Addiction Icon व्यसने
अफू

गांजाप्रमाणे अफू हेही मुळात एक औषध म्हणून उपयुक्त आहे. ते गांजापेक्षा जास्त प्रभावी आहे. अफूची झाडे उत्तर भारतात जास्त आहेत. याच्या बोंडापासून निघालेला चीक सुकल्यानंतर अफू होते. बोंडेपण वापरली जातात, तसेच त्यातले बी (खसखस) खूप वापरले जाते. अफूमध्ये वेदनाशामक आणि तापशामक अशी दोन द्रव्ये असतात. यांतील पहिले द्रव्य(मॉर्फिन) हे अत्यंत उपयुक्त आहे. याने मेंदूवर सुरुवातीस उत्तेजन पण नंतर निद्रा आणणारा परिणाम होतो. एकूण वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. उत्साह, कामवासना, विचारशक्ती इ. वाढतात पण हे सगळे कमी मात्रा दिल्यावर. जास्त मात्रा दिल्यावर श्वसनक्रिया, हृदयक्रिया बंद पडून मृत्यू येण्याचा संभव असतो, कारण यामुळे मुख्य म्हणजे मेंदूचे काम थंडावते.

औषध म्हणून अफू पचनसंस्थेच्या अनेक आजारांवर उपयुक्त आहे. जुलाब उलटी थांबवण्यासाठी त्याचा उपयोग होतो पण आतडयाचे चलनवलन थंडावणे ही त्याच्या कामाची पध्दत आहे, यामुळे दुष्परिणामही होतात. अफूमुळे मलावरोधाचा परिणाम होतो. अफूने कोरडा खोकला कमी होतो. अफू सर्व इंद्रियांमध्ये दाह विरोधी काम करते, त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते.

व्यसन

या सगळया कारणांमुळे आणि विशेषतः मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हळूहळू याचे व्यसन लागते. खूप जास्त डोस दिला गेला तर वर सांगितल्याप्रमाणे मृत्यू येऊ शकतो.

लहान मुलांना जास्त रडू नये म्हणून, अफू देऊन शांत केले जाते. मुलांना असे झोपवून काही आईबाप कामावर निघून जातात. या पध्दतीने मूल हळूहळू क्षीण होऊन कुपोषित होते. जास्त मात्रा झाल्यास डोळयांच्या बाहुल्या अगदी बारीक होतात. ही याची मुख्य खूण आहे. याबरोबर रक्ताभिसरण कमी झाल्याने त्वचा, जीभ, ओठ निळसर दिसतात आणि सर्वत्र खाज सुटते.

हेरॉईन (गर्द – ब्राऊन शुगर)

Brown Sugar हे अफूपासूनच बनवलेले अत्यंत मादक द्रव्य आहे. शुध्द स्वरूपात ते पांढरे असते. अफू/गर्द खाल्ली जाते किंवा ओढली जाते. हेरॉईन ओढले जाते किंवा इंजेक्शनवाटे घेतले जाते.

गर्द – हेरॉईनमुळे तीन पाय-यांत परिणाम होतात. आधी त्या व्यक्तीस उत्तेजित वाटते, उल्हास वाटतो, त्याची बडबड वाढते व एकूण अवस्था ‘पोचल्याची’ असते. व्यसन या अवस्थेसाठीच केले जाते. पुढच्या पायरीत खूप पेंग व झोप येते. या अवस्थेत डोळयांच्या बाहुल्या लहान होतात व त्वचेवर/ओठावर निळसर झाक येते, तसेच त्वचेला जागजागी खाज सुटते. तिस-या पायरीत अगदी गाढ झोप, (उठवून उठत नाही अशी) शरीराचे तपमान उतरून हातपाय थंडगार पडणे, नाडी व श्वसन मंदावणे, इ. परिणाम दिसतात. या पायरीवर मृत्यू येऊ शकतो.

उपचार

अफूबाधित व्यक्तींना प्रथमोपचार म्हणून मीठ-पाण्याने उलटी करवावी. याने पोटात गेलेली अफू बाहेर पडायला मदत होते. पूर्वी उलटी करण्यासाठी मोरचूद 10 गुंजा पाण्यातून दिली जायची. उलटी नंतर कडक कॉफी प्यायला द्यावी. नॅलॉर्पीन इंजेक्शनने मॉर्फिनचा परिणाम उलटवता येतो.

दीर्घकाळचे अफूचे व्यसन असल्यास हळूहळू भूक मंदावत जाते, अशक्तपणा, वजन कमी होते, कामवासना नष्ट होते, मानसिक गोंधळ व विकृती निर्माण होतात. व्यसन सोडण्यासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. कारण अफू दिली नाही तर होणारा त्रास बराच असतो.

