते.

या आजाराचे एक प्रमुख कारण कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा असह्य दबाव हे आहे. निकृष्ट जीवन जगणा-या सामाजिक स्तरात, विशेषतः स्त्रियांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. असेतरी थोडेफार लक्ष आपल्याकडे दिले जाते, अशी अप्रत्यक्ष भावना यामागे असावी.

यात शारीरिक आजार नाही असे एकदा निश्चित व्हायला पाहिजे. यानंतर घरातली किंवा शेजारची हितचिंतक मंडळीही यावर उपचार करू शकतात. यातल्या शारीरिक लक्षणांकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष देणे, सहानुभूतीने सुखदुःखाची उकल करणे, हे यातले प्रमुख तत्त्व आहे. यालाच समुपदेशन म्हणतात. मनोविकारतज्ज्ञाची मदत घेणे चांगलेच.

मानसिक आजारांचे वर्गीकरण
(अ) कारणाप्रमाणे वर्गीकरण
  • स्पष्ट शारीरिक आजारामुळे आलेले मानसिक आजार उदा. अल्झायमर, (विस्मृती विकार) सिफिलिसमुळे येणारा वेडसरपणा, मेंदूस अपघातात मार लागल्याने येणारे मानसिक आजार.
  • शारीरिक कारण न कळलेला मनोविकार वेड लागणे, भ्रमिष्टपणा, इ.
  • मादक औषधांमुळे होणारे मनोबदल दारुची नशा
(ब) शारीरिक कारण माहीत नसलेल्या मनोविकारांचे वर्गीकरण
  • गंभीर मानसिक आजार – भ्रमिष्टावस्था, उन्माद, अतिनैराश्य.
  • साधारण मानसिक आजार – अधीरपणा, नैराश्य.
  • स्वभावदोष – अतिसंशयी, एकाकी, अविचारी, आत्मकेंद्री, दुष्ट, परावलंबी, नादिष्ट, हटवादी.
  • व्यसनाधीनता
  • लैंगिक विकृती
  • लहान मुलांच्या मानसिक समस्या.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.