skin iconत्वचाविकार
ताजी जखम

कापल्यामुळे, पडल्यामुळे, कठीण पदार्थाच्या (दगड, काठी) मारामुळे निरनिराळया प्रकारच्या जखमा होतात. कातडी पूर्णपणे न फाटता केवळ खरचटणे, वळ उठणे, मुका मार लागणे असे काही असल्यास त्याला सहसा जखम म्हणत नाहीत. पण कातडी फाटून रक्त आले तर जखम झाली असे म्हणण्याची पध्दत आहे.

कोठे केवढी आणि कशी?

कातडी कोठे कोठे, किती, कशी फाटली आहे? जखम ब्लेड, चाकूने केल्यासारखी सरळ दिसते की वेडीवाकडी फाटली आहे? जखम डोक्यावर, चेह-यावर असली तर बहुधा सरळ व कापल्यासारखी दिसते. कारण इथली कातडी जाड असते. जखम हाडांवर व सांध्यावर असेल तर कधीकधी लवकर बरी होत नाही.

किती खोल?

जखम वरवर आहे की आतल्या भागाला मार बसला आहे? आतले भाग कोणते आहेत हे आपल्याला शरीरशास्रावरून कळते. बहुतेक वेळा त्वचेच्या खाली स्नायूचा थर असतो. त्यानंतर त्या त्या भागाप्रमाणे हाड असते. पोटात, छातीत, डोक्यात मार लागला असेल तर आत काय इजा होऊ शकते याची आपण कल्पना करू शकतो. पण फक्त बाहेरून तपासणी करून हे सहसा कळत नाही.

डोक्यावर किंवा पोटावर मार असेल तर प्रथमोपचारानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात पाठवणे बरे. उलटया होणे, डोळे फिरवणे, नाडी मंद किंवा जलद चालणे, शुध्द जाणे, माणसे न ओळखणे, नाकातोंडातून किंवा कानातून रक्त येणे, श्वास जोरात चालणे ही सर्व गंभीर लक्षणे आहेत.

रक्तस्राव?

त्वचेमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असते. त्यामुळे जखमेतून रक्तस्राव होतो.

 • मोठी रक्तवाहिनी किंवा शुध्द रक्तवाहिनी (रोहिणी) असेल तर रक्त लवकर थांबत नाही, ते दाबून थांबवावे. रक्ताच्या चिळकांडया उडत असतील तर रोहिणी फुटली आहे हे ओळखता येते. अशा वेळेस रक्तस्राव थांबवून रुग्णास डॉक्टरकडे न्यावे.)
 • नुसते भळभळ रक्त वाहत असेल तर नीला फाटली आहे असे समजावे.
 • जखमेत रक्त भरून येत असल्यास सूक्ष्म केशवाहिन्यांचे जाळे कापले गेले असणार.
 • डोके, चेहरा यांवरच्या जखमांतून नेहमीच रक्त जास्त जाते.
जखमेवर उपचार
wound treatment
stitch

आतल्या माराबद्दल योग्य खात्री केल्यानंतर आत मार असल्यास पुढील पाठवणी व्यवस्था करावी. जखमेचा उपचार पुढीलप्रमाणे करावा.

 • दाब देऊन रक्तस्राव थांबवा. दाबाची जागा थोडीफार बदलून रक्तस्राव बहुधा हमखास थांबवता येतो. रक्त पुसून घ्या. रक्तस्राव थांबवण्यासाठी खास रोहिणी चिमटे असतात. हे वापरायला खूप सोपे असतात. रक्तवाहिनी, त्वचा चिमटून ठेवण्याचे हे चांगले साधन आहे.
 • छोटया जखमा आकृतीत दाखवल्याप्रमाणे चिकटपट्टीनेही सांधता येतात.
 • जखम स्वच्छ पाण्याने धुऊन त्यातील माती, इतर घाण यांचा प्रत्येक कण काढणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी सिरींजची पिचकारी बरी पडते. स्वच्छ केलेली जखम शक्यतो निर्जंतुक, निदान स्वच्छ पट्टीने झाकून व कोरडी ठेवली, की ती सहसा आपोआप भरून येते. आपली प्रतिकारशक्ती याला मदत करते. औषधे केवळ पूरक असतात.
 • टाके घालणे: जखम अर्ध्या इंचापेक्षा जास्त लांब असेल तर दर इंचाला दोन – तीन याप्रमाणे टाके घ्यावेत. टाके घेणे सोपे आहे. एक खास सुई व शिलाईचा टिकाऊ दोरा यासाठी वापरतात. लिडोकेन हे औषध जखमेच्या बाजूला इंजेक्शनने टोचून ती जागा बधिर केल्यास रुग्णाला दुखत नाही. पण ते नसल्यास थांबू नये. छोटया जखमा इंजेक्शनशिवायही शिवता येतात.