हेरॉईन इंजेक्शनची सवय लागल्यावर इतर अनेक आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात. इंजेक्शनसाठी सिरींज व सुई तीच तीच वापरली जाते व स्वच्छता राहत नाही. यामुळे जंतुदोष होऊ शकतो, एकमेकांच्या सुया वापरल्याने एड्स, कावीळ, इ. रोग पसरतात व भारताच्या आसाम-मणिपूर भागात यामुळे एड्सचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गांजा

गांजाचे झाड लावणे बेकायदेशीर असले तरी चोरून अनेकजण शेतात गांजा लावतात. पैशाचे आमिष असल्याने गांजा अनेक ठिकाणी होतो. गांजाचे झाड अंबाडी वर्गातले असून त्याच्यातून वाहणारा रस (डिंक) हा मादक आहे. गांजा हे मुळात एक औषधी झाड आहे. पूर्वीपासून निरनिराळया कामांसाठी त्याचा वापर होत आलेला आहे. यांच्या मादी जातीच्या झाडांपासून जो चीक निघतो त्यास गांजा असे म्हणतात. कोवळया फांद्यांवर राळेसारखा थर येतो त्यास चरस म्हणतात. पाने आणि टिकशा मिळून ‘भांग’ तयार होते. गांजा व भांग जुनी असल्यास निरुपयोगी असते. कारण त्यातले उडून जाणारे तेलद्रव्य असते, तेच मुख्य काम करते. हे तेल व राळ दारूत किंवा तुपात मिसळते पण पाण्यात नाही.

वैद्यकीय गुणधर्म

गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, स्त्री-पुरुष जननसंस्था, रक्त, श्वसनसंस्था वगैरे अनेक जागी होतो. गांजा तीन प्रकारे वापरला जातो – धूम्रपान, दुधात मिसळून पोटातून किंवा लेप इ. लेप हा स्थानिक वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो. लेप देऊन दात काढण्यापुरती बधिरता येऊ शकते. रक्तात मिसळल्यानंतर गांजाचा परिणाम मात्रेप्रमाणे वाढत जातो. मेंदूवर त्याचा पहिल्यांदा उत्तेजक व त्यानंतर कैफ चढणे व झोप लागणे असा परिणाम होतो. संवेदना बोथट होतात. शरीर शिथिल व शक्तिहीन होते – विशेषतः पायांवर हा परिणाम जास्त होतो. नाडी वेगाने चालते व शरीरात गरमपणा जाणवतो. भूक जास्त लागते आणि अन्नपचनावर त्याचा परिणाम होतो व मलविसर्जनही सुधारते. गांजाने बाळंतपणात कळा वाढतात. पुरुष जननेंद्रियावर त्याचा लेप दिल्यास संवेदना बोथटते आणि त्यामुळे वीर्यपतन लवकर होत नाही.

गांजाची मात्रा वाढल्यास प्रचंड झोप येणे, अगदी बेशुध्दीपर्यंत अवस्था येऊ शकते. निरनिराळे भास होणे, खूप आनंद वाटणे वगैरे परिणामांमुळे गांजा जास्त घेण्याकडे आणि नियमितपणे घेण्याकडे कल होतो. यामुळेच व्यसन वाढते.

गांजाचे व्यसन खूप दिवस असल्यास भूक मंदावणे, अशक्तपणा, थरथर, गोंधळल्यासारखे वाटणे, लैंगिक इच्छा कमी होणे असे दुष्परिणाम होतात.

गांजामुळे बाधा झालेल्या रुग्णास श्वसन थांबून मृत्यू येण्याचा संभव असतो. यासाठी ताबडतोब रुग्णालयात न्यावे. त्याआधी मीठपाणी देऊन उलटी करवल्यास गांजाचे शिल्लक द्रव्य पोटातून बाहेर पडायला मदत होते.

व्यसन म्हणून गांजा-भांग इ. मोठया प्रमाणावर प्रचलित आहे. दारू समाजाने व धर्माने निषिध्द मानली आहे तसे भांगेच्या बाबतीत नाही. सहज मिळणारी वस्तू म्हणून खेडोपाडी त्याचा वापर बराच होतो. भांग दुधात मिसळून थंडाई केली जाते व ही खूप प्रचलित पध्दत आहे. गांजाची चिलीम करून ओढणे हे सर्वात जास्त प्रचलित आहे. यासाठी झाडाच्या टिकशांचा वापर होतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.