आयुर्वेद

Ayurveda Ancient Tradition आयुर्वेदशास्त्राला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आपल्या देशातल्या अनेक स्थानिक आरोग्यपरंपरांमधून हळूहळू आयुर्वेदशास्त्राची खूप प्रगती झाली. आज आधुनिक वैद्यकाच्या जशा बालरोग, स्त्रीरोग, शल्यकर्म अशा विविध शाखा आहेत तशाच आयुर्वेदाच्या एकूण आठ शाखा अस्तित्वात होत्या. कायचिकित्सा, बालचिकित्सा, ग्रहचिकित्सा, ऊर्ध्वांगचिकित्सा, शल्यचिकित्सा, विषचिकित्सा, रसायन आणि वाजीकरण या त्या आठ शाखा होत. आयुर्वेदाच्या प्राचीन ग्रंथातून याबद्दलचे सविस्तर उल्लेख सापडतात. काही शस्त्रक्रियाही आयुर्वेदकाळात केल्या जात होत्या. मर्मचिकित्सा, सिध्द, योग, इत्यादी शास्त्रेही आयुर्वेदाशी निगडित आहेत. होमिओपथीस समांतर कल्पना आयुर्वेदात होत्या असे दिसते. आयुर्वेदशास्त्र आणि स्थानिक आरोग्यपरंपरा यांच्या संबंधातून दोन्ही बाजूंची वाढ होत राहिली. शेकडो वनस्पतींचे औषधी गुणधर्म आयुर्वेदाने नोंदवून ठेवले. एकेकाळी अत्यंत प्रगत असलेल्या या शास्त्राची व परंपरेची पीछेहाट का झाली याचा विचार करणेही आवश्यक आहे.

आयुर्वेद परंपरेचा होण्याची आधुनिक काळात काही कारणे आहेत. एक म्हणजे ब्रिटिश काळात त्याची जाणूनबुजून झालेली उपेक्षा, आणि अन्याय. दुस-या बाजूला वेगाने वाढणा-या आधुनिक वैद्यकशास्त्राला मिळालेला राजाश्रय. आजही ही परिस्थिती फार वेगळी नाही. आजही आयुर्वेद-वैद्याने दिलेला आजारांचा दाखला मानायला खळखळ होते. दोन्ही उपचारपध्दतींमध्ये मूलभूत शास्त्रीय फरक आहे. आधुनिक वैद्यकाला इतर शास्त्रशाखांचे (रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिक, इ.) साहाय्य मिळाल्याने त्याची वेगाने प्रगती झाली. हे खरे असले तरी त्याची गुणवत्ता हे त्याच्या प्रगतीचे एकमेव कारण नाही. स्वतंत्र भारतातही शिक्षित व सत्ताधारी वर्गात आधुनिक वैद्यकाला स्थान मिळाले. आयुर्वेद या विषम स्पर्धेत मागे पडला ही वस्तुस्थिती आहे. मात्र आयुर्वेदानेही आधुनिक काळाशी जुळवून घेण्याची गतिमानता दाखवली नाही. ब्रिटिशपूर्व काळात आयुर्वेद बंदिस्त होण्यामुळे आयुर्वेदाची पीछेहाट झाली.

पण आजही आयुर्वेदाचे स्वतःचे महत्त्व आहे. असे अनेक आजार व समस्या आहेत, की त्या केवळ आयुर्वेदिक परंपरेतूनच सुटू शकतील. स्थानिक साधनसामग्री आणि सांस्कृतिक परंपरांच्या दृष्टिकोनातूनही आयुर्वेद आणि स्थानिक उपचारपध्दतींना योग्य तो मान मिळणे आवश्यक आहे.

पंचमहाभूत विचार

Natural Water भारतीय विचारपरंपरा आणि आयुर्वेदानुसार सर्व जीवसृष्टी ही पंचमहाभूतांपासून (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) बनलेली आहे. शरीराची आकृती, घनत्व, गंध, (वास), इत्यादी गोष्टी पृथ्वीतत्त्वापासूनः होतात. रसत्व, जलत्व, रुचिज्ञान आपतत्त्वापासून येतात. वर्ण, रूप, उष्णत्व हे तेजतत्त्वापासून; आणि हालचाल वायुतत्त्वापासून येतात. पोकळया (स्त्रोतस) आणि पोकळ मार्ग आकाशतत्त्वापासून होतात. असे आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. ज्ञानेंद्रियेही एकेका पंचमहाभूताचे प्रतिनिधित्व करतात. याप्रमाणे दृष्टीज्ञान-तेजतत्त्व, ध्वनिज्ञान – आकाशतत्त्व, रुचिज्ञान -आपतत्त्व. हालचाल, स्पर्शज्ञान-वायुतत्त्व. गंध, वास- पृथ्वीतत्त्व असा संबंध आहे.

पंचमहाभूतांपासून त्रिदोष तयार होतात असा यापुढचा सिध्दान्त आहे. पृथ्वी आणि आप यांपासून मुख्यतः कफदोष, तेजापासून पित्तदोष, वायू-आकाश यांपासून वातदोष तयार होतो असे मांडले जाते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.