urine system icon मूत्रसंस्थेचे आजार
लेप्टोस्पायरॉसिस (लेप्टो)

हा एक तापाचा आजार आहे. उंदीर, डुक्कर व कुत्रा या प्राण्यात हा आजार नेहमी आढळतो. आजार झालेल्या प्राण्यांच्या लघवीत यांचे जंतू असतात. सांडपाण्यात हे जंतू बरेच दिवस तग धरू शकतात.

या संसर्गबाधित प्राण्यांच्या लघवीचा किंवा दूषित सांडपाण्याचा त्वचेशी किंवा तोंडावाटे संबंध आला तर माणसालाही हा संसर्ग होऊ शकतो. मात्र त्वचेतून प्रवेश करण्यासाठी त्यावर जखम किंवा ओरखडे असले तरच संसर्ग होऊ शकतो.

साहजिकच कुत्रा, उंदीर, डुकरे यांच्याशी संबंध येणाऱ्या लोकांशी हा आजार होतो. खेडयांमध्ये म्हणूनच याचा प्रादुर्भाव जास्त असतो. शहरी भागात, जिथे स्वच्छता कमी आहे अशा झोपडपट्टयात रुग्ण आढळू शकतात. सांडपाण्यात काम करणाऱ्या कामगारांनाही हा आजार होऊ शकतो. पावसाळयात डबक्यांमुळे आजार होऊ शकतो. पावसाळयात गटारीचे पाणी इतर पाण्यात मिसळले तर संसर्ग होऊ शकतो.

संसर्ग झाल्यापासून एक-दोन आठवडयात रक्तामध्ये हे जंतू पसरतात. यानंतर ते यकृत, मूत्रपिंडे, डोळा, इ.अवयवांत आश्रय घेतात. त्यामुळे लक्षणे बहुधा या अवयवांशी संबंधित असतात.

रोगनिदान – लक्षणे व चिन्हे

पहिली पायरी – सौम्य आजार असल्यास ताप, डोळे लाल होणे, डोकेदुखी, अंगदुखी, घसासूज, खोकला, इत्यादी त्रास होतो.

तीव्र आजार झाल्यास यकृतसूज, कावीळ, उलटया, त्वचेवर पुरळ, लघवीत रक्त उतरणे, खोकल्यातून रक्त येणे, न्यूमोनिया, इ. त्रास होऊ शकतो.

दुसरी पायरी – 3/4 दिवसांनंतर हृदयसूज, मेंदूआवरण दाह, मूत्रपिंडदाह, यकृतदाह, इ.ची लक्षणे उद्भवतात. ताप असतोच. एकूण आजार 3-6 आठवडे चालतो व उपचार न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. अशा बहुतेक मृत्यूंना मूत्रपिंड निकामी होणे हेच प्रमुख कारण असते.

सुरुवातीच्या अवस्थेत लक्षण चिन्हावरून अंदाज करता येतो. मात्र आजाराची शक्यता मनात बाळगली तरच रोगनिदान होईल, अन्यथा इतर तापांप्रमाणे सामान्य उपचार होतील. काही दिवसांनंतर रक्त, लघवी, मेंदूजल, इ. तपासणीत विशिष्ट दोष आढळतात. साधारणपणे ज्या अवयवात आजार जास्त त्याच्याबद्दल तपासण्या करायला पाहिजे.

उपचार

लेप्टोच्या रुग्णाला रुग्णालयात ठेवून शुश्रुषा करणे आवश्यक आहे. ऍमॉक्सीसीलीन व पॅमाल गोळया चालू कराव्यात. इंजेक्शनची सोय असल्यास यासाठी पेनिसिलीन सर्वोत्तम औषध आहे. ऍस्पिरिन देऊ नये, त्याने रक्तस्राव वाढण्याची शक्यता असते. लवकर उपचार होणे महत्त्वाचे, उशिराने जास्त नुकसान होते.

प्रतिबंध

हा आजार अस्वच्छतेने पसरतो. डुकरे, मोकाट कुत्री, उंदीर यांचा बंदोबस्त केल्यामुळे एकूण रोगाला आळा बसतो. ज्या लोकांना सांडपाण्याशी संबंधित काम करायला लागते त्यांनी आठवडयात एकदा डॉक्सीच्या दोन गोळया घ्याव्यात. नगरपालिकांच्या सफाई कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष काळजी घ्यावी.

  • गमबूट व हातमोजे वापरावे.
  • डोळयाला चष्मा/गॉगल वापरावा.
  • साथीच्या दिवसात आठवडयाला एकदा औषध (डॉक्सी) घ्यावे.

लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरकडे जावे.

मूत्रमार्गाचा जंतुदोष

मूत्रसंस्था ही पूर्णपणे निर्जंतुक संस्था असते.

मूत्रपिंडाचा नरसाळयासारखा तोंडाचा भाग, मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रनलिका या सर्वांना मिळून मूत्रमार्ग असे म्हणतात. मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे.

