/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
पोलिओ

Polio पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो. काही गरीब देशांत हा रोग टिकून आहे. सुधारलेल्या देशांमधून लसींमुळे आणि मुख्यतः राहणीमान सुधारल्याने तो नष्ट झाला आहे. पाच वर्षे वयापर्यंतच्या लस न दिलेल्या सर्व मुलांना- विशेषतः पावसाळयात याच्यापासून धोका असतो. हा आजार झालेली 80 टक्के मुले एक ते दोन वर्षे गटातील असतात.

जिथे सांडपाणी, मैला यांची नीट विल्हेवाट होत नाही व पिण्याचे पाणी अशुध्द असते. तिथे याचा धोका असतो. म्हणूनच हा रोग टाळायचा असेल तर सर्व मुलांना पोलिओ लस (डोस) देणे व पाणी शुध्द ठेवणे, मैला-पाण्याची योग्य विल्हेवाट व स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

रोग कसा होतो

पोलिओचे सूक्ष्म विषाणू असतात. ते अन्न पाण्यामार्फत तोंडावाटे शरीरात येतात. दूषित पाणी हेच त्यांचे मुख्य वाहन आहे. यात हे विषाणू 6 महिनेपर्यंत जिवंत राहू शकतात. विष्ठेमार्फत हे विषाणू पाणी, जमीन वगैरेमध्ये पसरतात.

तोंडातून हे विषाणू प्रथम पचनसंस्थेत येतात. तिथे संख्या वाढून तात्पुरता आजार निर्माण होतो (ताप, जुलाब, उलटया). बहुतेक वेळा हा आजार आपोआप बरा होतो.

अशा शेकडो विषाणू बाधित मुलांपैकी हे विषाणू एखाद्याच्याच आतडयातून रक्तात शिरतात. याच वेळी या मुलाला एखादे इंजेक्शन दिल्यास अथवा मार वगैरे बसल्यास रक्तातले हे विषाणू त्या ठिकाणी उतरतात. तेथून चेतातंतूंच्या मार्गे चेतारज्जूत पोचतात. चेतारज्जूत त्यामुळे आजार होतो व अवयव लुळा पडतो. म्हणून शक्यतो पोलिओ लस न दिलेल्या कोठल्याही मुलाला ताप, जुलाब, उलटया चालू असताना (विशेष करून पावसाळयात) कोठलेही इंजेक्शन देऊ नये. त्याने मूल कायमचे जायबंदी होण्याची शक्यता आहे. ट्रिपलचे (त्रिगुणी) इंजेक्शन द्यायचे झाल्यास देखील त्याआधी पोलिओ लस दिलेली असावी.

चेतारज्जूच्या पातळीवर ज्या चेतातंतूंवर हे विषाणू आघात करतात त्यांच्याशी संबंधित स्नायू लुळे पडतात. उदा. पायाच्या चेतातंतूंवर परिणाम झाल्यास तो पाय लुळा पडतो. बहुतेक वेळा हा आजार एका पायावर होतो.

लक्षणे व रोगनिदान

पहिला आठवडा – ताप, जुलाब, उलटया

दुसरा आठवडा – मूल अचानक मऊ पडते, ते आधी रांगत किंवा चालत असेल तर ती क्रिया बंद पडते. बहुतेक वेळा पोलिओ पायावर येतो. अशावेळी मूल पाय धरत नाही. मुलाला क्वचित एखादा झटका येतो. संबंधित भाग दुखत असल्याने मूल रडते.

चिन्हे

संबंधित अवयवाची हालचाल मंदावते, शक्ती कमी होते किंवा पूर्णपणे लुळेपणा येतो. मात्र मुलाला त्या भागाला स्पर्श केलेला कळतो. संबंधित स्नायूवर दाबल्यावर दुखरेपणा आढळतो. मुलांच्या दुस-या एका लुळेपणाच्या आजारात स्पर्शज्ञान नसते, आणि हा रोग आपोआप लवकर बरा होतो.

पोलिओच्या आजारानंतर काही दिवसांनी संबंधित अवयव लहान, आखडलेला दिसतो.

उपचार

एकदा पोलिओ झाल्यावर त्यावर उपचार करून फारसा उपयोग नसतो. मात्र अधिक नुकसान होऊ नये म्हणून खालील काळजी घ्यावी लागते.

