Pregnancy Childbirth Icon बाळंतपण गर्भपात
बाळंतपण कसे होते?

घरी बाळंतपण न केलेले बरे. सुखरूप बाळंतपणासाठी दवाखान्यातच बाळंतपण करावे.

पहिला टप्पा

Childbirth गर्भाशयात एक पाण्याची पिशवी असते व त्यात बाळ असते. बाळ नाळेमार्फत गर्भाशयाला जोडलेले असते. ज्या ठिकाणी हा जोड असतो तेथे वार तयार झालेली असते.

जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा आतला दाब वाढून गर्भाशयाचे तोंड थोडेथोडे उघडत जाते. आधी पाण्याच्या पिशवीचा फुगा (पाणमूठ, पाणमोट) बाहेर डोकावतो.कळा वाढल्यावर हा पाण्याच्या पिशवीचा फुगा फुटतो व मग डोक्याचा प्रत्यक्ष दाब गर्भाशयाच्या तोंडावर येतो. गर्भाशयाचे तोंड संपूर्ण उघडायला दोन तासांपासून ते 24 तासापर्यंत कितीही वेळ लागू शकतो. कळा तीव्र असतील तर काही वेळात गर्भाशयाचे तोंड उघडते. बारीक कळा असतील तर जास्त वेळ लागतो. सर्वसाधारणपणे पहिलटकरणीत याला 16 ते 24 तास लागतात. पहिलटकरीण सोडून इतर मातांमध्ये सहा ते दहा तास लागतात.

गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण होतो.

दुसरा टप्पा

Childbirth गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडून बाळ बाहेर पडेपर्यंत दुसरा टप्पा असतो. दुस-या पायरीत डोके (किंवा जो भाग पुढे असेल तो) गर्भाशयाच्या बाहेर पडते व ते योनिद्वारावर दिसू लागते. यानंतर कळा येण्याप्रमाणे ते मागेपुढे होत नाही. याला ‘मस्तकदर्शन’ म्हणता येईल. त्यानंतर डोके बाहेर पडते व पाठोपाठ हात, छाती, पाय बाहेर पडतात. पहिलटकरणीत (पहिल्या खेपेत) या अवस्थेला सुमारे एक-दोन तास लागतात, पण इतर खेपांत खूप कमी वेळ लागतो. या पाठोपाठ पाण्याची पिशवी रिकामी होते. जन्मल्यावर मूल ताबडतोब रडते. या रडण्याचा अर्थ श्वासोच्छ्वास ठीक आहे असा असतो.

तिसरा टप्पा

Childbirth बाळ बाहेर आल्यापासून वार पडेपर्यंत तिसरा टप्पा धरला जातो. बाळ बाहेर पडल्यानंतर ५ते२० मिनिटांत वार पडणे आवश्यक असते. एवढ्या वेळात (आवश्यक तर नाळेवर थोडाङ्गार ताण देऊन) वार बाहेर पडली नाही तर जादा रक्तस्त्रावाचा धोका असतो. अशा वेळी भूल देऊन हाताने वार गर्भाशयापासून वेगळी करून काढावी लागते. अनुभवी हात असेल तर भूल न देताही वार हाताने वेगळी काढता येते. पण अनुभव नसेल तर रुग्णालयात नेणे आवश्यक असते. वारेवर जास्त जोर लावू नये नाहीतर नाळ तुटण्याची किंवा गर्भाशय उलटे बाहेर येण्याची शक्यता असते. रक्तस्त्रावाचा व जंतुदोषाचा धोकाही असतो. म्हणून वार पडत नसल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवावे. वार पूर्ण निघाली नाही तर रक्तस्त्रावाचा व जंतुदोषाचा धोका असतो.

चौथा टप्पा

Childbirth बाळंतपणाची ‘चौथी’ पायरी म्हणजे बाळंतपणानंतरचा एक तास.या एका तासात बाळ बाळंतिणीला त्रास किंवा धोका होऊ शकतो. म्हणून लक्ष ठेवावे लागते. बाळाचे सर्व सुरळीत होणे या एका महत्त्वाच्या तासावर अवलंबून असते. या काळात श्वसन, ऊब, स्तनपान, जन्मजात दोषांची तपासणी इ. सर्व बाबी पार पाडता येतात. बाळंतीणीची तब्बेत स्थिर होते. रक्तदाब, नाडी स्थिरावतात.रक्तस्रावअसला तर थांबवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. गर्भाशय आकुंचन पावते. जखमांची देखभाल होते.

या अनेक घटना बाळ बाळंतिणीसाठी फार महत्त्वाच्या असतात. या तासाभरात बाळ बाळंतीण बाळंतपणाच्या खोलीतच ठेवावेत. या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी एक दाई किंवा नर्सताई त्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे काळजी घेतल्यानंतर बाळंतपण करणे निर्धोक असते.

बाळंतपणाची सुरुवात

बाळंतपण ही नैसर्गिक क्रिया असली तरी काही बाळंतपणांत आई व जन्मणारे मूल यांना त्रास होऊ शकतो व दर हजार प्रसूतीमागे 3-4 माता मृत्युमुखी पडतात व अनेक आजारी होतात. अवघड बाळंतपणात बाळालाही इजा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आई व बाळासाठी बाळंतपण निर्धोक करणे हे महत्त्वाचे आहे. बाळंतपण व्यवस्थित पार पडेल याची काळजी गरोदरपणापासूनच घ्यावी लागते. गरोदरपणात काय तपासणी करतात, कोठले धोके असतात हे आपण पाहिले. तसेच बाळंतपण अवघड जाईल याची सूचना देणा-या अनेक अडचणींची आपण माहिती घेतली. आता बाळंतपण कसे होते हे पाहू या.

साधारणपणे दिवस पूर्ण भरले की बाळंतपण होते. बाळंतपण सुरु झाल्याचे खालील चिन्हांवरून ओळखता येते.

पोटात नियमित कळा येणे

या कळा बरगडयांच्या खाली पाठीकडून चालू होतात व ओटीपोटाकडे येतात. ठरावीक वेळाने त्या येतात व ओटीपोटात संपतात. पोटातल्या इतर दुखण्यांपासून त्या वेगळया आहेत हे कळते. शंका असेल तर एनिमा देऊन पहा. बाळंतपणाच्या ख-या कळा एनिमानंतरही चालूच राहतात.

अंगावरून पांढरा द्राव (चिकटा) जाणे

बाळंतपणाच्या सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडावरचा चिकट पांढरा भाग (चिकटा) सुटून बाहेर येतो आणि कधीकधी त्यात किंचित रक्ताचा अंश असतो. ही बाळंतपण सुरू झाल्याची महत्त्वाची खूण आहे.

गर्भाशयाचे तोंड उघडणे

आतून तपासणी केली असता गर्भाशयाचे तोंड उघडले आहे किंवा बंद आहे हे कळते. पहिलटकरणीत हे तोंड फक्त बाळंतपणाच्या वेळी उघडते. मात्र पुढच्या खेपेच्या मातांच्या बाबतीत हाताचे एक बोट जाईल इतका सैलपणा नेहमीच असतो. बाळंतपण चालू झाले असेल तर गर्भपिशवीचे तोंड उघडायला लागते

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.