याची कारणे अनेक प्रकारची आहेत. मूत्रमार्गात जंतुदोष सहसा खालून प्रवेश करतो. याला मुतखडे, लिंगसंसर्ग बाधा, शस्त्रक्रिया, इत्यादी अनेक कारणांपैकी एखादे कारण असते. लघवी अडल्याने नळी घालून ती काढल्यावरही कधीकधी जंतुदोषाची बाधा होते.

स्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड असल्यामुळे बाहेरून जंतू आतपर्यंत लवकर पोचतात व जंतुदोष होतो. मासिकपाळीत स्वच्छता न पाळल्यास बाहेरचा जंतुदोष मूत्रमार्गात येण्याचा धोका असतो.

लैंगिक संबंधानंतर, विशेषतः पहिल्या काही दिवसांत स्त्रीपुरुषांना मूत्रसंस्थेचा जंतुदोष होऊ शकतो.

काही वेळा शरीरात इतरत्र असलेला जंतुदोष मूत्रसंस्थेत येऊन हा आजार तयार होतो.

काही रुग्णांच्या बाबतीत असे कोणतेही कारण दिसत नसतानाही स्वतंत्रपणे मूत्रमार्गाचा जंतुदोष झालेला दिसतो.

अशा प्रकारे मूत्रपिंडाकडून ‘वरून’ किंवा मूत्रनलिकेतून ‘खालून’ मूत्रसंस्थेचा जंतुदोष होतो. यामुळे आतील नाजूक आवरणास सूज येते व तयार झालेला पू लघवीत उतरतो. अशा वेळी लघवी गढूळ होणे, वारंवार होणे, जळजळ यांपैकी लक्षणे दिसतात. याबरोबरच ताप, पोटात दुखणे, उलटया, इत्यादी त्रास होतो.

रोगनिदान

आग होऊन लघवीला वारंवार जावे लागणे (उन्हाळी) यावरून मूत्रमार्गदाह झाला अशी शंका घ्यावी. लघवी गढूळ असणे हे याचे प्रमुख चिन्ह आहे. यासाठी एका (पांढऱ्या काचेच्या) स्वच्छ बाटलीत लघवी घेऊन थोडेसे हलवून पाहिल्यावर गढूळपणा कळतो. याशिवाय वारंवार मूत्रदाह होत असल्यास जंतुदोषाचे कारण कळण्यासाठी आणखी तपासण्या करणे आवश्यक ठरते. यात मुख्य म्हणजे पोटाचे क्ष-किरणचित्र किंवा सोनोग्राफी आवश्यक असते. बऱ्याच वेळा मुतखडे हेच जंतुदोषाचे कारण असते.

उपचार व पाठवणी

मूत्रमार्गाचा जंतुदोष हा नेहमी आढळणारा आजार आहे. या बाबतीत काही वेळा तज्ज्ञांचा सल्ला व उपचार आवश्यक ठरतात. पण काही विशिष्ट नियम पाळून गावपातळीवर आपण उपचार करू शकतो. कोझाल गोळया देऊन उपचाराची सुरुवात करा. कोझाल ऐवजी डॉक्सी किंवा ऍमॉक्सी या गोळयाही उपयुक्त आहेत. त्याबरोबर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

याबरोबर तापासाठी पॅमाल किंवा ऍस्पिरिन द्यावे.

लघवीची आग, जळजळ तात्पुरती कमी होण्यासाठी फेनाडिन ही गोळी वापरावी.

काही स्त्रियांना मूत्रमार्गाचा जंतुदोष वारंवार होतो. अशा स्त्रियांनी शरीरसंबंधाच्या आधी व नंतर लघवी करावी आणि पाणी वापरून स्वच्छता करावी. यामुळे जंतुदोष होण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर कोझालची एक गोळी शरीरसंबंधानंतर घेणे उपयुक्त आहे. जास्त पाणी पिण्यामुळे जंतुदोष लवकर बरा होतो.

उपचाराने एक-दोन दिवसांत फरक न पडल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे. नुसती लघवीस जळजळ असल्यास बहुधा एवढया उपचाराने आराम पडतो. मात्र पुरेसे उपचार घेणे आवश्यक असते. अर्धवट उपचार झाले तर जंतुलागण शिल्लक राहते. यामुळे मूत्रपिंडालाच धोका पोहोचू शकतो.

खूप ताप, पोटात कळ येणे, उलटया, पोटात मूत्रपिंडाच्या जागी दाबल्यावर दुखरेपणा, लघवीचे प्रमाण कमी होणे, रक्तदाब वाढणे, इत्यादी खाणाखुणा दिसल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाकडे पाठवावे.

मूत्रमार्गाचा किरकोळ जंतुदोष-(लघवीस जळजळ) वारंवार होत असल्यास एकदा तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे. याचे मूळ कारण शोधणे आवश्यक असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.