यासाठी उकळून थंड केलेले पाणी, साबणाचे पाणी यांपैकी कशानेही जखम धुऊन घ्यावी. आत कचरा, माती, खडे असतील तर ते निरखून काढून टाकावेत. मग साधा दोरा (कपडे शिवायचा) व सुई स्पिरिटमध्ये 10 मिनिटे ठेवून किंवा 10 मिनिटे पाण्यात उकळून निर्जंतुक करून वापरावेत. टाके घालण्याआधी हात साबणाने अगदी स्वच्छ धुवावेत. टाके घालण्याचे तंत्र दिसायला अवघड पण शिकायला सोपे आहे. नंतर मलमपट्टी करावी. पट्टी ओली झाली नसेल तर एकदम सातव्या दिवशी टाके काढून टाकावेत. पट्टी ओली झाल्यास बदलणे आवश्यक आहे, नाही तर जंतुदोष होण्याची शक्यता असते.

आयुर्वेद व घरगुती उपाय

aloe जखमांवर अनेक घरगुती उपाय आहेत.

 • कोरफडीचा गर व साल बांधणे हा चांगला उपाय आहे. भाजलेल्या जखमांवरही त्याचा चांगला उपयोग होतो. जखमांवर, खरचटणे, इत्यादींवर तेल हळद लावणे हा घरगुती उपाय निश्चित चांगला आहे. दगडी पाला (कंबरमोडीची पाने) चुरगळून त्याचा रस जखमेवर लावल्यास किरकोळ जखमा भरून येतात. हा उपायही अनेकजणांना अनुभवाचा असतो.
 • एकदांडी, कडुनिंब आणि कोरफड -जखमांसाठी
 • सर्वसाधारणपणे स्वच्छ हळदपूड कापलेल्या जखमेवर पूर्णपणे भरली तर रक्तस्राव थांबतो. यामुळे जखम भरून कोरडी होते. हळदीमध्ये हिंग किंवा तिखट नाही याची खात्री करून घ्यावी. हळद ही जंतुनाशक आहे.
 • जुन्या भरून न आलेल्या जखमांसाठी पाणकणसांचा चुरा (तुसे) स्वच्छ कोरडया कपडयावर घेऊन त्याने जखम बांधावी. साधारणपणे पाच-सहा दिवसांत अनेक जुन्या, चिघळलेल्या जखमा कोरडया होतात.
 • व्रणरोपक तेल : कडुनिंबाच्या पानांचा रस आणि रस काढल्यावरचे चोथा/वाटण, यांचा वापर जखम कोरडी करण्यासाठी उपयोगी असतो. पानांच्या रसापासून टिकाऊ तेल करता येते. व्रणरोपक तेल तयार करण्यासाठी तर पाला सकाळीच तोडावा. सकाळी 10-11 वाजल्यानंतर पाला तोडला तर रस फारच कमी मिळतो. खोबरेल तेल एक भाग, रस चार भाग, चटणी (चोथा) एक चतुर्थांश भाग असे मिसळून मंद आंचेने शिजवावे. पाण्याचा भाग संपताच आंच बंद करावी. थंड झाल्यावर तेल गाळून चोथा दूर करावा. ही तेले वनस्पतीचे औषधी गुण टिकवतात.
 • जखम लवकर भरून येत नसल्यास कच्ची/ पक्की पपई किसून घ्यावी. त्याने पट्टी बांधली तर चांगला उपयोग होतो.
काटा मोडणे

काटा मोडणे व तो चिमटा, सुई, दुसरा काटा किंवा लाचकण, वगैरे वापरून काढणे आपल्या परिचयाचे आहे. जवळ चांगला चिमटा असेल तर हे काम सोपे होते.

काटयाबरोबर धनुर्वात येऊ शकतो, म्हणून धनुर्वाताची लस द्यावी. पण लसीचा प्रतिबंधक परिणाम एक-दोन महिन्यांनंतर होतो, लगेच नाही, हे लक्षात ठेवा. काटा निघाला नाही तर 2-3 दिवसांनी तिथे पू होतो. पुवामुळे काटा जागीच सैल होऊन निघणे सोपे होते. यासाठी रुईचा चीक काटयाच्या जागी लावण्याची पारंपरिक पध्दत आहे.

होमिओपथी निवड

एपिस, ब्रायोनिया, हेपार सल्फ, -हस टॉक्स, सिलिशिया

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.