Personal Health Icon वैयक्तिक आरोग्य आरोग्य सेवा
योग्य आहार

Uncleanness Diarrhoea शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे.आहाराचे प्रमाण, प्रकार, वेळा इत्यादींवर आरोग्य ब-याच अंशी अवलंबून असते. तिखट मसालेदार पदार्थ जेवणात कमी प्रमाणात असावेत. हॉटेलमध्ये खाणे शक्यतो टाळावे. पचायला साधा हलका ताजा आहार, भूक असेल तेव्हाच जेवणे, थोडी भूक ठेवून खाणे हे साधे नियम आहेत.

आयुर्वेदाप्रमाणे गोड,आंबट,खारट,तिखट, कडू आणि तुरट अशा सहा चवींचे पदार्थ असतात. या प्रत्येक चवीचा आपल्या खाण्यात समावेश असावा. एकाच चवीचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते.

आहार पचण्याची एक चांगली खूण म्हणजे शौचास घाण वास न येणे. तसेच जेवणानंतर सात-आठ तासानंतरही खाल्लेल्या पदार्थाचा वास ढेकरांतून येणे ही अपचनाची खूण आहे.

ऋतुमानाप्रमाणे आहारात बदल व्हावेत. पावसाळयात, उन्हाळयात भूक मंद असते म्हणून पचायला हलका, कमी आहार घेणे आवश्यक ठरते. याउलट हिवाळयात जड पदार्थही चांगले पचतात. चातुर्मासाची कल्पना यादृष्टीने योग्य आहे. आहारात त्या त्या ऋतूतले पदार्थ (ताजे) घेणे पोषणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आहाराचा विचार करताना जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ हे कनिष्ठ असतात हे लक्षात ठेवावे. उदा. त-हेत-हेच्या मिठाईपेक्षा साधे ताजे दूध आहारशास्त्राच्या दृष्टीने चांगले असते.

स्निग्ध पदार्थांमध्ये वनस्पती तूप (सर्व प्रकारचे) हे तर अपायकारक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र गावठी तूप (गाईचे साजूक) आहारात असणे आवश्यक आहे. ‘पुफा’ गटातली तेले चांगली. ही माहिती हृदयाच्या प्रकरणात दिली आहे.

प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट पदार्थ कमी अधिक सोसतो. या अनुभवावरून प्रत्येकाने आपल्या आहाराचे नियोजन केले पाहिजे. आयुर्वेदातला आहार विचार यासाठी मार्गदर्शक आहे.

आहारासंबंधी आणखी एक नियम म्हणजे उपवास. निदान तिशीनंतर आठवडयातून एक दिवस पूर्णवेळ किंवा एकवेळ उपास करणे आवश्यक आहे. पचनसंस्थेच्या आणि इतर एकंदर आरोग्यासाठी हे आवश्यक आहे. जैन धर्मियांकडून उपासांचे शास्त्र शिकण्यासारखे आहे. निरनिराळया खिचडया व पदार्थ खाऊन केलेला उपास म्हणजे केवळ रूचिपालट असतो, उपवास नाही. आहाराबद्दल पुढे स्वतंत्र प्रकरण आहे.

लवकर उठणे

लवकर उठणे हा आरोग्याचा अगदी महत्त्वाचा नियम आहे. लवकर उठण्याने मलविसर्जन नियमित व्हायला मदत होते. व्यायामही सकाळी लवकरच करणे आवश्यक असते. लवकर उठण्यासाठी रात्री लवकर जेवणे व लवकर झोपणे आवश्यक आहे. आधुनिक वैद्यक शास्त्राने मानवी जीवनाच्या रात्रंदिन चक्राचा अभ्यास करून शरीराला स्वत:चे ‘घडयाळ’ असते असे सिध्द केले आहे. आयुर्वेदाने ते फार पूर्वीच सांगितले आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे दैनंदिन जीवनाचे घडयाळ सांभाळायला पाहिजे. या घडयाळानुसार मानवी शरीरात अनेक जैवरासायनिक चक्रे असतात.

केसांचे आरोग्य

Hair Health बैठया केसांची स्वच्छता रोज करणे आवश्यक आहे. डोक्यामध्ये उवा, नायटा, फोड, पुटकुळया ह्या सामान्य तक्रारी असतात. रोज केस धुणे स्त्रियांना शक्य होत नाही. परंतु आठवडयातून एकदा तरी स्त्रियांनी डोक्यावरून आंघोळ करावी. केस कापलेले असले तर रोज डोक्यावरून आंघोळ करणे शक्य असते.