  • संबंधित अवयवाचे दुखणे (वेदना) थांबेपर्यंत पूर्ण आराम देणे.
  • वेदना, दुखरेपणा गेल्यावर चोळणे, कृत्रिम हालचाली देणे. यातून स्नायूंची शक्ती टिकायला मदत होते.
  • स्नायू आखडू नये म्हणून आधारपट्टी देणे.
प्रतिबंधक उपाय

प्रत्येक मुलाला जन्मल्यानंतर 1/2 दिवसांत व त्यानंतर दीड महिन्यापासून पोलिओचे डोस द्यावेतच. प्रत्येक महिन्यास एक याप्रमाणे 5 डोस द्यावेत. अर्धा तास आगे-मागे अंगावर पाजू नये. नाहीतर लसीचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. ही लस उन्हात ठेवली असेल, बर्फाच्या किंवा तितक्याच थंड वातावरणात ठेवली नसेल तर त्या लसीची शक्ती कमी होत जाते. ही लस थंड ठेवण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

इतर अनेक आजारांप्रमाणेच स्वच्छता, पाणी शुध्दीकरण, राहणीमान यांबरोबर पोलिओचे प्रमाण आपोआप कमी होते.

पोलिओने येणारे अपंगत्व

पोलिओचे प्रमाण खूपच कमी झाल्याने आता हे अपंगत्व पुष्कळ कमी झाले आहे. ज्या मुलांना असे अपंगत्व आले आहे त्यांना विशेष मदत लागते. यात कॅलिपर्सचे महत्त्व आहे. तसेच विशेष शस्त्रक्रिया करून मर्यादित हालचाल परत मिळवता येते. यासाठी प्लॅस्टिक सर्जरीचा उपयोग होतो.

आयुर्वेद

पोलिओ, बालपक्षाघातामुळे दुबळया झालेल्या अवयवास अभ्यंग, शेकणे, व्यायाम हे उपाय गुणकारी आहेत; पण आधी आजारांची तीव्र अवस्था कमी होणे महत्त्वाचे आहे. दुखरेपणा असताना तेलमालिश आणि व्यायाम देऊ नये. अभ्यंग व व्यायामाचा प्रकार नातेवाईकांना शिकवून ठेवावा म्हणजे रोजच्या रोज रुग्णास लाभ घेता येईल. औषधी अभ्यंगाचे उपचार करणारी अनेक केंद्रे भारतात-विशेषतः दक्षिण भारतात आहेत. आजार होऊन काही वर्षे झालेल्या रुग्णांनाही यापासून फायदा झालेला दिसून येतो, पण लवकर उपचार केल्यास जास्त गुण येतो.

राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहीम

Polio Campaign जागतिक पातळीवर पोलिओचे समूळ उच्चाटन म्हणजे निर्मुलनाचे प्रयत्न चालू आहेत. आता हा आजार काही देशातच शिल्लक आहे. भारत देश यात एक आहे. भारतातही उत्तर प्रदेश व बिहार या दोन राज्यांतच हा मुख्यत: शिल्लक आहे.

जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशल आणि भारत सरकार यांनी एकत्रितपणे पोलिओ निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. 2005 पर्यंत भारत पोलिओ मुक्त करण्याचे ध्येय होते, मात्र काही कारणांनी हे साध्य झालेले नाही. तरीही पोलिओच्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे.

पोलिओमुक्तीसाठी भारत सरकारचे खालीलप्रमाणे कार्यक्रम चालू आहे.

दरवर्षी पोलिओ लसीकरण दिवस साजरे केले जातात. पल्स पोलिओ दिन महाराष्ट्रात दर दोन महिन्यांनी घेतला जातो. या दिवशी पाच वर्षाखालच्या सर्व बालकांना पोलिओ डोस दिला जातो. हा डोस ‘जादा’ डोस असतो.

याशिवाय ठरल्याप्रमाणे प्रत्येक बालकाचे लसीकरण करायचे असतेच. यात जन्मल्यावर लगेच एक डोस आणि त्रिगुणी लसीबरोबर एकेक डोस दिला जातो. या नियमित लसीकरणातून 80% बालकांना सुरक्षा-कवच मिळावे असा प्रयत्न आहे. मात्र सध्या लसीकरणाचे प्रमाण 70%पेक्षा कमी आहे हे वास्तव आहे.

पोलिओ लसीकरणाचे प्रमाणासाठी जिल्हावार संनियंत्रण केले जाते.

पोलिओसारख्या प्रत्येक आजाराची नोंद व सर्वेक्षण करून त्याचे जुलाबाचे आणि रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातात. या बालकांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातात. यातील काही बालकांना इतर आजार असू शकतो. या बालकांची पुनर्तपासणी करून लुळेपणा किती शिल्लक आहे याची शहानिशा केली जाते.