तेलाचा वापर मर्यादित असावा. तेल केसांपेक्षा डोक्याच्या त्त्वचेला लावायचे असते. शांपू, साबणाचा जास्त वापर करू नये; त्यामुळे केस कोरडे पडतात.

कपडे व पोषाख

आरोग्यासाठी सुती कपडे सर्वात अनुकुल असतात. कृत्रिम धाग्यांच्या कपडयांनी त्त्वचेला काही प्रमाणात अपाय होऊ शकतो. घाम टिपला जाण्यासाठी सुती कपडे चांगले. पण सुती कपडयांना धुलाई जास्त वेळा करावी लागते, कारण ते लवकर मळतात.

एकमेकांचे कपडे वापरल्याने काही त्त्वचारोग (खरुज, नायटा) एकमेकात पसरु शकतात. एकमेकांचे हातरुमाल वापरल्याने सर्दी, डोळे येणे वगैरे सांसर्गिक आजारही पसरु शकतात.

स्नान व मालीश

रोज आंघोळ करणे ही खरी तर आपली सांस्कृतिक, पारंपरिक पध्दत आहे. काही ठिकाणी पाण्याच्या अभावाने यावर मर्यादा येतात. पण जेथे शक्य आहे तेथे दैनंदिन आंघोळ हा नियम पाळलाच पाहिजे.

आंघोळीसाठी थंड किंवा गरम पाणी स्वतःच्या सवयीने ठरते. आयुर्वेद थंड पाण्याला जास्त महत्त्व देतो. गरम पाण्याने आंघोळ करणा-याने रोज डोक्यावरून पाणी घेऊ नये. असे केल्यास केसांचे आरोग्य बिघडते.

आंघोळीसाठी साबणाची आवश्यकता नाही. अगदी तेलकट मळ असेल तरच त्याला साबण लागतो. साबणाशिवाय साध्या चोळण्याने स्वच्छता होऊ शकते. काहीजण यासाठी भिजलेला कपडा, बेसन, इत्यादी साधने वापरतात. साबणाच्या अतिवापराने त्त्वचेवरील स्निग्ध पदार्थ जाऊन त्त्वचा कोरडी खरखरीत होते. शिकेकाई, रिठे यांचा वापर विशेषतः केसांसाठी केला जातो. हे पदार्थही रोज लावणे आवश्यक नसते.

स्त्रियांच्या लांब केसांमुळे, आणि पाण्याच्या टंचाईमुळे आपल्या देशात स्त्रियांनी रोज डोक्यावरून आंघोळ करण्याची पध्दत नाही. पण डोक्यावरून आंघोळ करणे हे स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचे तर आहेच, पण सुखद अनुभवही आहे.

मालीश

शक्य असेल तेव्हा आंघोळीपूर्वी तेलाने सगळया अंगाला स्वत: मालीश करावे. याने त्त्वचा तुकतुकीत आणि सतेज राहते व शरीराची शक्ती वाढते. तसेच यामुळे अंगदुखी, पाठदुखीसारख्या तक्रारी काही प्रमाणात टळतात.

लैंगिक आरोग्य

एड्स आणि इतर लिंगसांसर्गिक आजारांचा प्रसार वाढत आहे. लैंगिक सुरक्षिततेबद्दल आरोग्यशिक्षण महत्त्वाचे आहे. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लैंगिक संबंध असल्यास संसर्गाचा धोका वाढतो. असे संबंध अटळ असतील तर त्यात निरोधचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
अयोग्य लैंगिक संबंध, वेश्यागमन, पशूंशी संबंध ह्या लैंगिक सवयी पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. समलिंगी संबंधाबद्दल आपल्या देशात मतभेद आहेत. समलिंगी संबंधातून लिंगसांसर्गिक आजार जास्त पसरण्याची शक्यता असते. तसेच समलिंगी संबंध म्हणजे गुन्हा असा नैतिक दंडकही बरोबर नाही.

लिंगसांसर्गिक आजारांचा मोठा धोका फक्त या सवयींच्या नियंत्रणामुळेच टाळणे शक्य होईल, अन्यथा नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.