जिथे पोलिओ रुग्ण आढळले तिथे नियंत्रणासाठी उपाययोजना करणे हे एक महत्त्वाचे कलम आहे. इथून आजार इतरत्र पसरु नये यासाठी हे महत्त्वाचे आहे. आता एक रुग्ण जरी आढळला तरी ती संभाव्य साथ म्हणून उपाययोजना केली जाते.

पोलिओसारखा आजार झालेल्या सर्व बालकांची संगतवार यादी केली जाते. यामुळे नेमकी माहिती मिळते आणि पाठपुरावा करता येतो.

लस सुरक्षा-रंग-निर्देशक

पोलिओ लस थंड ठेवणे आवश्यक आहे. लस निर्मितीपासून बालकाच्या तोंडात पडेपर्यंत ती सतत शीतसाखळीत पाहिजे. शीतसाखळी बिघडून लसीचे तपमान वाढले तर ते कळावे म्हणून ही उपाययोजना केलेली आहे. यात प्रत्येक कुपीवर निळे वर्तुळ असते. त्याच्या आत पांढरा रंग असतो. तपमान बिघडले तर आतला पांढरा रंग आपोआप निळा होतो. अशी लस टाकून द्यावी लागते.

काही समस्या!

भारतात सुमारे 16 कोटी बालकांना दर दोन महिन्यांनी पल्स पोलिओ डोस दिला जातो. यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामी लागते. यामुळे नियमित लसीकरणाच्या कार्यक्रमावर थोडा प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र संपूर्ण देशात अनेक प्रांतांत पोलिओचे प्रमाण खूपच कमी आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मात्र पोलिओ तग धरून आहे. नैसर्गिक रोग-विषाणूंऐवजी आता लस-विषाणूच आजार निर्माण करतात असे दिसून येत आहे. ही एक नवीन चिंता आहे.

पोलिओ आजार फक्त माणसाला होतो. या विषाणूंचे वाहक-रुग्ण नसतात. लस उपलब्ध आहे. या कारणाने हा आजार निर्मूलनासाठी योग्य आहे असे तज्ज्ञांनी ठरवले. मात्र यात अनेक अडचणी आहेत. याचे विषाणू ओल्या विष्ठेत, दूषित पाण्यात सहा महिनेपर्यंत टिकून राहतात. लागण झालेल्या शेकडा 99% बालकात आजार होत नसला तरी विषाणू वाढून विष्ठांमध्ये उतरतात आणि हे वरून ओळखता येत नाही. अस्वच्छता हा मूळ प्रश्न त्यामुळे परत महत्त्वाचा होतो.

तोंडी लस की इंजेक्शन लस?

राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहिमेत थेंबाची तोंडी लस वापरली जाते. मात्र अनेक खाजगी डॉक्टर्स इंजेक्शन लसीचा डोस देतात. ही लस मृत विषाणूंपासून केलेली असते. यापासून विषाणू परत धोकादायक होण्याची काहीच शक्यता नसते. अनेक प्रगत तेशात हीच लस वापरतात. याचा पहिला डोस बाळ 6 आठवडयाचे झाल्यावर देतात. या लसीचे 1-2 महिन्याच्या अंतराने तीन डोस दिले जातात. चौथा डोस यानंतर 6-12 महिन्यात देतात. यानंतर दर 5 वर्षांनी एक इंजेक्शन देतात.

इंजेक्शन लस त्या बालकाच्या दृष्टीने फारच सुरक्षित व चांगली आहे. मात्र त्या बालकाच्या आतडयांमध्ये हे लस विषाणू उतरत नाहीत आणि पोटात प्रतिघटकेही तयार होत नाहीत. समाजात हे लस विषाणू पसरावेत हा हेतू यात साध्य होत नाही. म्हणून ही लस राष्ट्रीय कार्यक्रमात वापरली जात नाही.

पोलिओ – नैसर्गिक विषाणू आणि लस-विषाणू

निसर्गातल्या म्हणजे ‘जंगली’ पोलिओच्या 1,2,3 अशा तीन प्रजाती आहेत. पोलिओच्या थेंबामुळे-लसीकरणामुळे या विषाणूंना पुष्कळ प्रतिबंध झाला आहे.

मात्र थेंबात अर्धमेले विषाणू असतात, ते परत धोकादायक रोग-विषाणू होऊ शकतात. सध्या हाच धोका दिसत आहे. आपल्या देशात आढळलेल्या संभाव्य बालपक्षाघात रुग्णांपैकी जास्त रुग्ण लस-विषाणूंच्या गटातले दिसतात. हे विषाणू पसरले तर असंरक्षित बालकांना धोका आहेच, पण ज्यांना लस दिली आहे अशा बालकांना अगदी अल्प प्रमाणात धोका आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.